दृष्टिकोन : कात टाकू पाहणारी काँग्रेस

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन दिवसीय ‘नवसंकल्प शिबिर’ राजस्थानातील उदयपूरमध्ये पार पडले. संपूर्ण देशाचे लक्ष या शिबिराकडे लागले होते.
ashok gehlot
ashok gehlotsakal
Summary

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन दिवसीय ‘नवसंकल्प शिबिर’ राजस्थानातील उदयपूरमध्ये पार पडले. संपूर्ण देशाचे लक्ष या शिबिराकडे लागले होते.

- पवन खेड़ा

या विशाल देशात फक्त एक धर्म, जाती किंवा एकाच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष भले निवडणुका जिंकताना दिसत असतील; पण ते खरोखर संपूर्ण देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ शकत नाहीत. कॉंग्रेसकडे ती क्षमता आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तीन दिवसीय ‘नवसंकल्प शिबिर’ राजस्थानातील उदयपूरमध्ये पार पडले. संपूर्ण देशाचे लक्ष या शिबिराकडे लागले होते. खरे तर देशाची सद्यःस्थिती आणि भविष्याबद्दल चिंतेत असणाऱ्यांना काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे, `काँग्रेसमुक्त भारता’चे स्वप्न पाहणाऱ्यांच्या मनात या शिबिराच्या नावामुळे भीती निर्माण झाली होती. या शिबिरामध्ये देशभरातून आलेल्या काँग्रेसजनांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून ‘दिल्ली’ आणि ‘नागपूर’च्या कपाळावर चिंतेची रेषा स्पष्टपणे दिसत होती.

सुमारे १३७ वर्षांपासून काँग्रेसने सातत्याने मुद्यांवर आधारित संषर्घ केला आहे. पक्षाला ही मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. इतक्या वर्षांनंतरही काँग्रेस जिवंत असण्याचे हेच कारण असावे. त्याचप्रमाणे, जेव्हा काँग्रेस पक्ष संघर्षाच्या या रस्त्यावरून दुसरीकडे भरकटला आहे किंवा पक्षाचे समाजाशी असलेले नाते कमकुवत झाले, तेव्हा पक्षाच्या पदरी पराभव पडला आहे. पण चुकांतून शिकत पुढे जात राहाणे हे पक्षाचे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसने आपली भूमिका केवळ स्वातंत्र्य मिळविण्यापुरती मर्यादित ठेवली नव्हती, तर समाजातील इतर वाईट गोष्टींशीही या पक्षाने संघर्ष केला. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी परकियांना हटविणे हा जसा एक उद्देश त्या चळवळीचा होता, त्याचप्रमाणे नवभारताच्या उभारणीचा आराखडाही त्यावेळी झालेल्या मंथनात तयार होत होता. या सर्वव्यापी मंथनात मोठा वाटा होता तो कॉंग्रेसचा.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला प्रगतिपथावर नेणे हाच एक मोठा संघर्ष होता. त्या बाबतीतही पक्षाच्या नेत्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. `आम्ही आमच्या प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचे जतन करण्याचा दृढ संकल्प केला आहे’, हा संदेश राज्यघटनेच्या निर्मितीने भारताने सबंध जगाला दिला. साध्या सुईचीही निर्मिती न होणाऱ्या देशात मोठमोठी धरणे बनविणे, देशाला अन्नसुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भर करणे. मोठ्या संस्थांची उभारणी करणे, हे काम सोपे नव्हते. त्यानंतरही, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानांचे विलीनीकरण, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून बांगलादेशची निर्मिती करणे, अशा कितीतरी गोष्टींचे श्रेय काँग्रेसच्या सरकारांकडे जाते. या पक्षाने कठोर परिश्रम आणि तपश्चर्येतून आधुनिक भारताची निर्मिती केली, हे ऐतिहासिक तथ्य आहे. राजकीय कारणांसाठी तो झाकण्याचा किंवा कमी लेखण्याचा कोण कितीही प्रयत्न केला तरी त्यांना हे वास्तव झाकता येणार नाही.

एकविसाव्या शतकाचे तिसरे दशक आता सुरू झाले आहे. देशाच्या प्रगतीची चर्चा सुरू आहे. पण या शतकासाठी देशाला तयार करण्यासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे दूरसंचार क्षेत्रात भारत आघाडीवरचा देश बनला. त्यानंतरही, देशाकडे जेव्हा फक्त काही दिवसांचेच परकी चलन होते, तेव्हा काँग्रेसनेच खुली, उदारमतवादी अर्थव्यवस्था लागू करून भारताचा आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या २००४ ते २०१४ चे दशक मागास वर्गांसाठी वरदानच होते. काँग्रेसने त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवित त्यांचे सक्षमीकरण केले. भोजनापासून शिक्षणापर्यंतच्या योजनांचा त्यात समावेश होता. जमीन फेरवाटपाच्या माध्यमातूनही वंचितांचे सक्षमीकरण करण्यासाठी कॉंग्रेस सरकारने पुढाकार घेतला. या क्षेत्रातील पक्षाचे योगदान लक्षणीय म्हणावे लागेल.

