भाष्य : ट्रम्प यांच्या विरोधात कोण?

अमेरिकी अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडण्याकरिता मतदानासाठी आलेले नागरिक.
अमेरिकी अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार निवडण्याकरिता मतदानासाठी आलेले नागरिक.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी जो बायडेन आणि बर्नी सॅंडर्स यांच्यात थेट लढत होईल, हे स्पष्ट झाले आहे. कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी टक्कर देताना या दोघांची कसोटी लागणार आहे, यात शंका नाही. 

या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्राथमिक फेऱ्या सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यातील मंगळवारी तेथील पंधरा राज्यांमध्ये ही फेरी पार पडली, तिला ‘सुपर ट्यूसडे’ म्हणतात. निवडणुकीच्या प्रक्रियेला आता जोर येत असल्याने तिचा आढावा घेणे गरजेचे आहे. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यात पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारीसाठी दावा करून आपल्याला पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करतात. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत ढोबळ अर्थाने काही राज्यांमध्ये मतपेटीद्वारे अथवा काही राज्यांमध्ये हात उंचावून ही फेरी पार पडते. तिला ‘प्रायमरी’ वा ‘कॉकूस’ असे संबोधतात. प्रत्येक राज्यातील पक्षाचे सभासद मतदान करून पक्षाचे प्रतिनिधी निवडतात. ही प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असते. पुढे पक्षाचा अधिकृत उमेदवार या प्रतिनिधी संख्येवर ठरवला जातो. 

रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच उमेदवारी मिळेल अशी स्पष्ट चिन्हे आहेत. त्यांच्या विरोधात डेमोक्रॅटिक पक्षाकडून एलिझाबेथ वॉरेन, माईक ब्लूमबर्ग, ॲमी क्‍लोबुचर, पीट बुटीजीज, तुलसी गब्बार्ड, जो बायडेन आणि बर्नी सॅंडर्स हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. आतापर्यंत सुमारे वीस राज्यांमध्ये प्राथमिक फेरी पार पडली असून, तीत वॉरेन, ब्लूमबर्ग आणि बुटीजीज यांनी खराब कामगिरीचे कारण देत माघार घेतली आहे. त्यामुळे, डेमोक्रॅटिक पक्षात आता अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन आणि समाजवादी विचारांचे प्रतिनिधित्व करणारे बर्नी सॅंडर्स यांच्यात थेट लढत होत आहे. गब्बार्ड यांनी माघार घेतली नसली, तरी राजकीय उपद्रव देण्याची त्यांची क्षमता नाही. गेल्या मंगळवारपर्यंत पिछाडीवर असणारे जो बायडेन रातोरात आघाडीवर आले. बर्नी सॅंडर्स हे डेमोक्रॅटिक पक्षाचा मूळ वैचारिक गाभा पूर्णपणे राबवत नाहीत.

त्यांचे विचार समाजवादाकडे झुकलेले आहेत. विशेषतः तरुण वर्गात लोकप्रिय असलेल्या सॅंडर्स यांनी २०१६च्या प्राथमिक फेरीत स्वपक्षीय हिलरी क्‍लिंटन यांना घाम फोडला होता. मात्र, बराच काळ अपक्ष म्हणून सिनेटर राहिलेले आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत सगळी राजकीय व्यवस्थाच बदलण्याची भाषा करणारे सॅंडर्स यांना डेमोक्रॅटिक पक्षात तशी दुय्यम वागणूक मिळते. त्यांना पक्षांतर्गत पाठिंबा कमी असून, त्यांचे पाय ओढण्यात बऱ्याच जणांना रस आहे. जगात कुठलाही राजकीय पक्ष, विद्यमान व्यवस्था थोडेफार बदल करून चालवणारा, बऱ्याच अंशी सगळ्यांना सोबत घेणारा, पक्षाच्या स्नेह्यांचे हितसंबंध जपणारा नेताच निवडणुकीत पुढे करतो. सॅंडर्स या राजकीय व्यवहाराला तडे देताना दिसतात. त्यामुळे २०१६प्रमाणेच यंदाही त्यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्‍यता आहे. एका झटक्‍यात बुटेजीज, ब्लूमबर्ग, क्‍लोबुचर अशा बड्या इच्छुकांना नमवून, त्यांना माघार घ्यायला भाग पडत जो बायडेन यांना पाठिंबा द्यायला लावून डेमोक्रॅटिक पक्षाच्या धुरिणांनी सॅंडर्स यांच्या वाटेत अडथळा निर्माण केला आहे.

तसेच, हे सगळे घडवून बायडेन यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. सॅंडर्स या पक्षांतर्गत शर्यतीत आपला घोडा किती रेटतात ते पाहायचे. डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाकडून आव्हान देऊ पाहणारे जो बायडेन यांनी अजून तरी यथोचित मुद्दे मांडलेले नाहीत. ट्रम्प यांना पायउतार करणे याच एका भूमिकेवर ते अडकलेले दिसतात. त्यांच्या तुलनेत सॅंडर्स जवळपास प्रत्येक विषयावर मते मांडत आहेत.

