नाममुद्रा : लडाखच्या शिखरावर मराठी झेंडा

सुरेंद्र चापोरकर
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

प्रचंड जिद्द, इच्छाशक्ती, चिकाटी आणि ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीची तयारी असेल; तर गावखेड्यातील व्यक्तीसुद्धा मोठी झेप घेऊ शकते, हे अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील सतीश खंडारे यांनी दाखवून दिले आहे. जम्मू-काश्‍मीरचे विभाजन झाल्यानंतर ३१ तारखेला अस्तित्वात आलेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले पोलिस महासंचालक म्हणून खंडारे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत.

प्रचंड जिद्द, इच्छाशक्ती, चिकाटी आणि ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीची तयारी असेल; तर गावखेड्यातील व्यक्तीसुद्धा मोठी झेप घेऊ शकते, हे अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील सतीश खंडारे यांनी दाखवून दिले आहे. जम्मू-काश्‍मीरचे विभाजन झाल्यानंतर ३१ तारखेला अस्तित्वात आलेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले पोलिस महासंचालक म्हणून खंडारे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. १९९५ मध्ये देशात ४२५ वी रॅंक मिळवून ‘आयपीएस’ झालेले खंडारे यांचे प्राथमिक शिक्षण जळका पटाचे येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण अशोक विद्यालयात झाले. त्यांचे वडील श्रीराम खंडारे हे अशोक विद्यालयात शिक्षक होते. या विद्यालयात शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत नाव कमावले असून, ते मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. तीच परंपरा सतीश खंडारे यांनी पुढे चालविली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण धामणगावातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात झाल्यानंतर त्यांनी पुण्यात जाऊन अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. १९९२ मध्ये बीई झाल्यावर आपले स्वप्न साकारण्यासाठी ते स्पर्धा परीक्षेकडे वळले आणि १९९५ मध्ये भारतीय पोलिस सेवेत दाखल झाले. जम्मू-काश्‍मीर केडरमध्ये त्यांची निवड झाली आणि पोलिस अधीक्षकपदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली. नंतर प्रतिनियुक्तीवर त्यांनी महाराष्ट्रात सात वर्षे सेवा बजावली. ‘सीआरपीएफ’मध्ये नागपूर येथे अतिरिक्त महानिरीक्षक आणि नवी मुंबईत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल विभागात ते उपमहानिरीक्षक होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा काश्‍मीरमध्ये पोलिस महानिरीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला. परिस्थितीची जाण, निर्णयक्षमता, अभ्यासाची आवड आणि जिद्दीच्या जोरावर विविध पदांवर सक्षमपणे सेवा बजावण्याचे कौशल्य असल्यानेच खंडारे यांना ही उंची गाठता आली.  

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, खंडारे यांच्या पत्नी पौर्णिमा गायकवाड-खंडारे यासुद्धा पोलिस सेवेत असून, त्या पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. पोलिस खात्यात सेवा करण्याचे स्वप्न खंडारे यांनी पाहिले होते आणि ते त्यांनी जिद्दीने पूर्ण केले. लडाखचे पहिले पोलिस महासंचालक म्हणून काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाल्याने अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिद्द आणि कष्टाच्या बळावर आभाळाला गवसणी घालता येते, हे खंडारे यांनी आपल्या वाटचालीतून दाखवून दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article surendra chaporkar