निःस्पृह कामाचा आदर्श

Kishabhau-Patwardhan
Kishabhau-Patwardhan

पुण्यातील ‘स्व’-रूपवर्धिनीचे संस्थापक आणि अनेक सामाजिक कामांशी संबंधित असलेले कृष्णाजी लक्ष्मण ऊर्फ किशाभाऊ पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला आज (ता. ३) प्रारंभ होत आहे. यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा.

कोरेगाव पार्क येथील अंधशाळा, विद्यार्थी सहायक समिती, बालग्राम वगैरे संस्थांबरोबर काम करीत असल्याने माझा सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वावर होता. बहुधा यातूनच किशाभाऊंना माझ्याबद्दल माहिती मिळाली असावी आणि ते मला भेटायला आले. काम किरकोळच होते. ते मी पटकन केले. तेव्हापासून मला ते नियमितपणे भेटू लागले. ‘सकाळ’ कार्यालय असो, माझे घर असो किंवा रविवार असो, किशाभाऊ हक्काने माझ्याकडे येऊ लागले. ते प्रामाणिक आणि तळमळीचे कार्यकर्ते होते. गुणवत्ता असूनही वंचिततेमुळे संधीला पारखे होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काम केले. त्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा केला. एकूणच त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे आमच्या तारा जुळल्या त्या त्यांच्या अखेरपर्यंत.

सारे काही समाजासाठी 
किशाभाऊंनी मला ‘स्व’-रूपवर्धिनीचा परिचय तर करून दिलाच; पण तेथील विद्यार्थ्यांबरोबर भेटायला व गप्पा मारायला ते मला बोलावू लागले. एखाद्या समारंभाच्या निमित्ताने संस्थेला भेट देण्यासाठी बोलावण्यास त्यांनी सुरवात केली. त्यांना नाही म्हणणे मला जमत नसे. याचे श्रेय अर्थात त्यांच्या लाघवी स्वभावाला होते.

त्याचबरोबर ते स्वतःसाठी कधीच काहीही मागत नसत, वा तक्रार सांगत नसत. घरी किशाभाऊ केव्हाही येऊ शकतात, हे माझी पत्नी भारतीलाही ठाऊक झाले होते.
‘सकाळ’मधील माझ्या सहकारी शीला पद्मनाभन यांच्यामुळे आम्ही ‘निर्धार’ आणि ‘परिवार मंगल’ असे दोन ट्रस्ट सुरू केले होते. ‘परिवार मंगल’मार्फत कुटुंबनियोजनाचे अगदी वेगळ्या पद्धतीने काम चालत असे आणि तेही विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये.

मंगळवार पेठेतील आमचे हे काम पाहून किशाभाऊंनीही आम्हाला मदत करायला सुरुवात केली. यातील बरेचसे लोक- विशेषतः महिला केईएम हॉस्पिटलमध्ये जात. तेथील डॉ. बानू कोयाजी यांचा आम्हाला सक्रिय पाठिंबा होता. मी सहज बानूबाई आणि किशाभाऊंची ओळख करून दिली. ‘स्व’-रूपवर्धिनीतील मुलांची शालेय आणि बौद्धिक प्रगती पाहून बानूबाई चकित झाल्या. पण ते कामच तसे होते. याचबरोबर किशाभाऊ ‘परिवार मंगल’लाही मदत करत होते. कुटुंब नियोजन हा बानूबाईंचा आवडता विषय. यामुळे त्या दोघांचीही लवकरच घट्ट मैत्री झाली. 

किशाभाऊंबद्दल खूप लिहिण्यासारखे आहे. त्यांची तळमळ, निःस्पृहता टोकाची होती. आपले आयुष्य तर त्यांनी सामाजिक कामाला दिलेच; पण आयुष्याच्या अखेरीनंतरही त्यांनी आपली सर्व स्थावर मालमत्ता ‘स्व’-रूपवर्धिनीला दिली. माणूस यापेक्षा काय त्याग करू शकतो? माझ्या मनात त्यांचे नाव कायमचे कोरले गेले आहे. किशाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन. त्यांनी सुरू केलेले ‘स्व’-रूपवर्धिनी संस्थेचे काम त्यांच्याप्रमाणेच निरलसतेने व निःस्पृह सेवाभावाने सुरू राहावे, यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

( लेखक `सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com