महाराष्ट्र माझा :कोकण : ‘क्‍यार’चा तडाखा केवळ निमित्त

चक्रीवादळामुळे कोकणात भातपिकाचे मोठे नुकसान झाले.
चक्रीवादळामुळे कोकणात भातपिकाचे मोठे नुकसान झाले.

‘क्‍यार’ चक्रीवादळामुळे कोकणातील बळिराजा उद्‌ध्वस्त झाला. बदलत्या वातावरणामुळे इथला शेतकरी देशोधडीला लागण्याची ही पहिली वेळ नाही. तेव्हा केवळ ओला दुष्काळ जाहीर करणे आणि पॅकेज हे यावरचे उत्तर नाही. लहरी हवामानात तग धरू शकेल असे बदल येथील कृषी क्षेत्रात करण्याची गरज आहे. 

अरबी समुद्रातील ‘क्‍यार’ चक्रीवादळ कोकणात हाहाकार माजवून गेले. त्यामुळे झालेली हानी पाहण्यासाठी मंत्री-नेते आले. शेतीत साचलेले पाणी त्यांना दिसले; पण गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या सततच्या लहरी वातावरणाच्या तडाख्याने हतबल झालेल्या बळिराजाच्या डोळ्यांत सुकून गेलेली आसवे त्यातील किती नेत्यांनी पाहिली हा प्रश्‍नच आहे. सत्तेतील कारभाऱ्यांनी ‘शेतकऱ्याला उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही’ अशी आश्‍वासने दिली; पण इथल्या शेतीची, शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे, हे फारसे कोणी डोकावून पाहिले नाही.

जागतिक हवामानबदलाचा मोठा फटका गेल्या दहा वर्षांत येथील शेतीला बसला आहे. समुद्राचा शेजार असल्याने इथे वातावरणाच्या लहरीपणाचा प्रभाव तातडीने दिसतो. इथली आंबा, काजू, भात ही पिके संवेदनशील आहेत. ऋतुचक्रावरच त्यांच्या उत्पादनाचे वेळापत्रक ठरते. त्यामुळे वातावरण बदलले की त्याचा पहिला फटका पिकांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना, त्यांच्या अर्थकारणाला बसतो. गेली दहा वर्षे या लहरी वातावरणाचा प्रभाव चढत्या क्रमाने राहिला आहे. केवळ भरपाई हा यावरचा उपाय नाही. कारण कितीही मोठे पॅकेज जाहीर झाले, तरी तुकड्या-तुकड्यांत शेती करणाऱ्या इथल्या गरीब बळिराजाला त्यातून काय उभारी मिळणार? सरकारच्या जाचक अटी-शर्तीत तो कुठे टिकणार हा प्रश्‍न आहे. शिवाय काल ‘फियान’ वादळाने मारले, आज ‘क्‍यार’ने उद्‌ध्वस्त केले, पुढे दुसरे कुठचे तरी नवे वादळ येणार, नाहीतर नैसर्गिक आपत्ती कोसळणार आणि इथला बळिराजा चिरडतच जाणार अशी स्थिती आहे.

वर्षभराची बेगमी पाण्यात
‘क्‍यार’च्या तडाख्यानंतर कधी नव्हे तो इथला भातउत्पादक शेतकरी संघटित होताना दिसला. कारण हे नुकसान त्याच्या जिव्हारी लागले. याचे मूळ समजून घेण्यासाठी इथली कृषी संस्कृती जाणून घेतली पाहिजे.

घाटमाथ्यावर ऊस, कापूस, द्राक्ष, डाळिंब आदी व्यापारी पिके घेतली जातात. यातही एकाच प्रकारच्या पिकावर भर असतो. याचा थेट संबंध बाजारपेठेशी असतो. यामुळे आपत्ती ओढवली तर शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडतो. कोकणात अगदी केरळपर्यंत ‘होम गार्डनिंग’ पद्धतीची कृषी संस्कृती पाहायला मिळते. मुळातच गुंठेवारीत असलेल्या तुटपुंज्या जमिनीत फणस, नारळ, मसाल्याची पिके, कोकम, काजू, आंबा अशी विविध पिके असतात. एका पिकाला फटका बसला, तरी दुसरे सावरते. शिवाय आधी स्वतःची वर्षाची बेगमी आणि नंतर जमलेच तर विक्री असे तंत्र असते.

यामुळे वर्षाचे आर्थिक गणित कमी पैशांमध्ये जुळवता येते. भात हा यातला महत्त्वाचा घटक. खरीप हंगामात तीन-चार महिने मेहनत घेऊन पिकलेले भात ७० टक्‍के वर्षभराच्या खाण्यासाठी आणि ३० टक्‍के गरजेला विक्रीसाठी असा ‘फॉर्म्युला’ असतो. पण यंदा ‘क्‍यार’मुळे ऐन कापणीच्या हंगामातच पावसाने तडाखा दिला. त्यामुळे ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तयार भातपीक कुजले. परिणामी लावणीसह मशागतीचा खर्च आणि श्रम वाया गेलेच; पण वर्षभराची बेगमीही पाण्यात गेली, पिकांचा चाराही गेला. आता कुटुंबाच्या वर्षाच्या पोटापाण्याबरोबरच गोठ्यातल्या जनावरांसाठी चारा कुठून आणायचा, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.

