मी पुन्हा बोलेन; मी पुन्हा लिहीन!

Sanjay-Raut
Sanjay-Raut

आज सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे आटोपून देवपूजेच्या आधी ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ हे ‘ॐ नमः शिवाय’च्या जपासारखं शंभर वेळा लिहून काढलं. गेल्या काही दिवसांपासून हा नित्यक्रम झाला आहे. बाकी काही म्हणा ! पण रोज हे लिहू लागल्याने अक्षरही तब्येतीसारखं सुधारू लागलंय. हे काम आटोपल्यानंतर न्यूज चॅनेल्स लावले. सगळीकडे आपलीच छबी दिसतेय, हे पाहून सुखावलो. यात तास-दीड तास कसा गेला हे कळलंच नाही. कोणी माझी बातमी बदलली की मी पण चॅनेल बदलायचो. एवढा बदल माझ्यात गेल्या काही दिवसांपासून झाला आहे. थोड्या वेळाने ‘सामना’ घेतला. अग्रलेखातून भाजपला कसं झोडपून काढलंय, हे पुन्हा वाचलं.

आपलाच अग्रलेख वाचण्यात काय मजा असते, हे संपादक झाल्याशिवाय कळत नाही. खरं तर हल्ली एक अग्रलेख लिहून भागतच नाही. भाजपच्या इज्जतीची लक्तरं वेशीवर टांगण्यासाठी रोज तीन- चार अग्रलेख तरी लिहिले पाहिजेत, अशी मला खूप इच्छा होते. त्यासाठी हात स्फुरू लागतात. त्यानंतर डायरी पाहिली. दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स, अकराला न्यूज चॅनेल्सला बाईट, बारा वाजता तीन न्यूज चॅनेलला मुलाखती, एक वाजता ट्विटरवर शेरो-शायरी ट्विट करणे, दोनला अग्रलेख लिहिणे, तीनला प्रेस कॉन्फरन्स, चारला मुलाखती, पाचला...रात्री अकरापर्यंतच्या नोंदी होत्या. सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून ‘भोजनासाठी राखीव’ असे एका ठिकाणी नोंदवले. हल्ली जेवायलासुद्धा वेळ मिळत नाही.   

सध्या न्यूज चॅनेल्सना मुलाखती व बाईट देणे यासाठी अभ्यास करायची गरज नसते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि खोटारड्या भाजपने वचन पाळलं नाही. शिवसेनेला फसवलं, एवढीच वाक्‍य आलटून-पालटून तासभर म्हणत राहायची. कोणी कोणताही प्रश्‍न विचारला तरी त्याचे उत्तर एवढेच देतो. 

देशात सर्वाधिक ‘टीआरपी’ मिळवणारी व्यक्ती, अशी माझी नोंद झाली आहे. त्यासाठी संसदेत माझा सत्कार करावा, असा प्रस्ताव कोणीतरी आणणार असल्याचे समजते. पण नरेंद्र मोदी- अमित शहांच्या हस्ते हा सत्कार आपण मुळीच स्वीकारायचा नाही, असं मी ठरवलंय. लवकरच मी ते न्यूज चॅनेल्सवरून जाहीर करणार आहे. माझा टीआरपी वाढल्याने मराठी कलाकार मंडळी पक्की धास्तावली आहेत. त्यांचे सिनेमे आणि मालिका बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अशी खात्रीशीर बातमी आहे. त्यामुळेच त्यांनी ‘पुन्हा निवडणूक’ हा हॅशटॅग खोडसाळपणे चालवला. चॅनेलवाल्यांनीही तो थोडावेळ चालवला. मी हे कसे सहन करेन? मी तातडीने प्रेस कॉन्फरन्स बोलावून, भाजपबरोबरच आशिष शेलार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. मग काय कलाकारांचा हॅशटॅग गायब. न्यूज चॅनेलवाले माझे बाईट सोडून दुसऱ्यांचे दाखवतात म्हणजे काय.  

मी किती लोकप्रिय आहे, हे लिलावतीत ॲडमिट झाल्यानंतर साऱ्या जगाने पाहिले. तेथील स्टाफलाही याचा प्रत्यंतर आला. डिस्चार्जच्या वेळी तेथील कर्मचाऱ्यांनी वही आणली व ‘सर, अभिप्राय द्या’ असे म्हटले. मीदेखील आनंदाने ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ असे लिहिले. त्यावर त्यांनी ‘सर, हॉस्पिटलविषयी अभिप्राय हवाय,’ असे म्हटले. मी हल्ली फक्त एवढे तीनच शब्द बोलतो आणि लिहितो, असे म्हणून मी पुन्हा ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार’ असे लिहिले.   रात्री अकराला मी माझी मुलाखत चॅनेलवर पाहत असताना कन्येने रिमोट काढून घेतला. ‘‘बाबा, हे काय सारखे स्वतःच्याच मुलाखती पाहताय’’, असं म्हणून टीव्ही बंद केला. त्यावर मी नजर रोखून धारधार शब्दांत म्हटलं. ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि तू केव्हाही टीव्ही चालू केलास तर मी टीव्हीवर पुन्हा येईल. पुन्हा येईल...’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com