अवघ्या प्राणालाच कोंब आलेत हो...

अवघ्या प्राणालाच कोंब आलेत हो...

बाळोजी कदम हे नाव रायगड जिल्ह्यातील तळे गावाच्या बाहेर कोणी ऐकले असण्याची शक्‍यता नाही आणि आजच्या तळे गावातील जेमतेम एखादा टक्का लोकांना हे नाव कदाचित आठवत असेल. कारण, आता बाळोजी कदमांचा पणतूच इलेक्‍ट्रिशियन म्हणून गावात सगळ्यांना माहीत आहे. एकेकाळी बाळोजी कदम यांचा पंचक्रोशीत सर्वाधिक सारा भरणारा शेतकरी म्हणून सरकारदरबारी वट होता. कोणालाही जामीन हवा असेल तर बाळोजी कदम हेच नाव पहिल्यांदा सर्वांच्या डोळ्यासमोर येत होते. कित्येक एकर जमीन स्वतःच्या नावावर असणारे बाळोजी पश्‍चिम महाराष्ट्रात असते, तर त्यांच्या वारसांच्या नावे आज मुंबई-पुण्यात पाच-दहा फ्लॅट असते. पण, हा पडला कोकणी माणूस. मग अडीअडचणीला पुढच्या पिढ्यांनी थोडी थोडी जमीन विकली आणि आज बाबू- त्यांचा मुलगा उरलीसुरली शेती करतो. त्यात भात सोडून काही येत नाही आणि भात लावणे आता परवडतही नाही. पण, वाडवडिलांची शेती अशी ओस कशी टाकणार? मग खोट खाऊन शेती करायची आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईकरांच्या गावातील बंगल्यांची देखभाल करायची. असे बरेचसे ‘बाबू’ कोकणातील गावागावांत सापडतील. असे हे कोकणातील शेतकरी. यांना ना कोणता नेता, पुढारी मार्गदर्शन करतो, ना तेही ही परिस्थिती फारशी मनावर घेतात. 

मला काही वर्षे राष्ट्रीयीकृत बॅंकेचा शाखाधिकारी म्हणून पश्‍चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाली. तेथील अनुभव विलक्षण होता. सरकार कोणत्या नवीन योजना आणणार आहे, पंचक्रोशीतील किती जण त्याला पात्र आहेत, याची माहिती घेऊन ती योजना येण्यापूर्वीच स्थानिक नेतेमंडळी बॅंकेत येऊन भेटत. कोकणात मात्र सरकारने केलेली कर्जमाफीही कोणाला माहीत नसते. मुळात फार कोणी शेतीकर्ज घेतच नाही आणि चुकूनमाकून घेतले असेल, तर त्याला कर्जमाफीसाठी बॅंकेत अर्ज द्यायचे असतात हेच माहीत नसते. आमच्या गावाजवळ वाशी नावाचे गाव आहे. या नावाची दोन गावे आहेत, म्हणून या वाशीला बंदर वाशी असे म्हणतात. तळ्याला आलो की कधी कधी इथल्या बंदरावर ताज्या मासळीसाठी फेरफटका मारतो. असाच एकदा गेलो असताना बंदरावरच्या कोळ्यांसोबत बोलताना विषय बोटींच्या डिझेलचा निघाला. मी विचारले की येथे मच्छीमार सहकारी संस्था आहे काय? कारण तेव्हा अशा संस्थांना सवलतीच्या दरात डिझेल मिळायचे. अशी काही संस्था असते हेच त्या लोकांच्या गावी नव्हते.

आज बाबू कदम पोहे घेऊन आला होता. नवीन भात काढले की सगळ्यांना थोडेथोडे पोहे वाटतो. जे मुंबई, पुण्यात राहतात त्यांच्या गावातील दारावर दसऱ्याला नवे तोरण बांधतो, दिवाळीत पणती लावतो. पोहे देताना म्हणाला ‘‘सुनीलभाऊ, यंदा वाईच खराब आलेत, भात भिजला न्हवं!’’ मी पाहिलं जवळजवळ सगळे पोहे काळे पडलेले. म्हटले, ‘‘अरे, भात फारच भिजलेला दिसतोय रे.’’ तो म्हणाला, ‘‘यंदा हे येव्हढंच आणि समदं असंच. तांदुल पन नाय व्हनार आनी पेंडा बी नाय. पेंडा काला परलाय, बुरशी लागली, आता आगोठी पावेतो गुरांना कसा जगवायचा काय समजत नाय.’’ ‘‘अरे, मग एवढे पोहे वाटत का सुटलायस?’’ ‘‘मंग, रीत पुरी नको करायला?’’ बाबूच्या रक्तातील बाळोजी कदम काही जात नव्हता...

सगळ्या कोकणात हीच परिस्थिती आहे. भात पीक दहा-वीस टक्के हाती लागेल. बहुतेक लोकांनी हा मरणाचा पाऊस पाहून भात कापण्याचेही कष्ट घेतले नाहीत. पाहावे तिकडे सोनेरी पिवळे भातपीक आडवे पडलेले दिसतेय. आज सगळे भाताचे पीक वाया गेल्यावरसुद्धा इथे शांतता निवारा शोधत थकून आलेली दिसतेय. कोणाच्याही डोळ्यांच्या कडा पाणावून टाकणारे हे दृश्‍य संपूर्ण कोकणभर दिसतेय. विदारक परिस्थिती आहे, तरी कोकणी माणूस ढिम्म हालत नाही. बाबूला म्हटले, ‘‘अरे, शेतातल्या सगळ्या पिकाला कोंब आलेत रे. तुम्ही काहीच का करीत नाही?’’ बाबू म्हणाला, ‘‘भाऊ, भाताला काय घेऊन बसलात, इथे आमच्या अवघ्या प्राणालाच कोंब आलेत हो... आम्ही काय करणार आणि तुम्ही तरी काय करणार?’’ त्याच्या या निर्विकारपणे विचारलेल्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com