अग्रलेख :  लोकशाहीतील कर्तव्य बजावा

अग्रलेख :  लोकशाहीतील कर्तव्य बजावा

महाराष्ट्र आणि हरियाना या दोन राज्यांतील मतदार आज एक दिवसासाठी का होईना ‘राजा’च्या भूमिकेत आहेत! महाराष्ट्रात पुढच्या पाच वर्षांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना यांची ‘युती’च राज्य ‘शर्थीने’ राखणार की काही चमत्कार घडणार, या लाखमोलाच्या कळीच्या प्रश्‍नाचे उत्तर मतदारांच्या निर्णयावर अवलंबून आहे. महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राज्य. ते केवळ आर्थिक बाबतीतच प्रागतिक आहे, असे नाही; तर सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्यामुळेच या राज्यातील निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष असले तर नवल नाही. राज्यातील सुमारे आठ कोटी ९४ लाख मतदारांना आज मत द्यायचे आहे. महाराष्ट्राबरोबर हरियानातील एक कोटी ८३ लाख मतदारही आपला हक्क बजावतील, अशी अपेक्षा आहे. या दोन्ही राज्यांतील राजकीय रंगमंचांवर गेल्या दोन-तीन आठवड्यांत जे काही नाट्य उभे राहिले, ते बघितले की आजचा दिवस हा मतदाराच्या सत्त्वपरीक्षेचा दिवस आहे, हे कळते. राजकीय पक्ष, त्यांचे नेते, स्टार प्रचारक या सगळ्यांनी त्यांना जे काही सांगायचे आहे, ते गेल्या काही दिवसांत सांगितले आहे. आता त्यावर विचार आणि योग्य ती कृती हे काम मतदाराचे.

खरे तर या दोन राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीचे डिंडीम वाजू लागले, तेव्हापासूनच हा मतदार राजा प्रश्‍नांच्या भोवऱ्यात सापडला आहे. महाराष्ट्रात शेतकरी अनेक कारणांनी गांजलेला आहे. एकीकडे कर्जबाजारीपण आणि दुसरीकडे पडणारे शेतीमालाचे भाव यातून त्याची सुटका होणे अवघड होऊन बसले आहे आणि त्याचवेळी शहरी मतदार नागरी नियोजनाच्या अपयशाच्या कचाट्यात सापडला आहे. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी प्रामाणिकपणे कोण प्रयत्न करेल, याचा विचार करून मतदान करण्याची अपेक्षा आहे. आपल्या देशात लोकसभा आणि विधानसभाच काय; महापालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या तसेच ग्रामपंचायती यांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेतल्या जात असल्या तरी त्यांचे वेळापत्रक या ‘राजा’ला दर वर्ष-सहा महिन्यांनी पेचात टाकत असते. या प्रत्येकवेळी खरे तर मतदारांनी निवडणूक नेमकी कोणती आहे, याचाच प्रथम गांभीर्याने विचार करायला हवा. लोकसभा निवडणुकीला ज्याप्रमाणे अगदी स्थानिक स्तरावरील नागरी समस्यांचा विचार करणे योग्य ठरत नाही; त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्यांपेक्षा राज्यापुढील मूलभूत प्रश्‍नांचा खल होणे अपेक्षित असते. त्यामुळेच कोणीही कितीही असे इतर विषय त्यात आणण्याचा प्रयत्न केला, तरी मतदारराजाने विचलित होण्याचे कारण नाही. नेहमी निवडणुकीच्या तोंडावर भावनिक मुद्दे पुढे आणले जातात. परंतु, भावनेला शास्त्रकाट्याची कसोटी नसेल तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते, याचेही भान  राखले पाहिजे. 

प्रचाराचे एकूण चित्र पाहिले तर, महाराष्ट्र असो की हरियाना; या दोन्ही राज्यांत काही नेत्यांचा अपवाद वगळता बहुतेक सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भावनिक मुद्यांचाच आधार घेतला आणि काहींनी तर अगदी डोळ्यांतून पाणीही काढले. पूजा-अर्चा, अभिषेक आदी बाबींमध्येही काही नेते या झंझावाती प्रचारातून वेळात वेळ काढत गुंतून गेल्याचे दिसत होते. महाराष्ट्रातील जवळजवळ दोन कोटी मतदार तरुण आहेत. त्यांच्या आकांक्षा वेगळ्या आहेत. नोकरीच्या चांगल्या संधी, घर याची स्वप्ने त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. आताची ही विशी-तिशीतील ‘डिजिटल पिढी’ भावनिक प्रचाराच्या आहारी जाऊन आपला कौल ‘इव्हीएम’मध्ये बंदिस्त करते, की व्यवहारी विचार करते, ही त्यामुळेच या निवडणुकीतील कुतूहलाची बाब आहे. जात-धर्म यांच्या जंजाळातही मतदारांना अलगद अडकावण्याचा प्रयत्न बहुतेक पक्षांचे नेते करीत असतात. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद नाही. हरियानात तर जाती-पातींच्या पलीकडला म्हणजे कोण कोठल्या गोत्राचा याचा विचारही करायला लावला जात आहे. पण आता मतदारांनीच अशांना ताळ्यावर आणायला हवे. तशा विवेकी मतदानानेच लोकशाहीत काही सकारात्मक बदल घडू शकतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडता कामा नये. पाऊस आहे, म्हणून मतदानाला बाहेर पडता आले नाही, ही सबब सांगणेही योग्य ठरणार नाही. आपल्या एका मताने काय फरक पडतो, हा विचार तर अत्यंत घातक आहे. अशा प्रकारची उदासीनता हा लोकशाहीला असलेला धोका आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या हक्क आणि कर्तव्याबाबतच्या जागरूकतेचे दर्शन आज घडवावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com