भाष्य : मानवेतरांच्या अधिकारांचा जागर

Wild-Animal
Wild-Animal

‘कॉमन इंटरनॅशनल ट्रीटी ऑन एन्डेंजर्ड स्पेसीज’ (साईट्‌स) हा १८२ राष्ट्रे व युरोपीय समुदाय असे १८३ सभासद असलेला एक जागतिक सामंजस्य करार. वन्य पशू, पक्षी आणि वनस्पती या मानवेतर सृष्टीच्या संवर्धन-संरक्षणासाठी हा करार मूलभूत व महत्त्वाचा आहे. १७ ते २८ ऑगस्ट दरम्यान या कराराची १८वी जागतिक परिषद जीनिव्हात झाली. परिषदेत भारतातील काही प्राण्यांना वाढीव संरक्षण देण्याची गरज असल्याने त्यावर उपाय योजले गेले. 

वन्यजीवांच्या अवयवांचा अवैध व्यापार काही अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोचला आहे. मादक पदार्थ, शस्त्रास्त्रे यांच्या खालोखालचा तो अवैध धंदा आहे. साईट्‌स करार नसता तर तो आणखी दुप्पट झाला असता. १९७६ पासून भारत इंदिराजींच्या दूरदृष्टीमुळे ‘साईट्‌स’चा सदस्य आहे. साईट्‌स कराराची तीन मुख्य परिशिष्टे आहेत. त्याना रोमन अंकात १,२,३ असे क्रमांक दिले आहेत. पृथ्वीतलावरील ३६ हजार प्रजाती त्यात सामावल्या आहेत. परिशिष्ट -३मध्ये यातील एकूण १ टक्काच समाविष्ट आहे. यांना फारसा धोका नाही आणि यांच्या नियंत्रित, नियमन करून केलेल्या वैध व्यापाराला परवानगी आहे. यात ९५ टक्के प्राणी-पक्षी आणि ५ टक्के वनस्पती आहेत. परिशिष्ट २ मध्ये एकूण प्रजातींच्या ९७ टक्के इतक्‍या जास्त समाविष्ट आहेत. त्यातल्या ६५ टक्के प्राणी-पक्षी आणि ३५ टक्के वनस्पती. या परिशिष्टातील प्रजाती अगदी नामशेष होऊ लागल्या नसल्या तरी, विनाशाकडे वेगाने वाटचाल सुरू असलेल्या मानल्या जातात. अगदी कमी प्रमाणात त्यांच्या वैध व्यापाराला अनुमती आहे.

परिशिष्ट एक मात्र सर्वाधिक धोक्‍यात असलेल्या, नामशेष होण्याच्या आसपास आलेल्या प्रजातींचा अंतर्भाव असलेले आहे. साईट्‌स संरक्षित ३६ हजार प्रजातींपैकी यात ३ टक्के समाविष्ट आहेत. त्यातल्या १५ टक्के प्राणी-पक्षी आणि उर्वरित ८५ टक्के वनस्पती प्रजाती आहेत. या परिशिष्टातील प्रजातींचा कोणत्याही प्रकारचा व्यापार करण्यास सक्त मनाई आहे. हुदाळी म्हणजेच ऑटर्सच्या भारतात आढळणाऱ्या दोन प्रजाती म्हणजे ‘एशियन स्मॉल क्‍लॉड ऑटर’ आणि ‘स्मूथ कोटेड ऑटर’. अत्यंत निरागस, सुंदर प्राणी. त्या आजवर परिशिष्ट २मध्ये होत्या. सदर परिषदेने त्यांना असणारे धोके लक्षात घेऊन सर्वाधिक संरक्षण असलेल्या परिशिष्ट १मध्ये त्यांना अंतर्भूत केले. कुठला देश कुठल्या प्राण्याच्या मुळावर उठेल, काही सांगता येत नाही. शोभिवंत ‘पेट’ म्हणून आणि मांसासाठी जपानमध्ये ऑटर्स विलक्षण लोकप्रिय. निव्वळ २०१६-१७ मध्ये जपानसाठी पकडलेली ३९ जिवंत ऑटर्स पकडली गेली. जपानमध्ये असलेल्या ३२ ऑटर कॅफेंवर (म्हणजे काय कुणास ठाऊक!) छापे टाकून ३२ जिवंत ऑटर्स जप्त केली गेली. २०००-२०१६ दरम्यान जपानने अवैध मार्गाने ७४ ऑटर्स मिळवली होती. असेच दुर्दैव असलेल्या आणखी एका सुंदर निरागस जिवालाही परिशिष्ट २मधून एकमध्ये ‘बढती’ मिळाली आहे.(अशी बढती मिळणे याचा अर्थ देशांतर्गत संरक्षण कुठेतरी कमी पडते आहे असा होतो!) तो म्हणजे ‘इंडियन स्टार टोरटोईज’ हा कासवांचा अत्यंत देखणा प्रकार. २००४ पासूनच त्यांची संख्या जगभर ढासळत चालली होती. पारंपरिक वैद्यकातील खुळचट समजुतीमुळे औषधांसाठी, पाळण्यासाठी, पाठीवरील कवचापासून शोभिवंत वस्तू बनवण्यासाठी त्यांच्या अवैध हत्या होत होत्याच; पण २०१४ मध्ये आंध्र प्रदेशातील एका खेड्यात, वर्षभरात ५५ हजार कासवे पकडून दलालांमार्फत त्यांची विक्री झाल्याचे उघडकीला आल्यावर सगळेच हादरले होते. ‘परिशिष्ट एक’मध्ये आल्याने त्याच्या संरक्षणाला मदत होईल. 

