भाष्य : मध्यममार्ग आकृष्ट करणार ?

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन समर्थकांना अभिवादन करताना.
डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन समर्थकांना अभिवादन करताना.

बर्नी सॅंडर्स यांच्या माघारीने अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदासाठी नोव्हेंबरमध्ये थेट लढत होईल, हे निश्‍चित आहे. अशा वेळी ‘कोरोना’मुळे निर्माण झालेली परिस्थिती ट्रम्प कशी हाताळतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बर्नी सॅंडर्स यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेतून नुकतीच माघार घेतली. जवळपास संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले असताना, येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या घडामोडी काहीशा मागे पडणे स्वाभाविक आहे. मात्र, सॅंडर्स यांचे या निवडणुकीतले स्थान पाहता त्यांच्या माघारीचे आणि त्याच्या परिणामांचे विश्‍लेषण करणे आवश्‍यक आहे.

अध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीत प्रत्येक राजकीय पक्षामध्ये पक्षांतर्गत लढतीमध्ये प्रत्येक राज्यातील पक्षाचे सभासद मतदान करून ढोबळपणे त्या पक्षाचे प्रतिनिधी निवडतात. पुढे पक्षाचा अधिकृत उमेदवार या प्रतिनिधी संख्येवर ठरवला जातो. या संख्येचा विचार करता बर्नी सॅंडर्स आणि जो बायडेन यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र, बायडेन यांनी पक्षातील आपले वजन वापरत जनमताचे वारे आपल्या बाजूने वळवले. गेल्या काही आठवड्यांत राज्यांमधील निवडणुकांमध्ये बायडेन यांची सरशी झाली आणि प्रतिनिधींच्या संख्येत त्यांनी सॅंडर्सना मागे टाकले. डेमोक्रॅटिक पक्षाकडून संभाव्य उमेदवारी बायडेन यांना मिळणार, हे जवळपास निश्‍चित झाल्यामुळे जास्त जोर लावण्यात अर्थ नाही हे लक्षात घेऊन सॅंडर्स यांनी माघार घेतली. बर्नी सॅंडर्स हे अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकारणात दबदबा असलेले व्यक्तिमत्त्व आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या स्पर्धेत सलग दोन निवडणुकांमध्ये पक्षांतर्गत भल्याभल्या पुढाऱ्यांना धूळ चारत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.

गेल्या निवडणुकीच्या वेळी हिलरी क्‍लिंटन आणि आता जो बायडेन या मातब्बर राजकारण्यांना त्यांनी दिलेली टक्कर प्रभावी म्हणावी लागेल. वॉशिंग्टनला कायमच अनुकूल असणाऱ्या पारंपरिक अमेरिकी राजकारणाला छेद देत त्यांनी आपला लौकिक सिद्ध केला. व्हरमाँट या छोट्या राज्यामध्ये सिनेटर म्हणून कार्यरत असणारे अपक्ष सॅंडर्स सुमारे अर्ध्या दशकात डावी विचारसरणी असणाऱ्या, समाजवादी विचार मानणाऱ्या नवतरुणांचे प्रतिनिधित्व करू लागले. सुरुवातीला डाव्या, बुरसटलेल्या विचारांचा प्रतिनिधी म्हणून हिणवले गेलेले सॅंडर्स यांनी आपली छाप पाडली, ती इतकी की त्यांच्या धोरणांचा आधार आपल्या आश्वासनांच्या यादीत न घेणारा राजकारणी आज अमेरिकेत सर्वमान्य ठरत नाही. काणाडोळा केलेले अनेक मुद्दे त्यांनी मांडायला सुरुवात केल्याने आज  हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सगळ्यांसाठी उत्तम आरोग्ययोजना आणि उत्पन्नातील समानता/असमानता हे त्यांचे मुद्दे सर्वसामान्य जनतेला आणि खासकरून तरुणांना भावले. आर्थिक गैरव्यवहाराचे, चारित्र्याबाबत कोणतेही आरोप नसलेल्या सॅंडर्स यांनी राजकारणात बूज कशी राखायची हे शिकवतानाच राजकारणाचा विस्कटलेला पोत नीट करण्याचे धाडस दाखवले.

डेमोक्रॅटिक पक्षातील बऱ्याच धुरिणांना ते पटले नाही आणि त्यांनी सॅंडर्स यांचा पत्ता कापला. त्यांच्या माघारीने अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आता थेट लढत होईल, हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

