सायटेक : चंद्रावरील घरांचा आराखडा

बिगेलो एरोस्पेसने तयार केलेल्या चंद्रावरील घरांचे संकल्पचित्र.
बिगेलो एरोस्पेसने तयार केलेल्या चंद्रावरील घरांचे संकल्पचित्र.

अवकाशात झेप घेण्याची मानवी दुर्दम्य इच्छा कायम आहे. केवळ झेप घेण्याचीच नाही, तर चंद्र किंवा मंगळासारख्या ग्रहांवर वस्तीसाठी काय करता येऊ शकेल, याचीही चाचपणी सुरू आहे. अशा वस्तीसाठी घरांचे नमुनेही तयार करण्यात आले आहेत.

येत्या दहा वर्षांत अवकाशवीर चंद्रावर काही काळ राहण्याचा विक्रम करतील. या निवासासाठी चंद्रावरच फुगवता येतील अशी घरे तयार करण्यात येत आहेत. त्यांच्या चाचण्या आताच सुरू करण्यात आल्या आहेत. एखाद्या ग्रहावर राहता येण्यासारख्या घरांची निर्मिती अमेरिकेतील काही कंपन्यांकडून करण्यात येत आहे. अशा घरांपैकी पहिल्या पाच नमुन्यांची चाचण्या सध्या अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ करत आहे. अमेरिकेतील अब्जाधीश रॉबर्ट बिगेलो यांच्या बिगेलो एरोस्पेस या कंपनीतर्फे चंद्रावर राहण्यायोग्य घरांचा आराखडा तयार केला आहे. माईक जर्नहार्ट यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांची समिती त्याची तपासणी सध्या करत आहेत. 

येत्या पाच वर्षांत म्हणजे २०२४ मध्ये चंद्रावर मानवाला पुन्हा पाठविण्याची घोषणा नुकतीच केली होती. त्याचबरोबर या मोहिमेसाठी खासगी कंपन्यांनी लॅंडर, रोव्हर (बग्गी), ल्युनार गेटवे (अवकाशवीरांना घेऊन चंद्राभोवती फिरत राहणारी प्रयोगशाळा) तयार करण्याचे आवाहनही सरकारने केले होते. त्याला अनेक खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. बिगेलो एरोस्पेसने त्यात थोडी आघाडी घेतली आहे. मंगळासारख्या ग्रहांवर राहण्यासाठी कशा प्रकराची घरे तयार करता येऊ शकतील, याची चाचणी या पुढील चांद्रमोहिमांतून करण्याचा अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’चा विचार आहे. बिगेले एरोस्पेसने बी३३० हॅबिटॅट या नावाने घरांचा एक नमुना तयार केला आहे.

अंतराळ यानांमध्ये तो घडी करून ठेवता येईल. अवकाश कचरा, विविध प्रकारची किरणे यांच्यापासून बचाव करणारे कापड त्यासाठी वापरले आहे. हे घर अंतराळात नेल्यानंतर फुगविण्याची सोय आहे. फुगविल्यानंतर ते ५५ फूट लांब होते व त्याची उंची दोन मजली घरांएवढी होते. सहा अंतराळवीर त्यात राहू शकतात. यात दोन स्वच्छतागृहेही आहेत. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २०२८ हे वर्ष उजाडण्याची शक्‍यता आहे. तोपर्यंत याचा खर्च एक अब्ज डॉलरच्या घरांत पोचण्याचा अंदाज आहे. 

बोईंग, नॉरथॉर्प, ग्रुम्मन, सिएरा नेवेडा कॉर्पोरेशन आणि लॉकहीड मार्टीन या कंपन्याही इतर ग्रहांवर वस्ती करण्यायोग्य घरांचे नमुने तयार करत आहेत. या सर्व कंपन्यांना २०१७ मध्ये नासाने प्रत्येकी ६५ दशलक्ष डॉलरची निधी दिला होता. पुढील वर्षी आणि या सर्व कंपन्यांना मिळून ५०० दशलक्ष डॉलर लुनार गेटवे तयार करण्यासाठी दिले जाणार आहेत. अंतराळवीरांसाठीचे पलंग कसे असावेत, स्वच्छतागृह कशी असवीत, खिडक्‍या किती असाव्यात आदी गोष्टी या कंपन्या सुचविणार आहेत. या सगळ्यांचा विचार करून अंतराळातील घराचा अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. या घरांमध्ये एक भाग प्रयोगशाळेचा असणार आहे. इतर कंपन्यांनी तयार केलेले आराखडेही पुढील टप्प्यांत तपासण्यात येणार आहेत. त्यानंतर अवकाशातील घरांना अंतिम स्वरूप देण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com