भाष्य : सीरिया आगीतून फुफाट्यात

तुर्कस्तानचे सैनिक सीरियातील कुर्द गटाच्या प्रदेशात प्रवेश करताना.
तुर्कस्तानचे सैनिक सीरियातील कुर्द गटाच्या प्रदेशात प्रवेश करताना.

गेली आठ वर्षे सुरू असलेल्या सीरियातील संघर्षामध्ये अमेरिकेची धरसोड वृत्तीच दिसून आली आहे. सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी बोलवून डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचाच प्रत्यय दिला आहे. यातून तुर्कस्तान आणि सीरियातील कुर्द गट यांच्यात नव्याने संघर्षाला तोंड फुटण्याचा धोका आहे.

सीरियाच्या उत्तरेला असलेल्या कुर्द वंशाच्या लोकांना तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन ‘दहशतवादी’ म्हणून संबोधतात. कुर्दांच्या मुद्द्यावर आपल्या राष्ट्रवादाचे तुणतुणे वाजविणारे एर्दोगन वरचेवर या कुर्दबहुल भागावर हल्ले करीत असतात. तसेच, कुर्दांची कत्तल करीत हा संपूर्ण पट्टा आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा लपून राहिलेला नाही. मात्र, सीरियाचे युद्ध ऐन भरात असताना आणि तेथील हिंसाचार हाताबाहेर जात असताना याच कुर्द गटाने ‘इसिस’शी दोन हात केले, हे लक्षात घेतले पाहिजे.

‘इसिस’सारख्या जहाल दहशतवादी गटाला नेटाने सामोरा गेलेला कुर्द हा एकमेव प्रभावी गट. या स्वार्थासाठी अमेरिकेने इतकी दशके दहशतवादी ठरविलेल्या कुर्दांना जवळ केले. पण, परवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रदेशातून माघार घेणार असल्याचे जाहीर केले आणि एर्दोगन यांची दाबून ठेवलेली युद्धाची उबळ बाहेर पडली नि त्यांनी कुर्दांवर हल्ला चढविला.

या कुर्द गटाच्या ताब्यात ‘इसिस’चे हजारो कैदी आहेत. तुर्कस्तान-कुर्दांच्या संघर्षामुळे हे दहशतवादी मोकाट सुटण्याची भीती आहे. निद्रावस्थेत गेलेले दहशतवादी गट अशाच संधीची वाट बघत असतात. २०१०-११चा इराकमधील असाच संघर्ष ‘अल-कायदा’च्या पथ्यावर पडून ‘इसिस’चा जन्म झाला होता.

त्यानंतर तुर्कस्तान-सीरियाची सीमा मोकळी करून एर्दोगन यांनी माथेफिरू परदेशी तरुण-तरुणींना सीरियातील ‘इसिस’च्या अड्ड्यांची वाट मोकळी करून दिली होती. ‘इसिस’च्या पुनरुज्जीवनाचे पाप परत एर्दोगन यांच्या हातून घडणार, असे दिसत आहे. 

जागतिक स्तरावरून याचा निषेध होत असताना रशियाने अमेरिकेच्या माघारीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढत पश्‍चिम आशियात हातपाय लांबवर पसरले आहेत. संभाव्य शिरकाण टाळण्यासाठी कुर्द लोकांनी सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांची मदत घेतली आहे. असद आणि एर्दोगन हे दोघेही रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे पाईक. २०१५ मध्ये दारुण पराभव समोर दिसत असताना पुतीन यांच्या हवाई दलाने असद यांची खुर्ची शाबूत ठेवली. दुसरीकडे, तुर्कस्तानला व्यापारात आणि शस्त्रसज्जतेत रशियाची मदत होते. म्हणूनच, दोन्ही बाजूंनी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे पुतीन यांनी पश्‍चिम आशियात आपला प्रभाव वाढवीत एक नवे सत्ताकेंद्र उभे केले आहे.

ट्रम्प हे एर्दोगन यांना हा हिरवा कंदील दाखविणार, अशी अटकळ बांधली जात असताना ट्रम्प यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करता एका झटक्‍यात सैन्यमाघारीचा निर्णय घेतला. अमेरिकी परराष्ट्र खात्यातील जाणकार आणि माजी अधिकाऱ्यांनी या निर्णयावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ट्रम्प यांच्या एककल्ली स्वभावाला कंटाळून आणि धोरणात्मक मतभेद यामुळे आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी, अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पूर्ण विचारांती निर्णय न घेणे आणि चुकीच्या निर्णयाचे लंगडे समर्थन करीत तो रेटणे ही ट्रम्प यांची कार्यशैली आहे. तसेच, मित्रराष्ट्र अथवा मित्रगटांना मोक्‍याच्या क्षणी दगा देणे, हादेखील ट्रम्प यांचा आवडता ‘उद्योग’ आहे. कतार आणि कुर्द गट हे याचे उत्तम उदाहरण आहे.