‘वेजफिशेस’च्या सर्व प्रजाती मांस आणि कल्ले यासाठी अवैध शिकारीच्या बळी ठरत होत्या. त्यांचा अंतर्भाव परिशिष्ट २मध्ये करण्याला भारतासह अन्य ३४ देशांनी पाठिंबा देऊन ते करून घेतले. भारताच्या समुद्रात आढळणारे शोर्ट फिन आणि लाँग फिन माको प्रकारचे शार्क मासे तसेच गिटारफिशच्या सहा प्रजाती खूपच धोक्‍यात आल्या होत्या. त्यांच्यापासून मिळणाऱ्या जीवनसत्वांसाठी, त्यांना वाळवून त्यांची कातडी वापरण्यासाठी, जबड्याची हाडे आणि दात दागिन्यांसाठी त्यांच्या हत्या होत होत्या. आता या सर्व प्रजाती परिशिष्ट २मध्ये असतील. समुद्री काकड्या -तीन प्रजातीही- आता त्यात असणार आहेत. जागतिक पातळीवर पाहायचं तर जिराफाचे परिशिष्ट २ मध्ये येणे ही एक धोक्‍याची सूचना देणारी घटना म्हणावी लागेल. त्यांच्या लोकसंख्येचे कळप आता अत्यंत खंडित स्वरूपात अस्तित्वात आहेत.  वन्यजीव तस्करांच्या अनेक पद्धती ओळखून त्यांना पकडण्याची अनेक ‘स्टिंग ऑपरेशन’ करणारे क्‍लार्क बाव्हीन हे अमेरिकेच्या पर्यावरण यंत्रणेतील अत्यंत कर्तबगार अधिकारी. गेली २० वर्षे, वन्यजीवांसाठी झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यपालिका अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या नावचे जागतिक पातळीवरील पारितोषिक दिले जाते.

या वर्षीच्या अन्य पारितोषिक विजेत्यांबरोबरच भारतातील दोन व्यक्ती या सन्मानाला पात्र ठरल्या, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. एक आहेत ‘वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया’चे संस्थापक व कार्यकारी संचालक विवेक मेनन. अनेक दशकांच्या संबंधित कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी ५०पेक्षा अधिक देशांतील २० हजारांपेक्षा अधिक वन्यजीव अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले.

हत्तींसाठी आंतरमार्ग जोडमार्ग प्राधान्याने आखणे, ते राखणे आणि त्याचे दस्तावेजीकरण करणे, देशातील पहिलेवहिले प्राणी पुनर्वसन केंद्र सुरू करणे, तस्करांनी जंगलात लावलेले अनेक सापळे तोडून टाकण्याची मोहीम राबविणे, भारतीय इतिहासात आजवर सर्वांत मोठ्या, जप्त केलेल्या व्याघ्रअवयवांचा साठा शोधणे; अनेक तस्कर टोळ्या उद्‌ध्वस्त करणे.. असे त्यांचे मोठे काम आहे. वन्य जीव अपराध नियंत्रण ब्यूरोचे उपसंचालक रामेश्वरसिंग ठाकूर हे दुसरे सन्मानित. वन्य जीव गुन्ह्यांचा त्यांनी केलेला डेटाबेस, अशी गुन्हेगारी रोखण्यात मोलाचा ठरतो आहे. त्यात दोन हजार तस्करांची ‘प्रोफाइल्स’ दिली आहेत, जी तपास यंत्रणा सतत वापरतात. ते स्वतः जिवंत कासवं, मुंगसाच्या केसांपासून तयार केलेले ब्रश, शाहतूश शाली असा माल जप्त करण्यात आघाडीवर होते. कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेल्या १६ वन-क्षेत्रपालांचा सत्कारही केला गेला. मानवेतर सृष्टीचाही पृथ्वीवर अधिकार आहे, ही आठवण आपल्या मानवकेंद्री आयुष्यात अशा परिषदा करून देतात!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com