हवामानबदल : हवाओं पे लिख दो...

Climate change
Climate change

घनघोर युद्ध चालू असताना घाबरलेला एक शिपाई येऊन सेनापतीला सांगतो, ‘आपल्याला शत्रूनं सर्व बाजूंनी घेरलं आहे!’ त्यावर सेनापती उत्साहाने म्हणतो, ‘वा! म्हणजे आता आपण कोणत्याही बाजूनं किंवा सर्व बाजूंनी शत्रूवर हल्ला करू शकतो.’

माद्रिदमधील हवामानविषयक जागतिक परिषद अयशस्वी ठरल्यामुळे आलेल्या सार्वत्रिक निराशेच्या पार्श्वभूमीवर ही कथा आठवली. आजवर आम मराठी वाचक साधारणतः ‘हवामानबदल’ हे शब्द वाचले, की पुढच्या मजकुराकडे दुर्लक्ष करून पुढे जाई किंवा मनोमन हे सगळं ‘तिकडे’ लांब कुठे चालले आहे, अशी स्वतःची समजूत घालून एक नजर त्या शब्दापुढील मजकुरावर टाकून स्मरणशक्तीच्या गौण कप्प्यात ही माहिती टाकून मोकळा होई. कोणताही जीव संकटाला देतो त्या जैविक प्रतिसादांचे दोन प्रकार- ‘लढा’ (fight) किंवा ‘पळा’ (flight), त्यानुसारच हे प्रतिसाद होते. ते असे असण्याची काही प्रमुख कारणेही होती. सोप्या, वाचकांना समजेल अशा भाषेत हे संकट मुळात समजावलेच न जाणे हे त्यातले एक प्रमुख कारण. आता मात्र, हे संकट चहूबाजूंनी घेरून नाकापर्यंत आले आहे. त्यामुळे आता आपला प्रतिसाद ‘पळा’वरून ‘लढा’वर बदलणे अनिवार्य झाले आहे. आता दुसरा पर्यायच नाही. त्याची सुरुवात कुठेतरी वाचकांना हे विश्वव्यापी अरिष्ट, ते किती राक्षसी स्वरूपात आपल्यासमोर उभे आहे, मुख्य म्हणजे त्याच्या निवारणाच्या भावी दिशा काय असणार आहेत याचा भारतापुरता लेखाजोखा- तोही सोप्या भाषेत वाचायला मिळण्यापासून होते. माहितीचे अनेक स्रोत त्यांना मिळण्यापासून होते. 

हवामानबदलाविरुद्धच्या लढाईसाठी भारताला काही अक्षरशः एकमेवाद्वितीय अशी काही बलस्थाने निसर्गाने देऊ केली आहेत. त्यांच्या आधारे भारत ही लढाई फार ताकदीने खेळू शकतो; पण आपण ती पुरेपूर वापरतच नाही. प्रस्तुत लेखनातून ही बलस्थाने आपल्याला समजतील आणि भूतकाळापेक्षाही या सदराचा रोख असेल तो भविष्यातील हवामानबदलाच्या निकराच्या झुंजीवर, तरुण पिढीच्या आकांक्षा, जबाबदाऱ्या, आवश्‍यक कृतीवर आणि मुख्य म्हणजे भारतकेंद्रित लेखनावर.

सर्वप्रथम दोन महत्त्वाच्या शब्दांचे निश्‍चित अर्थ समजून घेऊ. ‘हवा’ (वेदर) आणि ‘हवामान’ (क्‍लायमेट). या संकटाला ‘हवामानबदल’ का म्हणतात ते त्यामुळे स्पष्ट होईल. हवा म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट ठिकाणची विशिष्ट वेळची हवामानाची स्थिती. वारा, तापमान, ढगाळपणा, आर्द्रता आणि हवेचा दाब - हे वातावरणाचे भौतिक पैलू ‘हवा’ स्पष्ट करतात. तर हवामान म्हणजे एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन (किमान ३० वर्षे, उदाहरणार्थ) दिसून येणारी स्थिती. हवामानाबद्दल आपले अंदाज किंवा अपेक्षा असतात. (‘आता गणपतीनंतर चांगला पाऊस व्हायला पाहिजे राव...’ ) आणि हवा आपल्याला ‘लाभते’. (अतिशय सर्द असा जुलै महिना) हवामानातले फेरफार हे हवामानातील चढ-उतार म्हणून ओळखले जातात, ते विशिष्ट कालावधीपर्यंत टिकतात आणि ऋतू, वर्षे किंवा दशकांमध्ये ते मोजले जातात. या व्याख्या पाहिल्यावर हिंदीमध्ये या संकटाचे नामकरण ‘जल वायू परिवर्तन’ असे तोकडे, मर्यादित का केले असेल, असा प्रश्न पडतो.

अत्यंत काटेकोर, वैज्ञानिकदृष्ट्या अचूक अशा, गेली २० वर्षे प्रकाशित होणाऱ्या जागतिक पर्यावरण निर्देशांकात, हवामान आणि ऊर्जाविषयक परिस्थिती या उपघटकांमध्ये,२०१८मध्ये आपले स्थान होते १८० देशांमध्ये १२० वे, इतके निम्न! अन्य काही महत्त्वाच्या संज्ञा आणि मानवजातीला हे संकट उलगडत जातानाचे काही रंजक टप्पे पुढील लेखांकात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com