गेल्या महिन्यात इराणने सौदी अरेबियाच्या तेल उत्पादन केंद्रांवर हवाईहल्ला केल्याचा आरोप आहे. पण, सौदीला खास मित्र समजणाऱ्या अमेरिकेने या हल्ल्याबद्दल इराणवर कोणतीच कारवाई न केल्याने सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

वॉशिंग्टनच्या भरवशावर स्वतंत्र देश स्थापन करू पाहणाऱ्या कुर्द गटांचे स्वप्न तूर्तास भंगल्यात जमा आहे. अशा वेगाने बदलणाऱ्या पश्‍चिम आशियात आणि त्यातील प्रश्नांमध्ये पुतीन वैयक्तिक लक्ष घालत आहेत. तेथील देश आणि इतर घटकदेखील अडचणीच्या वेळी मॉस्कोचा दरवाजा ठोठावू लागले आहेत. येत्या काळात पुतीन हे अमेरिकेसमोर मोठे आव्हान निर्माण करू शकतात. त्यांच्या वरदहस्ताने इतकी वर्षे अमेरिकेची करडी नजर असूनही इराणने इराक, सीरिया आणि लेबनॉन असा मोठा शियाबहुल पट्टा आखला आहे. पश्‍चिम आशियातील समस्त सुन्नी साखळीला शिंगावर घेऊ शकेल इतकी ताकद इराणपुरस्कृत शिया गटात आहे. पुढील काळात पुतीन या सर्व घटकांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावणार आहेत.

गेली आठ वर्षे सुरू असलेल्या सीरियातील अनागोंदीमध्ये अमेरिकेची धरसोड वृत्तीच दिसून आली आहे. बोटचेपे धोरण स्वीकारून तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामांनी रशियाला मैदान मोकळे करून दिले होते. लष्कराला आता ‘घरवापसी’चा आदेश देऊन ट्रम्प यांनी पुतीन यांना ‘फुलटॉस’च दिला आहे. तो सार्थकी लावत पुतीन यांनी गेल्या काही दिवसांत संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाला प्रलंबित असलेली भेट देऊन आपला खुंटा पश्‍चिम आशियात कसा बळकट होईल, याची चाचपणी केली आहे. सीरियाच्या यादवीतील अमेरिकेची लुटूपुटूची सक्रियता आणि आत्ताची माघार ही राजकारणाच्याच दृष्टीने लक्षात घेण्याची बाब आहे. त्यात बदमाशी दडली होती आणि आहे. अध्यक्ष असद यांचा निःपात करून त्या प्रदेशातील आणखी एक देश आपल्या टाचेखाली आणायच्या भावनेने अमेरिकेने आपला उंट सीरियात वळविला होता. त्यामुळे हजारोंची कत्तल आणि लाखो नागरिकांचे स्थलांतर घडले. 

‘इसिस’चा बागुलबुवा उभा करण्यात आणि त्याला उत्तेजन देण्यास अमेरिकासुद्धा जबाबदार आहे. मुळात, या पेचात गुंतलेल्या प्रत्येक घटकाने स्वार्थाचा विचार करीत सीरिया आणि इतर देशांतही वाममार्गाचा सर्रास वापर केला आहे. पण, सीरियाच्या यादवीत अमेरिकेची निष्क्रिय असलेली उपस्थितीदेखील बाकी घटकांवर दबाव राखून होती. अमेरिकेचे आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य लक्षात घेऊन बाकी घटक एका मर्यादेपलीकडे हालचाल करीत नव्हते. अमेरिकेच्या माघारीमुळे ही जरब आता ओसरत असताना याचा फायदा इराणचे अध्यक्ष रोहानी, एर्दोगन, असद आणि पुतीन घेतील, असे दिसते. ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण केंद्रस्थानी ठेवून स्थानिक प्रश्नांना हात घालत घेतलेल्या ट्रम्प यांच्या निर्णयांचे थेट जागतिक परिणाम होतात.

‘तालिबान’शी चर्चा, चीनबरोबरचे व्यापार युद्ध, कॅनडा आणि युरोपमधील मित्रदेशांना आपल्यामागे फरफटायला लावणे, इराणबरोबरील अणुकरार रद्द करणे, यातून ते जगाने पाहिले आहेच. अमेरिकेत पुढील वर्षी होणारी अध्यक्षीय निवडणूक, त्यातील आश्वासने आणि इतर गोष्टींचा विचार केल्यास ट्रम्प यांची या निर्णयामागील घाई दिसून येते. त्यांचे एकूण राजकारण पाहता ती स्वाभाविक वाटत असली, तरी त्यामुळे बसणारी झळ मोठी आहे. तिच्याकडे काणाडोळा करणाऱ्या ट्रम्प यांना यातून किती लाभ होणार, हे स्पष्ट नसले; तरी त्यांनी सीरियातून माघार घेऊन बदमाशांनाच बढती दिली आहे, हे स्पष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com