ओबामांच्या कार्यकाळात आठ वर्ष उपाध्यक्ष असलेले बायडेन यांना ओबामांची प्रभावळ छेदत आपला ठसा उमटवता आला नाही. ओबामांसकट डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्या समर्थनार्थ अजूनही आवाहन न करणे ही बाब पुरेशी बोलकी आहे.

ट्रम्प यांची लोकप्रियता कायम
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिसते. तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णता, पश्‍चिम आशियातून काढता पाय घेणे, सकारात्मक रोजगारनिर्मिती, अर्थव्यवस्थेवर पकड आणि उजव्या विचारसरणीच्या कलाने गेलेल्या राष्ट्रवादाला घातलेला हात या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. चीनबाबत आक्रमक व्यापारी धोरण, अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा, जनरल कासीम सुलेमानी यांना ठार मारून इराणची पीछेहाट करणे या मुद्द्यांवर ट्रम्प मतदारांना आवाहन करत आहेत. सर्वसामान्य श्वेतवर्णीय अमेरिकी नागरिकांमध्ये टिकवलेली लोकप्रियता, सर्वार्थाने वेगळा असलेला राजकीय पिंड आणि कार्यशैलीची थट्टा होत असतानाही त्याला आपल्या फायद्यात रूपांतरित करण्याची ट्रम्प यांची हातोटी वादातीत आहे. २०१६च्या निवडणुकीत रशियाने केलेला हस्तक्षेप व त्याची चौकशी, त्यातून झालेली सुटका, महाभियोगाचा बट्टा लागूनदेखील डागाळलेल्या प्रतिमेकडे दुर्लक्ष करीत बाजूला सारलेले असे भरपूर प्रसंग त्यांचे राजकीय कौशल्य दाखवतात.

सर्वच विद्यमान अमेरिकी अध्यक्ष निवडणुकीच्या वर्षात जास्त जोखीम पत्करत नाहीत. ट्रम्पदेखील आपली नौका स्थिर करीत नव्या वादळाला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव, चीनमधील हवाई वाहतुकीला बसलेला चाप, दळणवळणाला आलेली मर्यादा, तेथील तेलाच्या मागणीत सुमारे वीस टक्‍क्‍यांनी झालली घट यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्यामुळे, कोरोना विषाणूने जागतिक अर्थव्यवस्थेला नख लावण्याच्या आत त्याचा निःपात होऊन प्रचाराला नवे अनुकूल मुद्दे यावेत, अशीच ट्रम्प यांची इच्छा असणार. सॅंडर्स, बायडेन, ट्रम्प या तिघांनी वयाची सत्तरी पार केली आहे. त्यामुळे अमेरिकेचा नवा अध्यक्ष हा ‘ज्येष्ठ’ असणार आहे. तसेच, महिला अध्यक्षांसाठी किमान चार वर्षांची वाट बघावी लागेल. 

भारताच्या तुलनेत अमेरिकेतील मतदारांची संख्या काही पटीने कमी आहे. मात्र, तेथील प्रचाराचे तंत्र-मंत्र आणि एकूणच या निवडणुकीचा बाज आपल्यापेक्षा वेगळा असतो. गेले काही महिने निवडणुकीचे वातावरण हळूहळू तयार होऊ लागले होते. साधारणपणे पक्षांतर्गत उमेदवार निवडीचे चित्र या वेळेपर्यंत पुरेसे स्पष्ट होते. पण, त्यासाठी इच्छुक उमेदवारदेखील तितकेच नावाजलेले हवेत. डेमोक्रॅटिक पक्षाचा विचार करता यंदा त्याला जरा उशीर झालेला दिसतो. कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार टक्कर द्यायची असल्यास सॅंडर्स-बायडेन या दोघांनाही आपली प्रतिमा प्रभावी करावी लागेल असे दिसते. इथून पुढच्या राज्यांमध्ये होणाऱ्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये याचाच विचार करीत ते आपले नियोजन करतील.

प्राथमिक फेरीच्या या टप्प्यानंतर निवडणुकीचे पडघम खऱ्या अर्थाने वाजू लागतील. मग दर चार वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत उत्तरोत्तर रंग भरत जातो. सर्वात जुन्या लोकशाहीचा उत्सव, त्यात खर्च होणारा पैसा, त्यातील मातब्बर उमेदवार, त्यांचे मुद्दे आणि आश्वासने, त्यांच्या रंजक कहाण्या यांनी पुढील काही महिने आंतरराष्ट्रीय चर्चाविश्‍व भरून जाईल. तुमच्या-आमच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या या खेळात जगातील सर्वात सामर्थ्यवान पदावर एका व्यक्तीची निवड होते. त्यामुळे आपल्यापेक्षा निवडणुकीचा आवाका आणि व्याप्ती कमी असूनही या प्रक्रियेचा ‘आवाज’ सर्वार्थाने मोठा आहे. या आवाजातून सुरावट तयार होते की त्याचा गलका होतो हे आता बघायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com