पहाटपावलं : प्रेरणांचे स्रोत

Raja-Akash
Raja-Akash

काही विद्यार्थी हुशार असतात. सतत यश संपादन करीत असतात. पण काही विद्यार्थी अपयशी ठरतात. काही विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आधी चांगला असतो, पण नंतर त्यांचा यशाचा आलेख घसरू लागतो. काही विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आधी वाईट असतो, पण अचानक एका क्षणापासून त्यांच्यात बदल घडतो व ते चांगली प्रगती करू लागतात व यशाच्या शिखरावर पोहोचतात, असं का होतं? ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, त्या आपण पुन्हा पुन्हा करतो आणि ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्या टाळण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. कोणती गोष्ट आपल्याला आनंद देते व कोणती गोष्ट त्रासदायक वाटते, हे आपल्यामध्ये असलेल्या प्रेरणांवर अवलंबून असतं.

मला एखादी गोष्ट मिळवायचीच आहे, अशी तीव्र प्रेरणा असेल, तर ती गोष्ट साध्य करण्यासाठी आपण जे परिश्रम करतो, त्यात आपल्याला आनंद व समाधान मिळते. त्या कामामध्ये गोडी निर्माण होते. त्या कामातील आव्हाने स्वीकारायला आवडतात. त्या कामात अडचणी आल्या, तरीसुद्धा आपण खचत नाही. उलट आणखी जोमाने त्यावर मात करण्याचे प्रयत्न करतो. ते काम पूर्णत्वास नेणं ही आपली जबाबदारी समजतो. त्या कामाबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला पुढच्या पायऱ्या गाठण्यास मदत करतो.

त्या क्षेत्रात आपण स्वत:चं असं एक स्थान निर्माण करतो. एखाद्या कामामधून समाधान मिळवण्याची प्रवृत्ती, आव्हान स्वीकारण्याची तयारी, जबाबदारी स्वीकारण्याची, स्वत:चं स्थान निर्माण करण्याची, अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्याची जिद्द, सकारात्मक दृष्टिकोन या सर्व गोष्टींना प्रेरणांचे आंतरिक घटक म्हणू. असे घटक आपल्याला व्यक्‍तिमत्त्वात असले, तर आपण करिअरमध्ये इतरांच्या खूप पुढे जाऊ शकतो.

प्रेरणांचे आंतरिक घटक आहेत, तसेच बाह्य घटकसुद्धा आहेत. उदा. सभोवतालचे वातावरण, आपण जिथे काम करतो, तेथे गोंगाट आहे, थंडी किंवा उकाडा आहे. डास चावताहेत, पुरेसा प्रकाश नाही. खूप पसारा आहे नि घाणेरडा वास आहे. ते काम करण्यासाठी कुणाचा तरी दबाव आहे. चुका झाल्यास बोलणी खावी लागतात किंवा शिक्षा होते. काम करण्यासाठी पुरेशी साधने नाहीत. इतर लोक सहकार्य करत नाहीत. ते काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे, असं दडपण आहे. खूप मेहनत घेऊनसुद्धा आपलं कौतुक होत नाही.

आपली दखल घेतली जात नाही, असं नकारात्मक वातावरण असेल, तर आपण कुठलंच काम करू शकणार नाही. आपला उत्साह मावळेल. पण हेच बाह्य घटक सकारात्मक असतील, तर आपण जोमाने काम करू शकतो. प्रेरणांचे आंतरिक व बाह्य घटक आपल्याला ठरवून हवे तसे नियंत्रित करता येतात. हे आपल्याला जमलं तर आपण कुठल्याही कामात, अभ्यास अथवा करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com