#यूथटॉक : आभासापलीकडचे शेअरिंग...

Vaibhav-Wagh
Vaibhav-Wagh

सध्या जगातल्या लाखो यूट्यूब चॅनेल्समुळे लाइक, शेअर आणि सबस्क्राइब हे शब्द प्रत्येकाच्या तोंडी आहेत. काही चॅनेल आपण आवडीने शेअर आणि सबस्क्राइब करतो, तर बऱ्याचदा काही चॅनेल प्रेक्षकांवर मानसिक अत्याचार करण्यासाठीच निघाले आहेत का, असा प्रश्न आपल्याला पडतो. तरी त्या व्हिडिओजच्या शेवटी हे ‘लाइक’, ‘शेअर’, ‘सबस्क्राइब’चे आवाहन असतेच.

दुदैवाने आपल्याही नकळत आपण त्याच्या खूप आहारी जात आहोत. इतके की आपल्या कट्ट्यांवर जेव्हा आपण जमतो तेव्हा त्यातला जास्तीत जास्त वेळ आपण या मोबाईल कंटेंटमध्येच बिझी असतो. कानातल्या हेडफोन्समुळे आपल्या मित्रांचे म्हणणे काय आहे, आपल्या भवतालचा ‘आवाज’ आपल्याला काय सांगतो तो ‘आवाज’ आपल्या मन आणि मेंदू यांच्यापर्यंत पोचतच नाही.

हे आता शेअर करावेसे वाटले, या मागचा प्रसंग तुम्हाला सांगतो. मी सुद्धा या आभासी जगात मग्न असतानाच उदय जगताप यांचा फोन आला. आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड मोठे काम उभे केले आहे. त्यांनी त्यांच्या गृहप्रवेश समारंभाचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, ‘या गृहप्रवेशाच्या निमित्ताने एक संकल्प केलाय. ज्या दिवशी हा प्रवेश होतोय, त्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कचनेर, हिनपट्टी, परली, झारेगुडा, कसनसूर या गावांमध्ये वीज नेतोय. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे होऊन गेली तरी अजून या गावांपर्यंत वीज पोचलेली नाही. एकतर अतिशय दुर्गम प्रदेश, घनदाट जंगले आणि त्याच्या जोडीला सरकारी अनास्था व नक्षलवाद्यांनी तिथे दिवे लागू नयेत, यासाठी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न यांमुळे आपलेच देशबांधव अजूनदेखील अंधारातच आहेत. हे ऐकून माझे डोळे खाडकन उघडले. ‘शेअर’ करायचा असतो, तो प्रकाश!

दुसऱ्यांच्या आयुष्यात आपल्यामुळे एखादा कवडसा जरी निर्माण होऊ शकला तरी केवढे समाधान मिळेल, या जाणिवेने थरारून गेलो. आनंदाचे ‘लाइक’ आणि ‘शेअर’ माझ्या मनात सुरू झाले. किती मोठा विचार आहे हा. ज्या ज्या वेळी आपल्या वैयक्तिक आयुष्यात आनंद येणार असेल त्या वेळी तो आनंद भरभरून इतरांशी वाटून घ्यायला हवा. तसा तो वाटण्याच्या वेगवेगळ्या वाटा शोधल्या पाहिजेत. त्या आनंदाच्या शेअरिंगने आपले आयुष्य अधिक प्रकाशमान होते. मग तो प्रसंग कोणताही असू शकतो. आपल्या वाढदिवसाचा, कॉन्व्होकेशनचा, प्रमोशनचा, नवीन गाडी घेतल्याचा किंवा अगदी  ‘ती’ ‘हो’ म्हणल्याचा सुद्धा... 

आता गडचिरोलीत आदर्श मित्र मंडळ राबवत असलेल्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या प्रकल्पाचेच एक उदाहरण घ्यायचे झाले तर गडचिरोलीत अशी शेकडो गावे आहेत की जिथे अजूनपण वीज नाही पोचली. या प्रकल्पाच्या अंतर्गत अशा गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे तिथल्या चावडीवर, एखाद्या झाडाच्या पारावर बसविले जातात. (हा खरतर अविश्वसनीय अनुभव आहे; पण दुर्दैवाने खरा आहे की एखाद्या गावात जेव्हा हे पथदिवे प्रकाशमान होतात त्यानंतर पुढचे काही तास त्या गावातले बायाबापडे त्या लाईटकडे विस्मयकारक नजरेने फक्त बघत असतात.) मग नंतर त्या लाईटखाली कट्टे फुलू लागतात, लहान मुले अभ्यासाला बसतात.

गाव आणि गावाचे भविष्य यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद आणण्याची सुरुवात हे सौरदिवे करतात. शे-दोनशे लोकसंख्या असलेली इथली छोटी छोटी गावे. तिथे हा प्रकाशाचा उत्सव सुरू होण्यासाठी एक सौरदिवा पुरेसा असतो आणि हे लाखमोलाचे काम करणाऱ्या सौरदिव्याची रुपयांमध्ये किंमत किती, तर जेमतेम आठ नऊ हजार रुपये...मग विचार येतो आपला आनंद कोणाबरोबर तरी अशा पद्धतीने शेअर करण्याचा विचार ज्या पद्धतीने उदय जगताप या कार्यकर्त्याने केला तसाच विचार कुठल्या तरी आनंदाच्या प्रसंगाचे औचित्य साधून आपण सगळ्यांनी केला आणि एखादे गाव ‘सबस्क्राइब’ केले तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील अशी शेकडो गावे अगदी सहज प्रकाशमान होऊन जातील. आपल्या हजारो देशबांधवांच्या आयुष्यात थोडासा का होईना आनंद येईल. या प्रकाश संवादाच्या माध्यमातून आपण तिथल्या युवकांना देशविघातक शक्तींना बळी पडण्यापासून लांब ठेवण्यासाठी आपले छोटेसे योगदान या निमित्ताने देऊ शकू. जर त्या दिव्याच्या प्रकाशाखाली अभ्यास करून एकजरी विद्यार्थी मोठा झाला, तर तो भविष्यात त्या भागातील इतरांसाठी एक ‘दीपस्तंभ’ ठरू शकतो आणि या मिशनची सुरुवात होऊ शकते; फक्त एका छोट्या विचारातून...हे ‘सक्रिय शेअरिंग’ जर रुजले तर किती छान होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com