नाममुद्रा : एका खेळाडूचे घडणे

Atharv-Ankolekar
Atharv-Ankolekar

मुंबई क्रिकेटची स्वतंत्र परिभाषा आहे. त्यानुसार ‘खडूस’ म्हणजे हार न मानणारा किंवा अखेरपर्यंत लढणारा. ‘खडूस’ ही या महानगरातील क्रिकेटपटूंची वृत्ती आहे, मग ते सुनील गावसकर असोत, सचिन तेंडुलकर असो, रोहित किंवा अजिंक्‍य रहाणे असो किंवा युवा अथर्व अंकोलेकर असो. १९ वर्षांखालील आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामन्याचे उदाहरण घ्या. भारत १०६ आणि बांगलादेशच्या ८ बाद १०१ अशा परिस्थितीत चेंडू हाती असलेला कोणताही गोलंदाज दडपणाखाली आला असता.

परंतु, अथर्वने अखेरच्या चार चेंडूंत दोन विकेट मिळवून मोहीम फत्ते केली. त्याने एकूण पाच विकेट घेतल्या. त्याच्या रुपाने भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर नवा तारा उदयास आला. तोही अशावेळी, की विराट कोहलीची ‘टीम इंडिया’ नव्या मोसमाची सुरवात करणार असताना. एखाद्या देशाची खेळातील प्रगती ही केवळ त्यांच्या मुख्य संघाच्या कामगिरीवर नव्हे, तर पुढच्या पिढीच्या गुणवत्ता आणि क्षमतेवर अवलंबून असते. तेंडुलकर-द्रविड यांची पिढी बघता बघता बदलली, तरी भारताचा दबदबा कायम राहिला आहे तो यामुळेच. त्यात आता अथर्वच्या रूपाने नवी पिढी कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहे, हे दर्शविणारी आहे.

केवळ एका सामन्यात किंवा स्पर्धेत सनसनाटी कामगिरी केल्यामुळे अथर्व कौतुकास पात्र आहे, असे नाही. त्याचा प्रतिकूल परिस्थितीतून झालेला प्रवास थक्क करणारा आहे. त्याचे वय नऊ वर्षे असताना ‘बेस्ट’मध्ये वाहक असलेल्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईने काबाडकष्ट करून आणि ‘बेस्ट’मध्येच वाहकाची नोकरी करून अथर्वला घडविले. अथर्वची क्रिकेट खेळण्याची प्रबळ इच्छाशक्ती आई वैदेही यांनी यत्किंचितही कमी केली नाही. धन्य ती माता. सध्याच्या घडीला क्रिकेट हा खेळ तसा खर्चीकच आहे.

पण, वैदेही यांनी आपल्या मुलाला काही कमी पडू दिले नाही. अशा परिस्थितीतून कणखर झालेली इच्छाशक्ती अथर्वला कठीण परिस्थितीत लढण्यासाठी प्रेरक ठरली. सचिनचा मुलगा अर्जुन वांद्रे येथील ज्या एमआयजी क्‍लबवर खेळतो तेथेच अथर्वही सराव करतो. एकदा सचिनने त्याचा खेळ पाहिला आणि स्वतःच्या स्वाक्षरीचे ग्लोव्हज दिले. अथर्वसाठी ही भेट लाखमोलाची आहे. ही तर सुरुवात आहे, अजून बरीच प्रगती करायची आहे, ही अथर्वच्या आईची भावना मोलाची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com