#यूथटॉक : राजकीय जाणिवांचा नाट्यजागर

तुषार म्हस्के
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे.

राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. दोन दिवसांनंतर मतदान होणार आहे. अशावेळी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना आपण मतदार म्हणून सजग असणेही लोकशाहीसाठी गरजेचे आहे. ही जाणीव माझ्यातल्या कलावंताला नाटकाने करून दिली आहे. 

नाटक आणि माझा तसा काहीच संबंध नव्हता. आयुष्यात एक उदासीनता आली होती. अशा स्थितीमध्ये मी ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ नाट्यसिद्धांताच्या प्रक्रियेशी जोडला गेलो. या नाट्यसिद्धांताने मला रंगमंचावर उभे केले ते तत्त्वाने... एका उद्देशाने! इथून माझा कलाकार म्हणून जगण्याचा प्रवास सुरू झाला. नाटक व जीवन एकमेकांना पूरक असते, याच दृष्टीने आयुष्यातील एकेक समस्या मी नाटकाच्या माध्यमातून सोडवू लागलो आणि जीवनातील नाटक कमी होऊ लागले. मी आयुष्य खऱ्या अर्थाने जगू लागलो. या नाट्यसिद्धांताने माझ्या परिवारात, समाजात माझी एक नवीन ओळख निर्माण केली. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित नाटक ‘राजगति’ने माझ्यातील राजकारणाविषयी असणारे भाव व सुप्तावस्था जागृत केली.

बदलाची अपेक्षा नेहमी दुसरा कोणीतरी करणार आणि त्यानंतर मी बदल करणार, अशीच माझीही मानसिकता होती. पण, ‘राजगति’ नाटकामुळे जाणीव झाली, की हा देश माझा आहे आणि नागरिक म्हणून देशासाठी माझी एक भूमिका आहे- माझ्या कलेतून बदल घडवून आणण्याची! मुळात रंगजगतात काम करणारे असे किती कलाकार आहेत, जे मानतात की माझी सामाजिक भूमिका आहे आणि या भूमिकेबरोबर राजकीय समजही आवश्‍यक आहे. मुख्यत्वे कलाकार हा जनमानसाचा आवाज असतो. मानवी जीवनातील घटित-अघटित प्रश्नांचे तो प्रतिनिधित्व करतो आणि व्यवस्थेला जाब विचारतो. त्यामुळे कलाकाराची दृष्टी काळाला घडवत असते. ‘राजगति’ नाटकाच्या प्रक्रियेमुळे माझी दृष्टी स्पष्ट झाली, की राजकारणाला शिव्या देण्यात काहीच अर्थ नाही. राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी माझी भूमिका काय आहे आणि मला माझी भूमिका कशा पद्धतीने बदलता येईल, निभावता येईल, हे मला समजले. एक कलाकार म्हणून नाटक आणि सामाजिक भूमिका, राजनैतिक परिदृश्‍य याचा संबंध स्पष्ट होत गेला.

राजकारण वाईट नाही, राजकारण ही शुद्ध आणि पवित्र नीती आहे, ही संकल्पना घेऊन ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ने ‘राजनैतिक चिंतन रॅली’ आयोजित केली. राजकारणात सर्वसामान्य माणसांनी सहभागी व्हावे, त्यासाठी मी राहतो त्या भागात ही रॅली सकाळी ७:३० ते १० च्या दरम्यान काढली. जेथे पैशाविना कुठलीच राजकीय प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही, तेथे ही रॅली एकही रुपया खर्च न करता आम्ही जनतेच्या सहभागातून काढली.

महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांनी न्याय, समता आणि समानतेची मूल्ये जनमानसात रुजवत एक उन्मुक्त जीवन जगण्याची चेतना जागृत केली आणि प्रत्येकाला संघर्षाच्या लढ्यात सामील केले, त्याचप्रमाणे आम्ही रंगकर्मी जनमानसात राजनैतिक विवेक जागवण्यासाठी राज्यघटनेतील सर्वसमावेशक धोरण व मूल्ये रुजवत आहोत. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात आम्ही लोकशाही व राज्यघटनेच्या रक्षणासाठी जनसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहोत आणि राजकीय परिदृश्‍य बदलण्यासाठी जनसहभाग आवश्‍यक आहे, हा विचार सर्वसामान्य जनतेत रुजवत आहोत. देशवासीयांमध्ये राजकीय जाणिवा जागृत करण्याची आज गरज आहे. लोकशाही म्हणजे निवडणुका हरणे आणि जिंकणे एवढेच नाही, हे देशातील प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगण्याची गरज आहे. ही राजकीय जाणीव जागृत करण्यासाठी आम्ही रंगकर्मी ‘विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधानसंमत’ राजकीय पिढी घडवण्याचा संकल्प करीत आहोत.
(लेखक मुंबईतील प्रायोगिक रंगभूमीवरील कार्यकर्ते आणि रंगकर्मी आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article tushar mhaske