टीव्ही मालिकांचा बादशहा

टीव्ही मालिकांचा बादशहा

दूरचित्रवाणीवरील मालिकांच्या निर्मितीतील लक्षणीय नाव म्हणजे अधिकारी बंधू. त्यांपैकी प्रख्यात दिग्दर्शक गौतम अधिकारी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.

लाल रंगाची ओपन स्पोर्टस कार भरधाव चाललेली. गाडीतला फोन वाजतो. गाडी चालवणारी व्यक्ती फोन उचलून बोलते. ‘हां बोलो. कमांडर बोल रहा हूँ.’ कट ट्‌ - पुढील सीन.

‘कमांडर’ या डिटेक्‍टिव मालिकेतला हा प्रसंग. वर्ष १९९२. ज्या काळात मोबाईल फोन भारतात अस्तित्वात नव्हता, तेव्हाच या दिग्दर्शकाने तो दाखवला होता.  काळाच्या पुढे धावणारा, डोक्‍यातल्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवणारा, संगीताची अचूक जाण, कॅमेऱ्याच्या अँगल्सवरची हुकमत आणि साहित्यविषयक कथा- पटकथा यांवरची पकड असणारा उत्तम दिग्दर्शक म्हणजे गौतम अधिकारी. टीव्ही मालिकांचा बादशहा. माझी त्याची ओळख बंदिनी मालिकेच्या सेटवरची. 

मी ‘लाइफ मेंबर’ नावाच्या मालिकेच्या शूटमध्ये असताना शेजारच्या बंगल्यात अधिकारी बंधूंच्या ‘बंदिनी’चं चित्रीकरण चालू आहे असं कळल्यावर त्यातल्या परिचित कलाकारांना भेटायला म्हणून मधल्या वेळेत तिथं गेलो आणि माझी अन्‌ गौतम व मार्कंड या अधिकारी बंधूंची ओळख झाली. मी तिथून निघत असताना मार्कंडने मला पुढच्या ‘एपिसोड’साठी विचारलं आणि मी बंदिनीच्या १२ व्या व १३ व्या भागात काम केलं. मी, रीमा लागू व अश्‍विनी भावे. ते भाग सुंदर झाले. बंदिनी लोकप्रिय झाल्यामुळे अजून ५-६ भाग करायला मिळाले आणि मालिका संपली. पण माझा अधिकारी बंधूंसोबत प्रवास सुरू झाला.

माझ्यासाठी म्हणून स्वतंत्र मालिका करायची असं गौतम व मार्कंडच्या डोक्‍यात होतं; आणि मग ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’ ही पोलिसी कथांची मालिका आली. मी प्रमुख भूमिकेत होतो. या मालिकेनं माझं आयुष्यच बदललं. तसा मी प्रेक्षकांना परिचित होतो; पण या भूमिकेनं मला रातोरात ‘स्टार’ केलं. याचं संपूर्ण श्रेय गौतम, मार्कंड व लेखक अनिल कालेलकरांचं. 

शूटिंगच्या दरम्यान गौतमचा व माझा सहवास वाढला. त्याची विलक्षण बुद्धी, कल्पनाशक्ती, कामाचा झपाटा, उत्तम दर्जा याचं दर्शन होऊ लागलं. तो जे अँगल्स लावायचा, ते विलक्षण होते. कधी खुर्चीच्या पायातून, काचेत पडलेल्या प्रतिबिंबातून, सुरा, ग्लास... कशाकशातून तो उत्तम शॉट लावायचा. ते त्याचं वैशिष्ट्यच होतं. पुढे पुढे तसे अँगल्स म्हणजे ‘गौतम अधिकारी शॉट’ म्हणून बाहेर ओळखले जाऊ लागले. तुकड्या- तुकड्यांनी तो सीन्स करायचा. म्हणजे एका बाजूचे लाइटिंग तयार असेल, तर तो तिथे असणारे सगळे शॉट्‌स एकाच वेळी घ्यायचा. पण पुढे ते जोडताना इतर ठिकाणी घेतलेले शॉट्‌स आणि काँपिझिशन्स त्याच्या डोक्‍यात पक्की असायची. कुठलाही शॉट घेताना ‘क्‍लॅप’ कधीही नसायची. सगळं डोक्‍यात. एडिटिंगसाठी स्वतः एडिटरसोबत बसायचा. पार्श्‍वसंगीताचंही तेच. त्याने स्वतःला कामात पूर्णपणे झोकून दिलं होतं. मीही बऱ्याचदा त्याच्यासोबत एडिटिंगमध्ये रात्री जागवल्या आहेत. एपिसोड जेव्हा पूर्ण तयार होऊन यायचा, तो सणसणीतच असणार. गतिमान, कंटाळा येणारच नाही, उत्कंठा वाढवणारा असाच असायचा आणि हे सगळं अगदी कमी वेळेत. त्याकाळी सुविधा कमी असताना.