पीकपद्धतीत मोठे बदल गरजेचे 
ओला दुष्काळ जाहीर करणे, भरपाई देणे हा यावरचा कायमस्वरूपी उपाय नक्‍कीच नाही. कारण सरकारच्या जाचक निकषांत इथला तुकड्या-तुकड्यांत जमिनी असलेला, ‘सात- बारा’वर अख्खा गावाची नावे मिरवणारा शेतकरी कसा बसणार हा प्रश्‍न आहे. शिवाय भरपाई कितीही दिली, तरी ती तुटपुंजीच असते. भाताचाच विचार करायचा झाला तर त्याचा प्रतिगुंठा उत्पादनखर्च ७९२ रुपये आहे आणि भरपाई आहे ७० रुपये. खरेतर कोकणातील कृषी क्षेत्र एका गंभीर वळणावर आहे. इथली सर्वच पिके संवेदनशील आहेत. इथे वातावरणातील बदलही दर मैलावर बदलतात; पण शासकीय धोरणे, भरपाईचे निकष पारंपरिकच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे.

हवामानाचा लहरीपणा कोणाच्याच नियंत्रणात नाही; तेव्हा हे लक्षात घेऊन नुकसान ठरवणारे निकष, त्याचे वास्तववादी चित्र समजून घेणारी सक्षम यंत्रणा आणि त्याही पलीकडे पीकपद्धतीत मोठे बदल करणे आवश्‍यक आहे.

अतिपावसातही तग धरून राहतील, असे भाताचे वाण शोधून त्याचा प्रसार करायला हवा. नाचणीसह इतर पारंपरिक पिकांबाबत बदलते वातावरण लक्षात घेऊन संशोधन हाती घ्यायला हवे. ‘चांदा ते बांदा योजने’तून भातासाठी काही योजना आणल्या गेल्या; पण यातील बरेचसे निकष आणि प्रत्यक्ष शेती यात तफावत आहे. भरमसाट किमतीची मोठी यंत्रे अंशदानावर दिली जातात; पण पोटापुरती शेती होईल इतकीच जमीन असलेल्या शेतकऱ्याला त्याचा काय उपयोग याचा विचार झालेला नाही.

‘होम गार्डनिंग’ला आधुनिक स्वरूप द्यावे 
काजू, हापूस ही मूळ कोकणातील फळपिके नाहीत; पण कृषी विद्यापीठ आणि सरकार त्यांच्याच संशोधनावर, लागवडीवर भर देत आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा याच पिकांना बसला. फणस, कोकम, जांभूळ, आंब्याच्या स्थानिक जाती, मसाल्याची झाडे ही इथली मूळ फळपिके आहेत. ती बदलत्या वातावरणातही तग धरतात. कोकम ही तर कोकणची मक्‍तेदारी आहे. कोकमचे एक झाड वर्षाला सरासरी १२००, तर जांभळाचे दीड ते तीन हजारांचे उत्पन्न देते. त्यामुळे हापूस, काजूबरोबरच कोकणातील मूळ पिकांना उभारी द्यायला हवी. बांबूसारख्या गरज वाटेल तेव्हा पैसे मिळवून देणाऱ्या ‘बफर क्रॉप’चा ‘एटीएम’सारखा उपयोग शेतकऱ्यांच्या लक्षात आणून द्यायला हवा. तीरफळे, वनौषधी यांसारख्या वन्यप्राण्यांचा फारसा उपद्रव न होणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न व्हावेत. थोडक्‍यात, कोकणातील पारंपरिक ‘होम गार्डनिंग’ मॉडेल इथल्या नैसर्गिक आपत्ती, समस्या यांचा विचार करून आधुनिक पद्धतीने प्रत्यक्षात आणायला हवे. यासाठी शेतकऱ्याला आर्थिक, तांत्रिक आधार द्यायला हवा.

हे सोपे नक्‍कीच नाही. कारण कोकण कृषी विद्यापीठ गेली तीन वर्षे बदलत्या वातावरणावर संशोधन सुरू असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात येथील कृषी क्षेत्र कडेलोटापर्यंत आले, तरी हे संशोधन प्रत्यक्षात आलेले नाही. सरकारही उर्वरित महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीच्या आधारावर ठरवलेल्या निकषांचे झेंडे नाचवत आहे. सततच्या आघाताने खच्चीकरण झालेला इथला शेतकरी सकारात्मक दृष्टिकोन गमावून बसला आहे. शेतकऱ्याला उत्पादनखर्च आणि त्यावर ५० टक्‍के नफा मिळावा हे पंतप्रधानांचे स्वप्न कोकणातील शेतकऱ्यांसाठी कोसो दूर आहे. ‘क्‍यार’च्या निमित्ताने इथल्या शेतकऱ्यांची अवस्था किमान चर्चेत तरी आली. यातून भरपाई किती मिळणार, ती शेतकऱ्याला किती दिवस पुरणार हा प्रश्‍नच आहे. या सगळ्यांची गंभीर दखल घेऊन इथल्या कृषी संस्कृतीला सावरण्याच्या दिशेने ठोस पाऊल पडावे, अशी अपेक्षा आहे.

कोकणातील भौगोलिक रचना पाहता बदलत्या हवामानाला नियंत्रित करणे शक्‍य नाही. त्यामुळे त्याचा संवेदनशील फळपिकांना फटका बसणारच, हे लक्षात घेऊन येथील कृषी क्षेत्राची दिशा ठरवायला हवी. 
-  मिलिंद पाटील, कृषी क्षेत्राचे अभ्यासक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com