‘माती’तच खरोखर जग जगते!

माती सुपीक असेल तर घराच्या गच्चीवरील बागेतही असे भरघोस पीक येते.
माती सुपीक असेल तर घराच्या गच्चीवरील बागेतही असे भरघोस पीक येते.

समाजाचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी आणि आरोग्य राखण्यासाठी जमिनीची धूप न होऊ देणे, मातीचे आरोग्य राखणे हे फक्त शेतकऱ्यांचे नव्हे, तर सर्वांचेच कर्तव्य आहे. तेव्हा लोकसहभागातून जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन असलेली लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. आजच्या जागतिक मृदा दिनानिमित्त. 

‘जमिनीची धूप थांबवा, आपले भवितव्य सांभाळा’ हे ब्रीदवाक्‍य घेऊन आजपासून जगभर संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य व कृषी संघटनेतर्फे जमिनीची धूप या महत्त्वाच्या प्रश्नासाठी जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी जमिनीची धूप हा केवळ शेतकऱ्यांच्याच, नव्हे सर्वांच्या अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकतो. 

स्वातंत्र्योत्तर काळात आपल्यासारख्या शेतीप्रधान देशात शेती व शेतकरी समृद्ध होण्याऐवजी, शेतीचा वाढता खर्च व कमी होणारे उत्पादन यांचा मेळ न घालता आल्याने, विविध कर्जमाफी योजना असूनही शेतकरी आत्महत्या करताहेत किंवा केवळ पर्याय नाही म्हणून शेती करत आहेत हे चित्र निराशाजनक आहे. या अवस्थेचे महत्त्वाचे कारण आहे आमच्या मातीच्या आरोग्याची आम्ही केलेली दुरवस्था. शेतकऱ्याच्या आजच्या स्थितीचे महत्त्वाचे कारण असलेली मातीच्या आरोग्याची स्थिती किंवा तिचा कस, त्याची कारणे याची चर्चा तर दूरच;  तिचा विचारसुद्धा होत नाही.

सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास चिंताजनक
सेंद्रिय कर्ब हा जमिनीची सुपीकता, गुणवत्ता, आरोग्य दर्शविणारा निकष, जो स्वातंत्र्य मिळतेवेळी दोन-तीन टक्के होता, तो सेंद्रिय कर्ब आता ०.३ वर आला आहे. जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम करणारे विविध घटक कार्य करत असतात. त्याचा आरसा सेंद्रिय कर्बाच्या स्थितीत दिसतो. वातावरण, वाहणारे वारे, पाणी, पाण्याचा निचरा न होणे, पिकांची अतिरेकी वारंवारिता, जमिनीची अशास्त्रीय नांगरट, चुकीच्या ठिकाणी चुकीची पीकपद्धती यामुळे सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास होतो, तर शेतजमिनीत घातले जाणारे सेंद्रिय पदार्थ, शेण, धसकटे, जमिनीत कुजणारी मुळे इत्यादी गोष्टी सेंद्रिय कर्ब वाढवितात. जमिनीतील जीवनसत्वे खनिजे इत्यादी वनस्पतीच्या वाढीसाठीचे आवश्‍यक पोषक पदार्थ वनस्पतींना खाद्योपयोगी करून देण्याचे काम जमिनीतील जिवाणू करतात या जिवाणूंच्या जमिनीतील उपलब्धतेचा निकष म्हणजे सेंद्रिय कर्ब. जमिनीत जेवढा सेंद्रिय कर्ब कमी, तेवढे जिवाणू कमी व तेवढी वनस्पतीत पोषणमूल्य साठवायची शक्‍यता कमी. कमी झालेला सेंद्रिय कर्ब सांगतो, की जमिनीतून अतिरेकी उत्पादनाच्या हव्यासापोटी आम्ही माती मरणासन्न स्थितीत नेऊन ठेवली आहे.

योग्य उपाययोजना गरजेची 
औरंगाबादचे ज्येष्ठ मृदाशास्त्रज्ञ डॉ. वराडे यांच्या म्हणण्यानुसार हा सेंद्रिय कर्ब वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्‍यक ती पोषणमूल्ये पुरविण्याचे महत्त्वाचे काम करतो. त्याचप्रमाणे तो मातीची जडणघडण, तसेच मातीचे जैविक व भौतिक आरोग्यही सांभाळतो. त्यामुळे सेंद्रिय कर्ब कमी झाला, की मातीची कमी झालेली पाणी मुरवण्याची व धरून ठेवण्याची क्षमता, कमी पोषणमूल्य धारणक्षमता, तसेच त्यामुळे बदलणाऱ्या भौतिक गुणधर्मांचा जो अभ्यास होणे गरजेचे आहे त्याकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कमी होणाऱ्या सेंद्रिय कर्बामुळे मातीमध्ये होणारे जैविक व भौतिक बदल समजून घेणे व त्यावर योग्य ती उपाययोजना उशिरा का होईना करणे गरजेचे आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या मृदशास्त्रज्ञ डॉ. ख्रिस्तीन जोन्स यांनी दाखवून दिले आहे की गेल्या पन्नास वर्षांत वनस्पतीतील खनिजे, जीवनसत्त्वे पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कमी झाली आहेत. याचे कारण जमिनीतील कमी सेंद्रिय कर्बामुळे कमी झालेली जिवाणूंची कार्यक्षमता. आपण जे अन्न खातो त्याच्यात पोषणमूल्ये नसतील, तर काय होणार आहे हे आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. सेंद्रिय कर्ब कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जमिनीची धूप. जमिनीची धूप सुरू झाली मग ती कोणत्याही कारणाने असो, त्या वेळी प्राधान्याने सेंद्रिय कर्ब निघून जातो व परिणामतः आपण कुपोषित होतो. समाजाचे व्यवस्थित पोषण व्हायचे असेल, आरोग्य राखायचे असेल तर जमिनीची धूप न होऊ देणे, मातीचे आरोग्य राखणे त्यातील सेंद्रिय कर्ब राखणे हे फक्त शेतकऱ्याचे नव्हे, तर सर्वांचे कर्तव्य आहे. हा प्रश्न आपण लोकप्रतिनिधी व शासनव्यवस्था यावर सोडून मोकळे होऊ शकत नाही. त्यासाठी लोकसहभागातून जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी डोळस शास्त्रीय दृष्टिकोन असलेली लोकचळवळ उभारणे सर्वांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. शहरातील नागरिक विघटनशील कचरा जिरवून उत्तम दर्जाचे खत तयार करू शकतात व ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ शकतात. हा प्रयोग मातीतील सेंद्रिय कर्ब व इतर महत्त्वाच्या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी व शहरातील कचऱ्याच्या समस्येसाठी उपाय ठरू शकतो. त्यासाठी लोकसहभागातून जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी, डोळस शास्त्रीय दृष्टिकोन असलेली लोकचळवळ आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी गरजेची आहे. 

(लेखक वृक्ष संवर्धिनी संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com