फिटे अंधाराचे जाळे

Sunita-Tarapure
Sunita-Tarapure

साखरझोपेचा मोह टाळून, अंगावरची उबदार दुलई महत्प्रयासानं दूर सारत मी प्रभातफेरीकरिता बाहेर पडते. दाराबाहेर पाऊल टाकताच तोवर धुक्‍याला बिलगून असलेली थंडी लगेच मला घेरते. जणू माझीच वाट पाहत दबा धरून होती. क्षणभर आपादमस्तक शहारते; पण काही पावलांतच शरीर बदललेल्या तापमानाशी स्वतःला जुळवून घेतं. पहाटवाऱ्यानं तनाबरोबरच मनाची मरगळ झडते. तन-मन उल्हसित होतं. घर गावाबाहेर आहे. शेत-शिवारांच्या कुशीत वसलेलं. झाडांनी वेढलेलं. त्यामुळं प्रभातफेरीचा मार्गही नयनमनोहर, शांत, मोकळा, जवळजवळ निर्मनुष्य. दूरवर कुठेतरी एखाद-दुसरा, माझ्याप्रमाणे मोहावर विजय मिळवून या प्रसन्न पहाटेत मिसळून गेलेला.
नाजूक, पांढऱ्याधोप चंद्रप्रकाशात झाडांचे माथेच काय ते दिसताहेत. तळाचा गडद अंधार भिववत असतो. अंधार उपसणाऱ्या वेड्याची गोष्ट आठवते. असाच कुणी, अंधाराला घाबरला असेल किंवा वैतागला असेल, अंधार उपसायला लागला. उपसता उपसता थकून गेला; पण अंधार तसूभरही कमी झाला नाही. पिसाटलेल्या त्याला एका शहाण्यानं सांगितलं, ‘अरे, उपसायला अंधार आहे कुठं? तू, मी, ही झाडं, पाखरं, चंद्र, चांदण्या आहेत, तसा काही अंधार असत नाही. त्याचा उगम स्रोत नाही की त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. अंधार म्हणजे प्रकाशाचं नसणं. प्रकाशाचा अभाव. तेव्हा अंधार हटवण्याकरता तो उपसत, व्यर्थ दमू नकोस. फक्त एक दिवा लाव! प्रकाश आण! अंधार चुटकीसरशी वितळून जाईल.’

चांदणं आता हळूहळू विरघळायला लागलेलं असतं. तांबूस होत चाललेल्या उगवतीकडं मी पापणी न लववता पाहत असते. अंधाराला भेदत येणारं तेजोवलय क्षितिजावर उगवताना मला पाहायचं असतं; पण माझ्या एकटक दृष्टीला चकवून तो चमत्कार केव्हा घडतो कळतच नाही. पापणी लवण्याच्या क्षणात तो लालबुंद गोळा तिथं असतो. त्याची तांबूस गोरी किरणं चराचरातल्या हरेक वस्तूतून झिरपत आसमंत उजळवू लागतात. आपली धुक्‍याची चादर स्वतःभोवतीच गुंडाळून थंडीही अंधाराच्या साथीनं पळ काढते. पक्ष्यांच्या किलबिलाटानं भवतालाला आवाज मिळतो. मरगळून, थकून झोपी गेलेल्या चराचराला जाग येते. इथल्या कणाकणांत चैतन्य सळसळायला लागतं. मनाची कवाडंही सताड उघडली जातात.

सांदीकोपऱ्यातली जाळी-जळमटं, किल्मिषं नाहीशी होऊन तिथं प्रकाशाचा कोंब फुटतो. नवस्फूर्तीचं बीज अंकुरायला लागतं. पूर्व दिशेला उदयमान झालेल्या त्या तेजोनिधी लोहगोलापुढं हात आपोआप जुळतात. माथा झुकतो. अंधाराला अस्तित्व देणाऱ्या, अभावाचं रडगाणं गाणाऱ्या मनात उमलणाऱ्या प्रकाशगीताचं नवल करत, त्या ओळी गुणगुणत मी दिवसाला भिडायला सज्ज होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com