माहितीच्या 'ओबेसिटी'पासून सावध!

आशा उमराणी, डॉ. शुभदा नगरकर
गुरुवार, 29 जून 2017

वेगवेगळ्या माध्यमांतून माहितीच्या प्रचंड लाटा आपल्या मेंदूवर सतत आदळत असतात. असंबद्ध व अनावश्‍यक माहितीच्या ग्रहणाने लक्ष विचलीत होते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांतून कसा मार्ग काढायचा?

"योग्य अन्न ग्रहणासाठी जसा आहारतज्ज्ञाचा सल्ला घेणे जरुरीचे आहे, तसा माहिती ग्रहणासाठी माहिती तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे.'' - किंचित उपहासात्मक असा हा संदेश काही दिवसांपूर्वी वाचण्यात आला. केवळ हसून सोडून देण्याऐवजी या संदेशावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्याला कारणीभूत आहे माहितीची ओबेसिटी अर्थात स्थूलत्व!

1970 च्या दशकापर्यंत माहितीचे स्रोत मर्यादित होते. छापील स्रोतांबरोबरच रेडिओ घराघरांत पोचला होता. दूरचित्रवाणीची नुकतीच सुरवात होती. नव्वदच्या दशकानंतर हळूहळू निरनिराळ्या भाषेतील शेकडो दूरचित्रवाणी वाहिन्या निर्माण झाल्या. केवळ 24 तास बातम्या देणाऱ्या असंख्य वाहिन्या, त्यावरच्या त्याच त्या बातम्या आणि त्यांची चिरफाड करणाऱ्या कथित तज्ज्ञांची शिरा ताणून चालणारी भांडणं यामुळे आपण भंडावून जातो. मनोरंजनवाहिन्यांचा तर सुळसुळाट झाला. हे सर्व कार्यक्रम आपण सलग पहात नाही. सतत वाहिन्या बदलल्याने मेंदू भंजाळतो व लक्ष कुठेच केंद्रित होत नाही.

नव्वदच्या दशकातच इंटरनेट उपलब्ध होऊन जगभराचे संगणक एकमेकांशी जोडले जाऊन माहितीचे प्रचंड जाळे निर्माण झाले व हळूहळू ते सर्वांच्या आवाक्‍यात आले. इंटरनेटद्वारे माहिती शोधण्यासाठी अनेक सर्च इंजिनची निर्मिती झाली. त्यातील सर्वात लोकप्रिय "गुगल'! एखाद्या शब्दावर शोध घेतल्यास हजारो संकेतस्थळे गुगलवर उपलब्ध होतात. ती चाळण्यात खूप वेळ जातो. इंटरनेटमार्फत माहिती मिळवणेच नव्हे तर सर्व प्रकारची खरेदी/विक्री, बॅंकांचे व्यवहार, तिकिटांचे बुकिंग,पत्ते शोधणे इ. अगदी सोपे झाले आहे. वैयक्तिक संपर्कासाठी "इमेल' ही महत्त्वाची सोय. परंतु, या इमेल कंपन्या खूपच हुशार! तुमच्या "इमेल' मध्ये जे शब्द वापरलेले असतात, त्या अनुषंगाने अनेक जाहिराती पडद्याच्या एका कोपऱ्यात सतत फडकत असतात. कधी नकळत तर कधी उत्सुकतेपोटी त्यावर क्‍लिक करत आपण वाहावत जातो. तुमचे एक क्‍लिक जाहिरातदारांना तुमचा "इमेल आयडी' मिळवून देते. मग रोजच हजारो जंकमेल येऊन पडतात. त्या चाळून नष्ट (डीलिट) करण्यात महत्त्वाचा वेळ जातो. त्यातच "स्मार्टफोन' आणि इंटरनेटच्या घातक मिश्रणाची भर! व्हॉट्‌सऍपसहित फेसबुक, ट्विटर, मेसेंजर असे अनेक सोशल नेटवर्किंगचे स्रोत उपलब्ध झाल्याने माहितीचे असंख्य असंबद्ध तुकडे वाचण्यात आपण अहोरात्र गुरफटतो. अनेक मित्रांचे स्टेट्‌स अपडेट्‌स, व्हिडिओ, कविता, फोटो, विनोद, जाहिराती, वाढदिवसाच्या किंवा सणाच्या शुभेच्छा काय काय म्हणून फोनवरून आपल्यापर्यंत पोचत असते. यापैकी कोणत्याही गोष्टीबद्दल विचार करायला मेंदूला वेळ मिळत नाही. या माहितीचे आकलन करून ती समजून घेण्याआधीच ती इतरांना पाठविण्याची घाई असते ती गोष्ट वेगळीच. पौगंडावस्थेतील मुलांच्या बाबतीत तर हाती स्मार्टफोन येण्याने नैराश्‍य, एकटेपण (फेसबुकवर शेकड्याने मित्र असूनही) अशा अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. लॅरी रोझेन म्हणतात की मेंदू हा एक अनेक दिवे असलेला बोर्ड आहे, असे समजले तर त्यात येणारी प्रत्येक संकल्पना एक एक दिवा दर्शविते. जेव्हा एखादी माहिती मेंदूत येते तेव्हा फक्त एक दिवा लागतो; परंतु, जेव्हा अनेक संकल्पना एका पाठोपाठ मेंदूत प्रवेश करतात तेव्हा अनेक दिवे उघडझाप करू लागतात व मेंदू गडबडतो. एकाग्रता नाहीशी होऊन गोंधळ वाढतो व कार्यक्षमताही घटते.