कोणत्याही पक्ष किंवा संघटनेत कमतरता निर्माण होते स्वाभाविकच असते. काँग्रेससारख्या विशाल आणि जुन्या पक्षासाठी आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करणे, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, ही काही सहजसोपी गोष्ट नाही. सर्वांना सोबत घेऊन चालायचे असेल तर वेगाने मार्गक्रमण करणे अशक्य होऊन बसते. ज्यांना दूर अंतरापर्यंतचा रस्ता निश्चित करायचा असतो, ते वेगाने मार्गक्रमण करत नाहीत आणि एकट्यानेही प्रवास करत नाहीत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्वांशी चर्चा करून मतैक्याच्या रस्त्यावर चालणे, हीच काँग्रेसची परंपरा राहिली आहे. काँग्रेस पक्ष हा नेहमीच सामाजिक समूहांची आघाडी राहिला आहे. कोणताही पक्ष किंवा संघटना राष्ट्रीय तेव्हाच बनते, जेव्हा तो संपूर्ण राष्ट्राचे, प्रत्येक विचारधारचे, प्रत्येक भाषाशैलीचे, प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता त्याच्यात असते. आज आपल्या एवढ्या मोठ्या देशात फक्त एक धर्म, जाती किंवा एकाच संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष भले निवडणुका जिंकताना दिसत असतील. ते खरोखर संपूर्ण देशाचे नेतृत्व करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे, देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय देऊ शकत नाहीत.

राजस्थानात झालेल्या शिबिरातील नवसंकल्पाच्या घोषणेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नवीन उत्साह आणि जोम संचारला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी ज्या सुधारणा आवश्यक होत्या, त्या या नवसंकल्पच्या घोषणेचा भाग बनल्या आहेत. पक्षामध्ये सूचना घेण्याची प्रक्रिया देखील खूप मनोरंजक होती आणि मला वाटत नाही की कोणत्याही संस्थेत किंवा पक्षामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची इतकी लोकशाही प्रक्रिया असेल. नवसंकल्प शिबिरात वय, अनुभव आणि तरुणाईच्या उत्साहाचा एक अनोखा मिलाफ पाहायला मिळाला. पक्षातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या व्यक्ती एकत्र बसून खुल्या मनाने एकमेकांशी चर्चा करताना दिसल्या. खरेच, अंतर्गत लोकशाहीचे जिवंत उदाहरण फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षातच पाहायला मिळते. जेव्हा देश काँग्रेसकडे आशेने पाहत आहे, तेव्हा आपल्यातील उणिवा, त्रुटी दूर करून एका नव्या उत्साहासह देशाचा आत्मा वाचविण्यासाठीच्या या रणसंग्रामात उडी घेणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे. काहीजणांना वाटते की काँग्रेस आता मरणासन्न अवस्थेत आहे. अशा लोकांना याचे स्मरण करून देणे आवश्यक आहे, की काँग्रेसचा जन्म झाला तेव्हापासून अनेकजणांनी या पक्षाच्या अंताची स्वप्ने पाहिली. मात्र, ते सर्व जण आज विस्मृतीत गेले आहेत. इतिहासावर कोणतीही छाप ते पाडू शकले नाहीत.

वैचारिक स्पष्टतेचा अभाव

आमच्या काँग्रेस पक्षात काही दोष निर्माण झाले आहेत, हे खरेच आहे. काँग्रेसमध्ये कधीकधी वैचारिक स्पष्टतेचा अभावही दिसून येतो. हे दोष दूर केले जातील. आम्हाला (काँग्रेस पक्षाला) काळाची पावले ओळखून त्याच्याशी जुळवून घेता येते. याहीवेळी त्याचा प्रत्यय नक्कीच येईल. देशातील विशाल जनसमूहाला अजिबात मान्य नसलेली विचारधारा देशावर लादण्याचा प्रयत्न सध्याच होत आहे असे नाही. याहीपूर्वी तसा तो झाला होता. पण तो फसला. ज्यावेळी देशावर कोणते संकट आले त्यावेळी काँग्रेसने खंबीरपणे लढून देशाला कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचणाऱ्या शक्तींचा पराभव केला आहे.

(लेखक कॉंग्रेसचे नेते आहेत.)

(अनुवाद - मयूर जितकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com