जपानमध्ये तरुणांना संधींची कवाडे

‘एज्युकॉन जपान’मधील एक सत्र.
‘एज्युकॉन जपान’मधील एक सत्र.

जपानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर आपल्या उद्योजकांनाही जपानमध्ये किंवा जपानशी संबंध जोडून आपला उत्कर्ष साधता येईल. सध्याच्या मंदीच्या, नोकरी मिळणे दुर्लभ झालेल्या परिस्थितीत या संधीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न तरुणांनी केला पाहिजे.

‘सकाळ’च्या ‘एज्युकॉन’ या गेल्या पंधरा वर्षे सातत्याने शिक्षण क्षेत्रासाठी चाललेल्या यशस्वी उपक्रमाबरोबरच काही वेळा इतर दालनेही उघडली जातात. या वेळच्या ‘एज्युकॉन जपान’मध्ये जपानच्या भारतातील राजदूतांपासून शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्रातील लोकांनीही भाग घेतला. यामुळे विद्यार्थीच नव्हे; तर तरुणांना, छोट्या-मोठ्या उद्योजकांना जपानमध्ये किंवा जपानबरोबर एक प्रकारे संबंध जोडून आपला उत्कर्ष साधणे शक्‍य होईल. हे तितकेसे सोपे नसले; तरी जो प्रयत्न करेल, त्याला यश मिळण्याची शक्‍यता मोठी आहे.

उच्च शिक्षण घेण्याकरिता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’तर्फे बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. ही मुले अत्यंत हुशार, जिद्दी, प्रयत्नवादी आणि कर्ज काढून शिकण्याची हिंमत ठेवणारी असतात. या छोट्या मदतीचाही त्यांना उपयोग होतो. पण, बहुतांश मुले बॅंकेकडून कर्ज घेऊन या शिक्षणासाठी जातात. हे कर्ज सुमारे २५ लाखांपासून ५० लाखांपर्यंत, तर काही वेळा दीड कोटीपर्यंतही असते. जपानमध्ये याच गुणवत्तेचे शिक्षण निम्म्याहून कमी खर्चात सहज उपलब्ध आहे. याशिवाय ते विद्यापीठ नोकरी मिळण्याची शंभर टक्के शाश्‍वती देऊ इच्छिते. अर्थात, हे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षणाच्या बाबतीत दिसते. तंत्रज्ञानाच्या तुलनेत जपान अमेरिकेच्या किंवा युरोपच्या बरोबरच नव्हे, तर कदाचित काकणभर पुढेच असू शकेल. जपानच्या कार्पोरेट संस्थांकडे एक ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. त्यांना ते कुठे गुंतवावेत, हा प्रश्‍न पडला आहे. जपान सरकारकडे सुमारे तीन ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक रक्कम पडून आहे. यामुळे तेथे कर्ज एक-दोन टक्के दराने मिळू शकते, जे आपल्याकडे दहा ते बारा टक्के दराने मिळते.

जपानमधील सामाजिक परिस्थिती अशी आहे, की त्यांच्याकडे तरुणांचा मोठा अभाव आहे. याचबरोबर घटती लोकसंख्या अन्‌ वृद्धांची वाढती संख्या, हा प्रश्‍न तेथे अत्यंत गंभीर झालेला आहे. यामुळे व्यवसाय करायचा असेल तर माणसे पाहिजेत, व्यवसाय वाढवायचा असेल, तरी माणसे पाहिजेत किंवा एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन कारखाना सुरू करायचा असेल, तरी माणसे पाहिजेत. निधी, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते भारताकडे मोठ्या आशेने बघतात. त्यांना जवळ असलेल्या चीन किंवा कोरियामधील लोक राजकीय आणि पारंपरिक विरोध यामुळे त्यांना नको आहेत. 

माझ्या माहितीप्रमाणे शिक्षणासाठी आपले विद्यार्थी गेली काही दशके रशियामध्ये जातात. रशियन भाषा शिकून तेथील पदवी प्राप्त करतात. तीच गोष्ट जर्मनी किंवा फ्रान्सच्या बाबतीतही आहे. तेव्हा तुम्ही जपानी शिकलात, तर जपानमध्ये पदवी मिळवू शकाल. पदव्युत्तर शिक्षण मात्र तुम्हाला इंग्रजी भाषेत घेता येते. आपण इतर भाषा शिकू शकतो, तर जपानीही शिकू शकतो. प्रश्‍न फक्त लिपीचा येतो, जी मात्र अवघड आहे आणि शिकायला पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. पण, ते केल्यास तुम्हाला भवितव्याची काळजी करण्याचे कारण नाही. जपानमधील लोक देशप्रेमी, प्रामाणिक आणि अत्यंत कष्टाळू आहेत. त्यामुळे आपण तिथे काम किंवा व्यवसाय करतो, तेव्हा आपल्याला त्या वातावरणाची, तेथील शिस्तीची सवय अंगवळणी पडते, असे पुण्यातील यशस्वी उद्योजक सुनील कुलकर्णी यांनी सांगितले. ते आणि त्यांचे स्नेही संजीव सिन्हा हे विद्यार्थ्यांना, लहान-मोठ्या उद्योजकांना मार्गदर्शन, साह्य करायला उत्सुक आहेत. त्यासाठी यांना sunil.kulkarni@fideltech.com, sanjeev.sinha@IndiaJapanTech.com  या मेलवर संपर्क साधता येईल. 