हे सगळं करत असताना तो खूप चिडचिडाही झाला होता. चुकांची पुनरावृत्ती केली, तर तो खूप रागवायचा. माझ्यावर मात्र तो एकदाही चिडला नाही. सतत प्रेम आणि माझ्या कामावर त्याचा विश्‍वास होता. अधिकारी बंधूंच्या पुढच्या जवळपास सर्वच मालिकांमध्ये मी असायचो. त्यांनी मराठी मालिकांचे विश्‍वच काबीज केलं होतं. दोघा बंधूंनी आपापल्या कामांची वाटणी करून घेतली होती. मार्कंड मार्केटिंग सांभाळायचा आणि गौतम दिग्दर्शन. 
पुढे  ‘कमांडर’ मालिकेत मुख्य भूमिकेत हिंदीतील नामांकित नट न घेता त्यांनी माझी निवड केली. हिंदी सिनेमातील अनेक नामवंत नट त्यासाठी त्यांच्यामागे होते, हे मला ठाऊक होते. ती मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मला त्याचा खूप फायदा झाला. मी भारतात आणि भारताबाहेरही प्रसिद्ध झालो. गौतमचे आणि माझे सूर इतके जुळले होते, की त्याने ‘त’ म्हटलं, की मला ताकभात कळत असे. आम्ही आता जवळचे मित्र झालो होतो.

एकमेकांच्या सुख-दुःखांत सहभागी व्हायचो. माझे वडील संगीतकार स्नेहल भाटकर यांच्याशीही त्याच्या गप्पा व्हायच्या. संगीताची त्याची जाण उत्तम होती. गौतमने मालिकांच्या टायटलमध्ये एक नावीन्य आणलं, ते म्हणजे म्युझिकमध्ये केवळ वाद्यं नाहीत, तर शब्दही आणले, गायक आणले. हल्ली हे सर्वच करतात. त्या वेळी ते दुर्मिळ होतं. 

अधिकारी बधूंनी खूप मेहनतीनं टीव्हीविश्‍वात प्रचंड यश मिळवलं, राज्य केलं. स्वतःचे नवनवीन चॅनेल निर्माण केले. खूप कलाकार, तंत्रज्ञ या सृष्टीला दिले. दिवाळीत त्याने मला फोन केला. म्हणाला, ‘चल तुझे कमांडर का टायटल साँग भेजता हूँ, तेरे को चाहीये था ना?’ खरंच त्याने ते व्हॉट्‌सॲपवर पाठवलं. क्रिकेटची त्याला खूप आवड होती. शूटिंगमध्ये फावल्या वेळेत त्याचं सर्वांसोबत क्रिकेट चालायचं. परवा मीही त्याला गमतीत म्हटलं, ‘‘गौतम! बहोत दिन हो गये अधिकारी ब्रदर्स का चेक नही मिला?’’ तो हसला. म्हणाला, ‘‘ठीक है, थोडा रुक. मिल जायेगा।’’

दिवाळीनंतर गप्पा मारायला पुन्हा भेटायचं ठरलं. आणि २७ ऑक्‍टोबरला मार्कंडचा मोबाईलवर  संदेश- ‘गौतम गेला’. हा धक्का प्रचंड होता. न झेपणारा. आमची ‘भेट’ स्मशानात झाली. पण गप्पा राहिल्याच. मग त्याच्या पार्थिवापाशी मीच मनाने संवाद साधला. गौतम! माझ्या हृदयात तुझं स्थान अढळं आहे. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात जे काही मिळालं, त्या यशावर तुझाच अधिकार आहे. गौतम... खऱ्या अर्थाने अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com