भाष्य : शिकण्याचे तंत्र आणि ज्ञान

Education
Education

तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर करा, असे सांगितले जात आहे. ते रास्त असले तरी तसे करताना काळजी घ्यावी लागेल. उद्देश व कार्यक्रम नसेल तर तंत्रज्ञानाचा अनावश्‍यक व अयोग्य वापर विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम करेल. शिक्षकाची बदलती भूमिका म्हणूनच अधोरेखित व्हायला हवी.

मानवी इतिहासात आजवर अनेक ‘थांबे’ आले आणि गेले. मनुष्य पुन्हा नव्याने उभा राहिला व आणखी समृद्ध होत गेला. या मानवी समृद्धीमध्ये शिक्षण व शिक्षणप्रक्रियेतून निर्मित ज्ञानाचा लक्षणीय वाटा आहे. आधीच्या पिढीने निर्मिलेले ज्ञान पुढच्या पिढीस हस्तांतर करत राहणे व ज्ञानवृद्धीतून मनुष्यजीवन अधिकाअधिक समृद्ध करत जाणे ही प्रक्रिया निरंतर चालूच आहे. हे चालू ठेवण्याचे श्रेय जाते त्या कालसापेक्ष शिक्षण व्यवस्थेला; म्हणजेच शिक्षक या भूमिकेला. ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावेळीदेखील शिक्षकाच्या भूमिकेत क्रांतिकारी बदल होईल, असे वाटते.

माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान यांच्या सम्मीलनातून ज्ञान संपादनाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. ‘कोविड-१९’सारख्या वेगाने संक्रमित होणाऱ्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर, गर्दीविरहीत जीवनपद्धतीचा स्वीकार करावा लागत आहे. या परिस्थितीत मार्ग उरतो तो माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुलांना शिकत ठेवणे. त्यासाठी प्रचलित शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. मुलांना शिकण्यासाठी लागणारे भौतिक वातावरण, मुलांची शिकण्याची पद्धत, शिकण्यातला आशय, शिक्षकाची भूमिका, मूल्यमापन अशा पातळ्यांवर बदल होतील.
शिक्षणात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन  त्यांच्या शिकण्याच्या भौतिक व्यवस्थांचा (शाळा, महाविद्यालये, वाचनालय, प्रयोगशाळा इ.) देखील पुनर्विचार करावा लागू शकतो. मान्यताप्राप्त ऑनलाईन कोर्स मोठ्या प्रमाणात सुरू होतील. उच्चशिक्षित मध्यमवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात ‘होम स्कूल’ पद्धतीकडे वळेल. त्याला पूरक विविध विषयांसाठी कम्युनिटी लर्निंग सेंटर (उदा:- कला केंद्र, विज्ञान केंद्र इ.) उदयास येतील. अशा परिस्थितीत शिक्षकांचे काम मुलांना प्रत्यक्ष शिकवणे कितपत राहील?  पुढील काही महिने तरी शिक्षकांचे काम मुलांना शिकण्यास मदत करणे व शिकण्यास उपयुक्त वातावरण निर्माण करणे हे असेल. माहितीचा प्रचंड साठा एका क्‍लिकवर उपलब्ध असण्याच्या काळात,  जागतिक पातळीवरील विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन हव्या त्या भाषेत, हव्या त्या प्रमाणात अगदी सहज उपलब्ध आहे. मुलांसाठी पुस्तके आणि शिक्षक एवढेच ज्ञानाचे स्रोत नसतील. माहितीचा प्रचंड साठा मुलांबरोबर असणार आहे. शिक्षकाची भूमिका ही असेल, की त्यांनी मुलांना विशिष्ट दिशेने शोध घेण्यास प्रवृत्त करायचे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षकाने समजा ‘पाणी’ या विषयासंबंधी काही प्रश्न विद्यार्थ्यांसमोर ठेवले आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांची उत्तरे शोधण्यास सांगितले तर विद्यार्थी  इंटरनेटवर ज्या पद्धतीने शोध घेतील तो अधिक अर्थपूर्ण असेल. हे काही न करता विद्यार्थ्यांना नुसताच पाण्याची माहिती गोळा करण्याचा प्रकल्प दिला, तर तिथल्या माहितीच्या अथांग सागरात गटांगळ्या खाण्याची वेळ येईल; आणि तरीही ज्ञानाच्या दृष्टीने तो कोरडाठाकच राहील. मार्गदर्शकाची भूमिका त्यामुळेच महत्त्वाची ठरते. मुलांनी मिळवलेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर  होत आहे ना, मुलांवर यातून कोणते मूल्यसंस्कार होत आहेत, याकडेही शिक्षकांचे बारकाईने लक्ष हवे. म्हणजेच या सगळ्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळायला हवे, शोधक वृत्ती विकसित व्हायला हवी आणि ज्ञानाचा जीवनात उपयोगही करता यायला हवा. पाण्याचा ‘प्रकल्प’ पूर्ण केलेला विद्यार्थी आपल्या वैयक्तिक आयुष्यात पाण्याची नासाडी कदापि करणार नाही. त्याच्या शिकण्याचे ते एक दृश्‍य फलित असेल. या पद्धतीने शिकताना मुलांना शिक्षण व जीवन एकसंध वाटू लागते. मानवी मेंदू संशोधन सांगत आहे, की मुलं स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती स्वतःच करते. मुलेही निसर्गतः स्वयंप्रेरणेतून शिकत असतात. शिक्षणतज्ज्ञांच्या मते कृतियुक्त स्वयंशिक्षण  हाच मुलांच्या शिकण्याचा मंत्र असला पाहिजे. 
 बदलांना सामोरे जाण्याची क्षमता
एकूणच शिक्षण हे चार भिंतीतून मुक्त झाल्यामुळे शिक्षकाला आपल्या भूमिकेकडे नव्याने पाहावे लागेल.  यापुढे भाषा मुलांच्या ज्ञानवृद्धीमध्ये अडसर निर्माण करणार नाही. आता मुलांना आपण विचार करत असलेल्या भाषेत सहज, वेगाने व सर्वोच्च पातळीवरचे शिकता येणार आहे. सोबतच जगातल्या अनेक भाषा घरबसल्या शिकता येणार आहेत. शिक्षकांचे काम आता कोणते असेल तर माहितीच्या या अथांग सागरात आवश्‍यक ती माहिती कुठे उपलब्ध आहे आणि त्यातही अस्सल, प्रमाणित व खरे ज्ञान कोणते हे ठरवायला, शोधायला मुलांना साह्य करणे. इंटरनेटवरील खोट्या व चुकीच्या माहितीचा आपल्यावर काय परिणाम होतो, हे आपण जाणतो. विद्यार्थांकडे उद्देश असेल, कार्यक्रम असेल तर विद्यार्थी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करेल. तसे नसेल तर विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. शिकण्यासाठी उद्देश व कार्यक्रम देण्याचे काम मात्र शिक्षकाला करावे लागेल व त्याचे प्रभावी मूल्यमापनदेखील. यापुढे मुलांमध्ये सततच्या बदलांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित होणे अनिवार्य ठरणार आहे.
 आधीची पाटी कोरी...
मुलांना जुनी कौशल्ये, ज्ञान व धारणांची आवश्‍यक तेव्हा वजावट (Unlearning)  करता येणे, सतत नवीन नवीन गोष्टी शिकायची तयारी असणे, शिकायचे कसे हे शिकणे अत्यावश्‍यक असणार आहे. म्हणजे नवे शिकताना आधीची पाटी कोरी करावी लागेल. ज्ञानाची खोली व शिकण्याची व्याप्ती अधिकवाढल्याने आता सर्वच ज्ञानेंद्रियांचा जास्तीत जास्त वापर करावा लागणार आहे. त्यासाठी बालवाडीच्या वयात मुलांच्या शिकण्याच्या क्षमता (इंद्रिय विकास) विकसित कराव्या लागतील. भावना हा मेंदूचा द्वारपाल आहे असे मेंदू शास्त्र सांगत असेल, तर यापुढे मुलांना भावनिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ करावे लागणार आहे. सततच्या बदलांमुळे कठीण परिस्थितीतसुद्धा विचलित न होता सकारात्मकतेने तोंड देण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे. एकूणच, यापुढे शिक्षकाला शिकवणारा कमी; मुलांचा दिशादर्शक म्हणून जास्त स्वतःकडे बघावे लागेल.

प्रेम आणि आपुलकीने ओतप्रोत होऊन मुलांना जगण्याची दिशा देणारा व शिकण्यास प्रेरित करणारा शिक्षकच मुले मान्य करतील. आता साक्षरतेची व्याख्या लिहायला, वाचायला येण्याइतपत संकुचित ठेवून चालणार नाही. शिक्षणाचा उद्देश  मुलांच्या जीवनाशी एकसंध व जगण्याशी सुसंगत लागेल.

मुलांना शिकायचे कसे हे एकदा कळले, की जगायचे कसे हे मुलेच आपल्याला शिकवतील. अनुभवसंपन्न बालपण मुलांना भविष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीसोबत सहज जुळवून घ्यायला शिकवेल. निसर्गाचा भाग होऊन एकसंधपणे जगायला शिकवेल. 

शिक्षक ही फक्त भूमिका नसते, तर ती मानवी भविष्याला दिशा व दर्शन देणारी ही एक व्यवस्थाच असते. आज ना उद्या हे घडणारच होते, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव मात्र एक निमित्त ठरले.
( लेखक शिक्षणाच्या क्षेत्रातील कार्यकर्ते व अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com