अशांतता माजविण्याचा देशविघातक शक्तींचा डाव

अशांतता माजविण्याचा देशविघातक शक्तींचा डाव

काश्‍मीरप्रमाणेच पंजाबही पाकिस्तान; विशेषतः आयएसआयच्या रडारवर असल्याचे वास्तव कधी लपून राहिलेले नाही. कधी अमली पदार्थांच्या तस्करीमार्फत, तर कधी बनावट नोटा घुसवून या राज्यात अशांतता आणि अस्थिरता माजविण्याचा खटाटोप सुरू असतो. तरीदेखील तुलनेने गेल्या काही वर्षांत शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यात या राज्याला यश आलेले असताना राज्याची घडी विस्कटण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाल्याचे अमृतसरजवळ झालेल्या भीषण हल्ल्यामुळे स्पष्ट झाले आहे.

"निरंकारी भवना'त मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी पिस्तुलाचा धाक दाखवत प्रवेश केला आणि तेथे जमलेल्या सुमारे 200 निरंकारी भाविकांवर ग्रेनेड फेकले. हल्ल्याची पद्धत पाहता हल्लेखोर प्रशिक्षित असल्याचे दिसते. त्यामुळेच हा हल्ला "खलिस्तानी,' तसेच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा "आयएसआय' यांनी संगनमताने केला असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केला आहे. या हल्ल्याच्या आधी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना "लष्करे तैयबा' या संघटनेचा सह-संस्थापक हाफिज सईद याच्याशी काही "खलिस्तान'वाद्यांच्या भेटीगाठी झाल्याचे वृत्तही आले आहे. त्यामुळेच पंजाबातील शांततेला सुरुंग लावण्याचा काही आंतरराष्ट्रीय कट तर रचण्यात आलेला नाही ना, असा संशय घेण्यास जागा आहे.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पोलिसांना "जैशे मोहम्मद' या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचे सहा-सात अतिरेकी सीमारेषा ओलांडून पंजाबात घुसल्याची खबर मिळालेली होती. त्यामुळे पंजाबात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता आणि अवघे पंजाब पोलिस दल या घुसखोरांच्या शोधात होते. तरीही हा हल्ला टाळता आला नाही. या हल्ल्यामागचा कावा स्पष्ट आहे. राज्यातील सामाजिक सलोख्याची वीण एकदा का उसवली, की शत्रूचीही गरज भासत नाही. हे लक्षात घेऊन भारताला या संकटाचा मुकाबला करताना केवळ प्रशासकीय दृष्टीनेच नव्हे, तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध आघाड्यांवर समावेशक प्रयत्न करावे लागतील. खलिस्तान्यांना असलेला पाक दहशतवाद्यांचा छुपा पाठिंबा ही आता बातमी राहिलेली नाही. मात्र, या हल्ल्यात काश्‍मिरी दहशतवाद्यांचाही हात असल्याचा कॅ. अमरिंदरसिंग यांनी केलेला आरोप अधिक गंभीर आहे आणि त्यामुळेच या हल्ल्यावरून राजकारण न करता सर्वपक्षीयांनी एकदिलाने पंजाब सरकारला साथ देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच पंजाबचे पोलिस महासंचालक सुरेश अरोरा यांनीही या हल्ल्यामागे दहशतवादी असल्याचा आरोप केला आहे; कारण त्यांच्या मते हा हल्ला कोणत्याही एका व्यक्‍तीवर नव्हे, तर लोकांच्या समूहावर होता. असे हल्ले हे केवळ अतिरेकीच करू शकतात, असा त्यांचा दावा आहे. 

मात्र, कोणत्याही घटनेचे राजकारण करण्याचा आपल्या राजकीय पक्षांचा रिवाज नवा नाही आणि तसे ते या दुर्दैवी हल्ल्यानंतरही सुरू झाले आहे. आम आदमी पक्षाचे नेते आमदार एच. एस. फुल्का यांनी "लष्करप्रमुखांनीच हा हल्ला घडवून आणला आहे,' असा अत्यंत बालिश आरोप करून आपल्या विचारदारिद्य्राचे दर्शन घडविले आहे. ते अत्यंत अश्‍लाघ्य असेच आहे. पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या हल्ल्यामुळे आता केंद्र सरकारलाही पंजाबमधील कॉंग्रेस सरकारविरोधात कोणतेही राजकारण न करता, या प्रकरणाचा छडा लावण्यात पंजाब पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची गरज आहे. कॅ. अमरिंदरसिंग यांनी या हल्ल्यानंतर तातडीने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचा आढावा घेतला, ते योग्यच झाले. आता त्यांनी राज्यातील सर्वच संवेदनशील स्थळांना कडक सुरक्षाव्यवस्था पुरवण्याचे आदेश दिले आहेत. ही पश्‍चातबुद्धी झाली; कारण पंजाबात पाकिस्तानी अतिरेकी घुसखोरी करीत आहेत, याची खबर पंजाब पोलिसांना आधीच मिळालेली होती. त्यामुळे संवेदनशील आणि विशेषत: धार्मिक स्थळांसाठी सुरक्षेच्या बाबी तातडीने अमलात आणायला हव्या होत्या. "निरंकारी भवना'तील हल्ला ही "चाचणी' असू शकते. यातून मोठा घातपात घडविण्याचा दहशतवाद्यांचा डाव असू शकतो. पंजाबमध्ये दहशतवादी कृत्ये घडवून पुन्हा अशांतता माजविण्याचे कुटिल कारस्थान देशविघातक शक्ती रचत असल्याचा इशारा लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी नुकताच दिला होता. त्यात तथ्य असल्याचे या हल्ल्यातून समोर आले आहे. याला तोंड देण्यासाठी कायदा-सुव्यवस्था राखण्यावर लक्ष केंद्रित करायला हवेच; परंतु राज्यातील सामाजिक घडी विस्कटता कामा नये, याचीही खबरदारी घेण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com