कॅनडामधील एका संशोधनात असे नोंदविले गेले आहे, की स्मार्टफोन वापरणाऱ्यांचा सरासरी लक्ष केंद्रित करण्याचा काळ आठ सेकंदांहून कमी म्हणजे जगातील सर्वांत कमी "अटेन्शन स्पॅन' असणाऱ्या गोल्डफिश या प्राण्यापेक्षादेखील कमी असतो. म्हणजेच मानवाचा प्रवास जगातील सर्वांत जास्त "डीफोकस्कड' प्राणी बनण्याकडे होऊ लागला आहे.

माहिती ग्रहण करताना आपण कोणत्या संकेतस्थळावर किती रेंगाळतो, याकडेही लक्ष ठेवावयास हवे. उदा. rescuetime.com. हे संकेतस्थळ तुमच्या इंटरनेट वापराची इत्यंभूत आकडेवारी दर्शवते. याची मदत घेऊन आपल्या माहितीग्रहणाचा तक्ता बनविता येईल. जसे नाष्ट्याच्या वेळी ठराविक वर्तमानपत्रे, सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळी अर्धा अर्धा तास ईमेल. ठराविक वेळी तास दीड तासासाठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्या व इतर कार्यक्रम. रात्री विशिष्ट वेळी तासभर फेसबुक किंवा तत्सम गोष्टी असे वेळापत्रक सर्वसाधारणपणे बनविता येऊ शकेल. या सर्वांत आवडत्या विषयावर दोन-चार ओळी लिहिण्यासाठी आवर्जून वेळ ठेवणे महत्त्वाचे आहे.

माहितीव्यवस्थापन तज्ज्ञ सध्या अस्तित्वात आहेत तो म्हणजे ग्रंथालय व माहितीशास्त्रज्ञाच्या रूपात. आधुनिक युगात माहिती स्रोतांचे बदलते स्वरूप व वापरकर्त्यांच्या सहाय्याने त्यांना हवी ती माहिती तात्काळ शोधून देण्याचे प्रशिक्षण त्याला देण्यात येते. यासाठी ग्रंथालय व माहितीशास्रातील अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. अर्थात अशी माहिती सेवा सध्या अभ्यासक, संशोधक, व्यवस्थापन इत्यादींसाठीच उपलब्ध आहे. आहार तज्ज्ञांसारखे माहितीतज्ज्ञ निर्माण करावयाचे असल्यास ग्रंथालय व मानसशास्त्रज्ज्ञांच्या मदतीने सर्वसामान्यांच्या गरजांचा आणि त्यांच्या माहिती मिळविण्याच्या वर्तनाचा अभ्यास समाविष्ट करणे गरजेचे आहे. असा अभ्यासक्रम पूर्ण करणारे उत्तम माहितीतज्ज्ञ बनतील. असे तज्ज्ञ तुमची "माहिती साक्षरता' व "माहिती शोध साक्षरता' वाढवतील व तुमच्या वैयक्तिक माहितीच्या गरजांनुसार तुमच्या दैनंदिन माहिती ग्रहणाचा तक्ता बनवून देऊ शकतील.

माहिती स्थूलत्व टाळण्यासाठी

  • पुस्तके, नियतकालिके, दूरचित्रवाणी, इंटरनेट, स्मार्टफोन या व इतर स्रोतांतून कोणती माहिती किती घ्यायची हे ठरविणे.
  • सर्व माध्यमातून माहिती घेण्यासाठी किती वेळ खर्च करायचा हे ठरविणे.
  • गरजेपुरती माहिती घेऊन माहितीचे "डाएट' करणे.
  • एखादा दिवस "माहितीचा उपवास'ही शक्‍य.
  • माहितीची उपयुक्तता, गुणवत्ता, विश्‍वासार्हता, अद्ययावतता तपासा.
  • निद्रानाश टाळण्यासाठी झोपण्याआधी दीडतास "ऑनलाइन' वाचणे टाळा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article sakal news marathi news information