खुणावणाऱ्या वाटा

खुणावणाऱ्या वाटा

एरिक फ्रॉम यांचे एक पुस्तक आहे ‘फियर ऑफ फ्रीडम’ नावाचे. सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याचेच भय वाटत असते. एकीकडे आपण कितीही व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व मानत असलो तरी बहुसंख्य लोकांना स्वातंत्र्यच नको असते. आपल्यावर सतत कुणाचा तरी अंकुश हवा, तरच आपले भले होईल, ही धारणा खूप खोलवर रुजलेली असते. जेव्हा विज्ञान आजच्या एवढे प्रगत नव्हते, तेव्हा मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या गोष्टींपुढे माणसं हतबल होत असत. एखादा निसर्गाचा कोप; साथीचे आजार, यामुळे माणसं भयभीत व्हायची, त्यातूनच आपण म्हणजे यःकिश्‍चित कःपदार्थ! कुणातरी अज्ञात शक्तीच्या हातातील बाहुले. ती अनाकलनीय, गूढ शक्ती जशी नाचवेल तसं नाचायचं. आपल्या हाती आहेच काय? तेव्हा त्या गूढ शक्तीला शरण जावं, त्यातच आपल्या जगण्याची इतिकर्तव्यता आहे, असा समज दृढ होत गेला. त्यात माणूस स्खलनशील. त्याच्या हातून हरघडी चुका या होतच राहणार. दररोज उगवणारा दिवस हा जसा नवीन असतो, तसं प्रत्येक जिवंत माणूस हा हरघडी काही तरी नवीन करायला बघणार आणि त्याच्या हातून चुका होणार. त्यातून त्या चुकांचे परिमार्जन, प्रायश्‍चित. मग या यःकिश्‍चित सामान्य, स्खलनशील माणसांना मार्ग दाखविण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी कुणातरी अवतारी राष्ट्रपुरुषाची निर्माण होणारी गरज आणि सर्वसामान्य माणसांनी त्या अवतारी पुरुषावर एकदा विश्‍वास ठेवून आपले भवितव्य त्याच्या हवाली केले, की बस्स! कसले स्वातंत्र्य न काय?

दुसराही प्रकार घडतो. जेव्हा सर्वसामान्यांचे स्वातंत्र्य हिरावले जाण्याचा धोका असतो; आपल्या मनावर असे सतत बिंबविले जाते, की तुम्ही स्वार्थी आहात. केवळ स्वतःच्याच उत्कर्षाचा विचार तुम्ही करता अन्‌ केवळ स्वतःचाच उत्कर्ष साधणे हे समाजविघातक आहे. तेव्हा ज्या-ज्या गोष्टीमुळे माणसांचा उत्कर्ष होतो, त्या-त्या गोष्टी जे समाजहितदक्ष, निःस्वार्थी लोक आहेत, त्यांच्या हाती सोपवा. ते पाहतील समाजातील सर्वांचाच उत्कर्ष समप्रमाणात कसा होईल ते!

आजवर या दोन्ही मार्गांनी सर्वसामान्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य डावलून जे-जे पुढे आले, ते एकतर बावळट ठरले किंवा क्रूर हुकूमशहा ठरले. जिथे स्वातंत्र्याचे भय न बाळगता व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वोच्च मूल्य मानले गेले, ते ते समाज प्रगतिपथावर गेले. आज आपण विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहोत, याचा अर्थ जगाच्या निर्मितीपासून आजवरच्या सर्व मानवी पिढ्यांतील सर्वांत भाग्यवान पिढी ही आजची पिढी आहे. स्वतःच्या प्रगतीचा आज कोणताच मार्ग असा नाही, की जो एखाद्याला उपलब्ध नाही. एका बकवास हिंदी सिनेमात परवा एक खूप महत्त्वाचे वाक्‍य ऐकले, ते म्हणजे ‘इंटरनेट बडी कमाल की चीज है भाई’. माणसाला स्वातंत्र्याचे भय वाटत असेलही; पण त्यासोबत आपणास नावीन्याचेही तेवढेच आकर्षण असते, अन्‌ आज या नवनवीन खुणावणाऱ्या वाटा तर मुबलक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com