बायडेन यांच्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात झटणारे अदृश्‍य हात अजून तरी पडद्यापुढे आलेले नाहीत. सॅंडर्स यांच्या माघारीनंतर बायडेन यांच्यामागे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि मतदार झाडून उभे राहिले आहेत, असे चित्र आता तरी दिसत नाही. त्यासाठी बायडेन यांना मूळ अमेरिकी, आफ्रिकी-अमेरिकी, हिस्पॅनिक मतदार, तरुणांना डोळ्यांसमोर ठेऊन प्रचाराची आखणी करावी लागेल. सॅंडर्स यांनी उभारलेल्या धोरणांच्या पायावर, ती विस्तारत त्यावर कळस चढवावा लागेल. ‘कोरोना’ प्रादुर्भावाची अमेरिकेतील तीव्रता पाहता आरोग्यव्यवस्था, तिची सर्वसमावेशकता आणि अशा परिस्थतीला सामोरे जाण्याची सज्जता या गोष्टी प्रचारात ऐरणीवर येतील. फक्त अमेरिकेतच नाही, तर जगभरातील सत्ताकेंद्रे या संकटातून वाचतात की डगमगतात हे पाहावे लागेल. पण अमेरिकेतील ‘कोरोना’ रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता ट्रम्प यांना त्यांची बाजू मांडणे अवघड जाणार आहे. या संदर्भातील सुरवातीच्या इशाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याची बाब आता पुढे येत आहे. त्यामुळे ते अडचणीत येतील असे दिसते. याच मुद्द्याला धरून बायडेन यांना आपले वेगळेपण दाखवून द्यावे लागेल. कोणतेही ठोस धोरण न मांडता फक्त ट्रम्प यांना पायउतार करा, असा प्रचार आता तग धरू शकणार नाही. ‘कोरोना’नंतर परिस्थिती खंबीरपणे हाताळणाऱ्या नेत्याला जनता पाठिंबा देईल यात शंका नाही.

त्यामुळे शब्दांना कृतीची जोड हे दोघे कितपत देतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. तसेच, ‘कोरोना’चे संकट आणि त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, गडद होणारे आर्थिक सावट या बाबी वगळता ट्रम्प यांनी लोकप्रियता टिकविली आहे. हे संकट आटोक्‍यात येताच ट्रम्प यांचा चमू आपला ‘आवाज’ करण्यास सुरुवात करील. त्यांच्या या प्रभावी ठरलेल्या प्रचारतंत्राला प्रत्युत्तर देत बायडेन यांना जोर लावावा लागेल. ते निवडून आल्यास बराक ओबामांच्याच नेमस्त मध्यममार्गाची पुढची आवृत्ती बघायला मिळेल, असे जाणकारांचे मत आहे. या दोघांचे वय आणि एकूण धडाडी पाहता या दोघांना उपाध्यक्षपदासाठी तुलनेने तरुण सहकारी सोबत घ्यावा लागेल. बायडेन आपल्यासोबत महिला सहकारी निवडतील, असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे, तर विद्यमान उपाध्यक्ष माईक पेन्स यांना ट्रम्प नारळ देतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

सद्यःपरिस्थितीमुळे नोव्हेंबरमधील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच, टपालाच्या माध्यमातून मतदान घ्यावे, असे काहींचे म्हणणे आहे. ही यंत्रणा कुचकामी असल्याचा शेरा मारून ट्रम्प यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. पण, १८४५ पासून ही निवडणूक ठरलेल्या वेळीच होते.

त्याला अमेरिकी कायद्याची मान्यता आहे. त्यात बदल करायचा असल्यास संसदेत तो कायदा दुरुस्त करून, अध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांची मान्यता त्यास लागेल. तसेच, नव्या अध्यक्षांनी दर चार वर्षांनी  वीस  जानेवारीला आणि नव्या संसदेने तीन जानेवारीला आपले कामकाज सुरू करावे, असा घटनेत संकेत आहे. 

सॅंडर्स यांच्या माघारीमुळे डेमोक्रॅटिक मतदार फुटणार नाहीत याची काळजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बड्या नेत्यांना घ्यावी लागेल. येत्या काळात हे काम बराक ओबामा करतील असा कयास आहे. २०१६मध्ये सॅंडर्स यांच्या माघारीनंतर डेमोक्रॅटिक मतदार एकवटले नव्हते, कारण सॅंडर्स यांच्या समर्थकांना ते पुन्हा लढतील अशी आशा होती. ती पूर्ण करीत त्यांनी यंदा आपले नशीब अजमावले. त्यांच्या मोठ्या समर्थक वर्गाची हवा कोणता नेता आपल्या शिडात भरतो हे पुढच्या समीकरणासाठी निर्णायक ठरेल. सॅंडर्स यांच्या डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या समाजवादी मतदारांना साद घालत बायडेन स्वतःचा प्रचार कोणत्या मार्गावर नेणार, हेही बघावे लागेल. मात्र, त्यांचा एकंदर कल पाहता बायडेन मध्यममार्गच स्वीकारतील असे दिसते.

त्यामुळे, सॅंडर्स यांना मानणारा मतदार ट्रम्प यांच्या पारड्यात आपले वजन टाकतो की बायडेन यांच्याकडून प्रस्थापित राजकारणाला तडा देणाऱ्या अपारंपरिक राजकीय व्यवस्थेची अपेक्षा करतो हे बघणे रंजक ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com