सायटेक : पचनाची समस्या? झोप घ्या!

सुरेंद्र पाटसकर
Saturday, 21 September 2019

अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या चयापचयाच्या क्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आणखी एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 

अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो. अपुऱ्या झोपेमुळे आपल्या चयापचयाच्या क्रियेवर गंभीर परिणाम होत असल्याचे आणखी एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

अपुरी झोप झाली असेल तर, दुसऱ्या दिवशी आपल्याला थकल्यासारखे वाटते. दिवसभरातील कामे करणेही अशक्‍य होऊन जाते. केवळ हेच अपुऱ्या झोपेचे परिणाम नाहीयेत. अपुरी झोप अनेक रोगांना आमंत्रण देणारी ठरू शकते; तसेच त्यामुळे चयापचय क्रियेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो आणि परिणामतः स्थूलता वाढू शकते. पूर्ण जेवण झाल्यानंतरही पोट रिकामे असल्याचा भास अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होऊ शकतो आणि समस्यांत आणखीच वाढ होऊ शकते. 

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील ऑर्फेऊ बक्‍सटन यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या संघाने झोपेबाबत केलेले संशोधन लिपिड रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. दीर्घकाळासाठी अपुरी झोप होत असेल, तर लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो, असे बक्‍स्टन यांनी सांगितले.

वॉशिंग्टन विद्यापाठातील संशोधक केली नेस यांनी विविध लोकांशी भेटी घेऊन माहिती गोळा केली. केली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध गटांसोबत चर्चा केली, त्यांच्या सवयींची माहिती गोळा केली, त्यांच्यासोबत काही खेळही खेळले, काही वेळा मुद्दामून लोकांना जागे ठेवण्यासाठी आटापिटाही केला. आपला दिनक्रम बिघडलेला असेल, तर त्याचा शरीरावर परिणाम कसा होतो, हे पाहणे असा याचा हेतू होता. एका गटाला पुरेशी झोप घेऊ दिली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना चौरस आहार देण्यात आला. या गटातील बहुतेक जण परिपूर्ण भोजनानंतरही कमी समाधानी होते.

हा प्रयोग काही दिवस करण्यात आला. त्यानंतर संशोधकांनी या सर्वांच्या रक्ताचे नमुने गोळा केले. तेव्हा अपुरी झोप झालेल्यांच्या लिपिड पेशी रक्तातून लवकर वेगळ्या होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे शरीरातील मेद साठण्याची प्रक्रिया सुरू होते.  संशोधकांनी हे प्रयोग प्रामुख्याने सुदृढ तरुण युवकांवर केले. त्यांना हृदयाशी संबंधित विकार होण्याची शक्‍यता कमी असते; तसेच प्रयोगात सहभागी झालेले सर्वजण पुरुष होते. त्यामुळे महिलांवरील परिणामांबाबत संशोधकांना काहीही निरीक्षणे नोंदविता आलेली नाहीत. परंतु, या प्रयोगातून मेदाचे पाचन करण्याची क्षमता किती आहे याचीही पाहणी केली गेली. 

मेंदूवरही परिणाम 
पुरेशी विश्रांती किंवा झोप मिळाली नाही, तर आपला स्वभाव काहीसा चिडचिडा होतो, हे सर्वांनाच जाणविले असेल. जर झोप व्यवस्थित न होणे अनेक दिवस सातत्याने सुरू राहिले, तर ‘डीसॉर्डर’ नामक मानसिक विकार उद्भविण्याची शक्‍यता असते. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपला मेंदू आपल्या भावना  ‘प्रोसेस’ करीत असतो. याच भावना आपल्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये आठवणींच्या रूपात ‘स्टोअर’ केल्या जात असतात. जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा ही प्रक्रिया गडबडते, आणि परिणामस्वरूप व्यक्ती अतिशय लहरी बनते, असेही संशोधकांना आढळले. 

अपुऱ्या झोपेचे परिणाम  
१. चयापचय क्रिया मंदावणे, सतत थकल्यासारख वाटणे, अशक्तपणा, पाठदुखी (नियमित व्यायाम केल्याने मेंदू तल्लख होतो; त्याने कार्यक्षमता वाढते.) २. उच्च रक्तदाब आणि मनावरचा ताण ३. दिवसभर आळस, काम करताना चिडचिड, नैराश्‍य तसेच कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करता न येणे. ४. विस्मरण, रक्तातली साखर वाढणं, चेहऱ्यावर सतत थकवा, लठ्ठपणा, पोटाचे विकार, डोकेदुखी, अंगदुखी ५. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे 

चयापचय क्रिया मंदावण्याची इतर कारणे 
१. पुरेशा कॅलरींचे सेवन न करणे
२. शारीरिक कष्ट न करणे, त्यामुळे शरीरातील मेद वाढतो
३. प्रथिनांचे पुरेसे सेवन न करणे- चरबी कमी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन आवश्‍यक. वजन नियंत्रित ठेवायचे असेल किंवा कमी करायचे असेल, तर प्रथिनांचे योग्य प्रमाणात सेवन गरजेचे असते.
४. चुकीच्या पद्धतीचा व्यायाम रात्रीच्यावेळी किमान सात तासांची झोप शरीरासाठी उपयुक्त असते. रात्री १० ते पहाटे ६ ही वेळ नियमित झोपेची असायला हवी. मात्र, झोपेचे वेळापत्रक बिघडल्यामुळे बहुतांश लोकांची झोप ७ तासांपेक्षाही कमी होते. त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. कोणता आहार घ्यावा, कधी घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, सूर्यास्तानंतर जेवावे की न जेवावे, अशा अनेक मुद्द्यांवर अनेकदा चर्चा झाली आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांनी त्याबाबत मार्गदर्शनही केले आहे. अपुऱ्या झोपेमुळे होणाऱ्या परिणामांचीही चर्चा या प्रयोगामुळे पुन्हा एकदा सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Surendra Pataskar