जयंतीतही राजकारण...

श्‍यामल रॉय, कोलकता
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

ब्रिटिश राजवटीच्या काळात क्रांतिकारकांना आश्रय देणारे एक खासगी घर ताब्यात घेऊन त्याला वारसा दर्जा देण्याचा निर्णय पश्‍चिम बंगाल सरकारने केला आहे. विख्यात बंगाली क्रांतिकारक बटुकेश्‍वर दत्त यांनी या घरात आश्रय घेतला होता. केंद्र आणि राज्य वादातून सरकारने हा निर्णय केला आहे.

ब्रिटिश राजवटीच्या काळात क्रांतिकारकांना आश्रय देणारे एक खासगी घर ताब्यात घेऊन त्याला वारसा दर्जा देण्याचा निर्णय पश्‍चिम बंगाल सरकारने केला आहे. विख्यात बंगाली क्रांतिकारक बटुकेश्‍वर दत्त यांनी या घरात आश्रय घेतला होता. केंद्र आणि राज्य वादातून सरकारने हा निर्णय केला आहे.

वर्धमान जिल्ह्यातील ओआरी येथे असलेल्या या घराला वारसा दर्जा देण्यामागे केवळ क्रांतिकारकांच्या गौरवाचा हेतू नसून, केंद्र सरकारबरोबर सुरू असलेल्या राज्य सरकारच्या वादाची पार्श्‍वभूमीही आहे. वादाचे मूळ कारण आहे वर्धमान रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा केंद्राचा फसलेला प्रयत्न. पूर्व रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या वर्धमान जंक्‍शनचे नामकरण बटुकेश्‍वर दत्त यांच्या नावाने करण्याचा घाट रेल्वे राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी घातला होता. मात्र, राज्य सरकारबरोबरच स्थानिक जैन समाजाच्या प्रखर विरोधामुळे हा प्रयत्न फसला. स्थानकाचे नामकरण करून बटुकेश्‍वर दत्त हे आमचेच असल्याचा भास भाजप निर्माण करीत असल्याचा आक्षेप सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने घेतला होता, तर वर्धमान हे जैन समाजातील महत्त्वाचे तीर्थंकर असल्याने आणि त्यांनी या परिसरात बराच काळ व्यतीत केल्यामुळे स्थानकाचे नाव बदलू नये, अशी जैन समाजाची मागणी होती. या गदारोळात नामकरण बारगळले.

बंगालबाबत भाजपच्या या पवित्र्यामुळे सावध झालेल्या पश्‍चिम बंगाल सरकारने बटुकेश्‍वर दत्त यांची १८ नोव्हेंबरला येणारी जयंती जोरात साजरी करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या ओआरी या मूळ गावी कार्यक्रम होतील. दत्त यांचा जन्म १९१० मध्ये झाला होता. महत्त्वाचे म्हणजे, क्रांती कार्य करीत असताना दत्त यांनी ज्या घरात आश्रय घेतला होता, ते घर सरकारने ताब्यात घेतले असून, त्याला वारसा दर्जा दिला आहे. हे घर खासगी असल्यामुळे सरकार त्याचे मूल्यांकन करून घर आणि सभोवतालच्या जमिनीची किंमत घरमालकांना देणार आहे. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी १९२० ते १९३० या काळात दत्त यांनी या घरात आश्रय घेतला होता. ‘हिन्दुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेबरोबर दत्त यांचा संबंध होता. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन चंद्रशेखर आझादही या संघटनेकडे ओढले गेले होते. तेव्हाच्या सेंट्रल लेजिसलेटिव्ह असेम्ब्लीमध्ये (स्वातंत्र्यानंतरची संसद) दत्त यांनी भगतसिंग यांच्याबरोबर ‘इन्किलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत बाँब आणि क्रांतीची पत्रके फेकली होती. नंतर त्यांना अटक झाली. 

इतिहासतज्ज्ञांच्या मते, बटुकेश्‍वर दत्त क्रांतिकारक होते. पण, त्यांचा उजव्या विचारसरणीशी कधी संबंध नव्हता. मात्र, महात्मा गांधीजींच्या ‘छोडो भारत’ चळवळीत दत्त सहभागी झाले होते, तसेच काँग्रेसच्या नेत्यांबरोबरही त्यांचा परिचय होता, अशी माहिती बटुकेश्‍वर दत्त वेल्फेअर ट्रस्टचे सहसचिव सरबजित जश यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article shyamal roy