#यूथटॉक : ‘अभिरुची साक्षरते’ची मात्रा

Pranjal-Akkalkotkar
Pranjal-Akkalkotkar

अ मॅन इस नोन बाय द कंपनी ही कीप्स... एखाद्या मनुष्याची पत ही त्याच्या सामाजिक वर्तुळावरून ठरते! आज याहीपुढं जाऊन म्हणावंसं वाटतं, की ही पत सामाजिक वर्तुळावरून करता आली, तरी त्याची प्रगल्भता ही मात्र त्याच्या अभिरुचीवरूनच ठरते. व्यवसायाची अथवा कार्यक्षेत्राची अपरिहार्यता म्हणून प्रसंगी वैयक्तिक नैतिक कल्पना अथवा आवडीनिवडींना मुरड घालून वावरणारी व्यक्ती एकटी असताना संपूर्ण स्वतंत्र असते ती तिच्या अभिरुचीबाबत. अभिरुची...अर्थात ‘यत्‌ श्रेयार्थे रुच्यते अभिमोदते च। केवळ उथळ उत्तेजन देणारी आवड अथवा व्यसन नव्हे, तर डोळसपणे आणि व्यासंगी वृत्तीनं एखाद्या विद्येचा अथवा कलेचा मागोवा घेण्याची नित्यनूतन ऊर्मी!

तेव्हा व्यवसायाची गरज म्हणून एखाद्या भडक सांस्कृतिक कार्यक्रमात फिल्मी गाणी गाऊन दमून घरी आल्यावर होतकरू गायक त्याच्या आवडीचं अभिजात नाट्यसंगीत आळवत डोळे मिटून तल्लीन होतो, तेव्हा तो खऱ्या अर्थानं त्याची अभिरुची प्रकट करत असतो. हिरकणीची रायगडावर आपल्या बाळाच्या ओढीनं तगमग सुरू झाली, ते कारण तर अतिशय मातृसुलभ होतं, परंतु हिरकणी अजरामर झाली, ती तिनं त्या ओढीसाठी स्वीकारलेल्या विस्मयकारक मार्गामुळे. याच धर्तीवर संगीत अभिरुचीबाबतही म्हणता येईल, की उत्तम अभिरुचीचा आग्रह धरणाऱ्या श्रोत्यांचं आणि कलाकारांचं वेगळेपण हे केवळ त्यांची आवड वेगळी असते म्हणून आदरास पात्र होत नाही, तर त्या आवडीसाठी ते ज्या नेटानं मार्गक्रमण करत राहतात त्यावर ठरतं.

अगदी साधं उदाहरण घेऊ. ‘दिवाळी पहाट’ या शब्दातील ‘पहाट’ या एकाच शब्दात त्या कार्यक्रमाला नेमानं येणाऱ्या श्रोत्यांच्या अभिरुचीचा प्रत्यय येतो, कारण श्रोते ज्या अर्थी भल्या पहाटे उत्तम स्नान वगैरे करून नेटके कपडे घालून या कार्यक्रमाला येतात, त्या अर्थी केवळ मनोरंजन या एकाच कोष्टकात त्यांची सांगीतिक आवड बसत नाही हे प्रकर्षानं जाणवतं. अशी अभिरुची निर्माण होण्यास नक्कीच अवधी लागत असेल, परंतु त्यानंतर मात्र सहसा असे रसिक धरसोड करताना आढळत नाहीत आणि खरं तर हेच अभिरुचिसंपन्न रसिक प्रयोगशील आणि सातत्य राखणाऱ्या कलाकारांचे खंदे आधारस्तंभ म्हणून पडद्याआडची भूमिका निभावत असतात.

समाजात उत्तम प्रकारच्या वैविध्यपूर्ण सांगीतिक कलाकृती निर्माण होणं हे तो समाज किती सर्जनशील आहे, याचं निदर्शक असेल, तर समाजानंही उत्तम अभिरुचीचा आग्रह धरणं क्रमप्राप्त आहे आणि आज आपण खरोखरीच याबाबत किती आग्रही आहोत, याचं अवलोकन करणं आवश्‍यक वाटतं.

एखाद्या संगीतकाराचं, सांगीतिक रचनेचं अथवा त्यातील मेहनतीचं मूल्यमापन आज नकळतपणे आपण त्याला मिळालेले ‘व्ह्यूज’, त्या कलाकाराला मिळणारं भरघोस मानधन अथवा ज्या वाहिनीवर ते सादर होत आहे त्या वाहिनीच्या ‘टीआरपी’चा अंदाज घेऊन तर करत नाही आहोत ना? तसे असेल तर स्वत:चे वैचारिक निकष लावून एखादे गाणे आपल्या विचारांच्या झोतात पारखणं बाजूला पडून, या चंदेरी झगमगाटात जे चमकवलं जाईल, तेच सोनं असा समज प्रचलित होऊ शकतो. हे होऊ नये असं वाटत असेल, तर संगीतातील नव्या शिलेदारांनी ‘अभिरुची साक्षरता मोहीम’ हाती घेण्याची आवश्‍यकता आहे.

कसदार कलाकृती म्हणजे काय, ती कशी घडते, त्यामागं किती खोलवर घेतलेला ध्यास असू शकतो याचं उत्तम रसग्रहण करू शकणाऱ्या जाणत्या संगीतप्रेमींनी याबाबत प्रबोधन करून, अजूनही प्रकाशझोतात न आलेले; पण आपल्या परीनं धडपडणारे कलाकार पुढे कसे येतील यासाठी मुक्त समीक्षेचे व्यासपीठ आपापल्या वर्तुळात उभं करावं असं वाटतं. ‘पब कल्चर’मध्ये मद्यधुंद श्रोत्यांचे पाय थिरकतील, या हेतूनं किंवा अनैसर्गिक ध्वनिपातळी निर्माण करून उन्मादक ठेक्‍यानं अभिजात गीतांचीही वासलात लावणारे डिजिटली तयार केलेले ट्रॅक हे कितीही उत्तेजक असले, तरी हे म्हणजे अभिजात नाही, हे ठासून सांगायला हवं. तसं करण्याची तयारी दाखवणं हीसुद्धा ‘अभिरुची साक्षरता’ येण्यासाठीची कटू, तरीही आवश्‍यक मात्रा समाजाच्या पचनी उतरवणं हे कर्तव्य मानून करणं आवश्‍यक आहे.

एवढं मात्र नक्की, की अभिरुचीचा आग्रह धरणं आवश्‍यक असलं, तरीसुद्धा तो आग्रह महत्त्वाचा नाही, पण त्या आग्रहाच्या ओघानं जी वैचारिक आणि नवनिर्मितीची साहसे करण्यासाठी श्रोते आणि कलाकार उद्युक्त होतील, ते मंथन महत्त्वाचं. कारण त्या मंथनातूनच उत्कट अशा कलाकृतींचं नित्य सर्जन होत राहते. या सर्वांत संगीताच्या लोकशाहीमध्ये, हे अभिरुचीचा आग्रह धरणारे विरोधी पक्षनेते पाहिजेतच, नाही का?
(लेखक संगीतकार असून, पुण्यात अध्यापन करतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com