जागतिक राजकारण पाहिले तर आता जपान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका या सगळ्यांना चीनकडून धोका वाटतो. ‘एज्युकॉन’ला जपानचे भारतातील राजदूत उपस्थित होते, त्यांनी या चारही देशांनी एकत्रित लष्करी सराव करावा, त्यातून चीनला संदेश मिळेल, असे सूचित केले. जपानमध्ये बौद्धधर्मीय लोक सत्तर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना भारताबद्दल आत्मीयता आहे. या सर्व गोष्टींचा फायदा करून घेणे योग्य ठरेल, असे मला वाटते. शिक्षणाच्या बाबतीत ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’, तर औद्योगिक क्षेत्रात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि सुनील कुलकर्णी आणि संजय सिन्हा हे मदत करतील. सध्याच्या मंदीच्या, नोकरी मिळणे दुर्लभ झालेल्या परिस्थितीत वरील संधीचा फायदा करून घेण्याचा आपल्या तरुणांनी जरूर प्रयत्न करावा.

‘एज्युकॉन’च्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या परिषदांमध्ये काही अतिशय वेगळे आणि चांगले अनुभव आले, जे इथे नमूद करण्यासारखे आहेत. पूर्वी यातील काही अनुभवांचा उल्लेख आला असला, तरीसुद्धा यानिमित्ताने ते नमूद करीत आहे. आम्ही ‘एज्युकॉन’च्या निमित्ताने पॅरिसमध्ये गेलो होतो, तेव्हा तेथील विद्यापीठाचा इतिहास सांगण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांनी असे सांगितले की, १८७२ च्या फ्रान्स आणि जर्मनीच्या युद्धात फ्रेंच लष्कराचा दारुण पराभव झाला. त्यावर तेथील सर्व विचारवंत एकत्र आले व असे का घडले, याचा त्यांनी शोध घेतला. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले की, आपले शिक्षण क्षेत्र हे नेतृत्व, संशोधन याला महत्त्व देत नाही. त्यामुळे या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाने आतापर्यंत १५ ‘नोबेल’ पुरस्कारविजेते, १२ राष्ट्राध्यक्ष दिले.

इस्राईलच्या परिषदेत, ‘आमच्याकडे अजिबात पाणी नाही,’ असे तेथील संयोजकांनी आम्हाला सांगितले. शिवाय, ‘आमच्या आसपासचे देश आम्हाला संपवण्याच्या प्रयत्नांत असतात. त्यामुळे आम्ही या परिस्थितीवर संपूर्ण मात तर केलीच; पण त्यातून जगभर व्यवसायही केला,’ असे त्यांनी नमूद केले. तेथील विद्यापीठामध्ये संशोधन आणि उद्योग, यावर भर दिला जातो. कारण, तेथे कारखाने सुरू करणे शक्‍य नाही. म्हणून तेथील विद्यार्थी आपली सुधारित उत्पादने तयार करतात. इस्राईलची लोकसंख्या ८६ लाख असल्यामुळे त्यांची गरज भागून राहिलेली उत्पादने जगभर विकणे आवश्‍यक होते. त्यामुळे जगाच्या कोणत्याही भागातील देशांत कितीतरी उच्च दर्जाची उत्पादने ते देऊ शकतात.

शांघायमधील (चीन) परिषदेत विद्यार्थ्यांच्या संशोधन, उत्पादन केंद्रामध्ये आम्ही मुद्दाम गेलो होतो. त्यांना उद्योगजगत, विद्यापीठ यांच्याकडून अतिशय उत्तम सुविधा असल्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात उत्पादने निर्माण करायला प्रोत्साहन दिले जाते. मी सहज विचारले की, आतापर्यंत किती व्यवसाय केला? त्यावर सुमारे रुपये दहा हजार कोटी, असे त्यांनी सांगितले. ते ऐकून आम्ही चकित झालो. अशी हजार केंद्रे चीनमध्ये आहेत, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नवीन संशोधन केंद्र सुरू केले आहे. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क कार्यरत आहे. पण, ही अपवादात्मक केंद्रे आहेत.

सिंगापूरमध्ये तेथील विद्यापीठात ‘रोल्स रॉईस’, ‘बीएमडब्ल्यू’ अशा जगप्रसिद्ध संस्थांच्या संशोधन केंद्राची प्रमुख आशियाई कार्यालये आहेत. त्यामुळे तेथील विद्यार्थी, प्राध्यापक हे काळाबरोबरच नव्हे, तर काळाच्या पुढील गोष्टींसाठी संशोधन, ज्ञान निर्माण करतात. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना लगेच जगभर नोकऱ्या मिळतात. या सर्व गोष्टींपासून बोध घेत आपल्या धोरणकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी योग्य ती धोरणे आखणे आवश्‍यक आहे. त्यांना ते सहजशक्‍य आहे. तसे झाले तर उद्योजकांना बाजारपेठेची कमतरता जाणवणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना नोकऱ्या नाहीत अशी परिस्थिती राहणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com