अग्रलेख : पालथ्या घड्यावर पुराचे पाणी!

कोकण व पश्चिम महाराष्ट्रात महापुराने माजविलेल्या हाहाकाराचे स्वरूप पाहता ही केवळ ‘अस्मानी’ नसून मानवनिर्मित समस्याही आहे, हे स्पष्ट होते. निदान आतातरी यापासून आपण बोध घेणार का, हा प्रश्न आहे.
अग्रलेख : पालथ्या घड्यावर पुराचे पाणी!

कोरोनाच्या महासाथीतून आता कुठे लोक ठाणबंदी शिथिल होण्याच्या प्रतीक्षेत असताना महापुराचे आणखी एक संकट राज्याच्या काही भागांत आदळले. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात; विशेषतः कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत हाहाकार झाला. या ठिकाणी आलेल्या जलप्रलयाचे स्वरूप पाहता यासंदर्भात नेहमी सांगण्यात येणारे आडाखे पूर्णपणे मोडीत निघाले आहेत. निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित समस्यांचा परिपाक म्हणूनच या महापुराकडे पाहिले पाहिजे. नदीपात्रातील किंवा ओढ्या-नाल्यातील पाण्याची शासकीय यंत्रणेने वा स्थानिक नागरिकांनी काढलेली ‘कल्पना रेषा’ ओलांडून पाणी घराघरांत घुसले. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. त्याखाली माणसे गाडली गेली. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या तीनही पातळ्यांवर प्रचंड नुकसान नागरिकांना सहन करावे लागले. वाढते शहरीकरण, घाट रस्ते किंवा डोंगरावर शेती करण्यासाठी केलेली बेसुमार वृक्षतोड, वातावरणातील वाढत चाललेले कार्बनचे प्रमाण यामुळे साहजिकच पृथ्वीवरील तापमानात वाढ होत आहे.

या तापमानवाढीमुळे समुद्रात वादळे होऊन पावसाचे वेळापत्रक बिघडते. कमी काळात जास्त वृष्टी हा त्यातीलच एक भाग आहे. एवढा पाऊस झेलण्याची ताकद आपल्याकडे नाही, याचा दारूण प्रत्यय गेले दोन-तीन दिवस येत आहे. ही अतिवृष्टी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातच होईल, असे नाही. ती अतिवृष्टी अन्य भागातही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अलिकडच्या तीन वर्षातील पावसाच्या आकडेवारून स्पष्ट होते. एक किंवा तीन दिवसांतच धुवाधार पाऊस कोसळतो आणि मागचे सगळे उच्चांक मोडतो. या पावसाचे जमिनीवर पडणारे सर्वच पावसाचे पाणी नदी, नाले वाहून नेण्यास सक्षम नसल्याने महापुराचा विळखा वर्षागणिक अधिक घट्ट होत चालला आहे. नदी, नाले, ओढे यांचे मूळ स्वरूप बदलणे, पात्र वळवणे किंवा अडवणे असे प्रकार अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी घडत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भूस्खलन झाले. डोंगर उतारावरील माती सैल झाली की भूस्खलन होते.

याचा अर्थ या ठिकाणी डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. कधी शेती करण्यासाठी असेल, कधी औद्योगिकरणासाठी असेल किंवा विकसनासाठी असेल, पण डोंगर कापले गेले. काही ठिकाणी ब्लाट करून जमीन समतल केली गेली. या सगळ्याचा परिपाक म्हणून माती सैल झाली. मातीची धूप थांबवण्यासाठी झाडेच शिल्लक राहिली नाहीत. या पद्धतीने पर्यावरणीय हानी होऊ नये, यासाठी विविध समित्या असतात, शासकीय विभाग काम करतात. त्यांचे अनेक नियम आहेत; पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याचे निर्ढावलेपण आता आपल्या सगळ्या व्यवस्थेत चांगलेच मुरले आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतो. या पुराच्या फटक्यात शंभराहून अधिक लोकांचा बळी जावा, ही खरोखर अतिशय गंभीर घटना आहे. मुख्यमंत्री आणि अन्य काही मंत्री आता पूरग्रस्त भागाचे दौरे करीत आहेत. पण केवळ मदत आणि मलमपट्टीच्या पलीकडे जाऊन प्रश्नाचा मुळातून विचार करण्याची वेळ आली आहे.

वशिष्ठी नदीच्या किनारी वसलेले आणि चारही दिशांना डोंगर असलेले शहर म्हणजे चिपळूण. तिथे दर पावसाळ्यात पूर येतो. यंदा त्याचे स्वरूप जास्तच भीषण होते. अरबी समुद्रातील भरती, अतिवृष्टी, डोंगरातून पावसाचे पाणी वाहात नदीत येणे, या कारणांबरोबरच पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे उपद्‌व्यापही दुर्घटनेस कारणीभूत आहेत. कोल्हापुरातील महापूर हा धरणाच्या पाण्यामुळे नाहीच, शहरातील अतिवृष्टीच्या पाण्याने आला. म्हणजेच हा शहरातील पूर मानवनिर्मित होता. रेड झोनमधील बांधकामे, नाल्यांना खेटून झालेली बांधकामे, नाले वळवून किंवा बुजवून झालेली बांधकामे, पुराच्या पाण्याचा धोका नको म्हणून भराव टाकून उंची वाढवण्याची पद्धत अशा विविध कारणांमुळे पाण्याच्या वाहून जाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद झाल्या. मग ते नागरी वस्तीत घुसले, तर नवल नाही. नदी काठी असलेली विशिष्ट झाडे नष्ट झाली. परिणामी धूप वाढली. शेतीच्या हानीचे हे कारण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ६३ हजार हेक्टर क्षेत्र, सांगली जिल्ह्यात २० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ऊस पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील २५० ते ३०० हेक्टर बाधित आहे. महापुराचे संकट आदळल्यानंतर जीवित, वित्तहानीची चर्चा काही दिवस होते. बैठकी आयोजित केल्या जातात. समित्या नेमल्या जातात. त्यांचे अहवालही येऊन पडतात. परंतु नंतर सगळे सामसूम होते. पुन्हा पूर आल्यानंतरच हे सगळे सोपस्कार पुन्हा सुरू होतात. गेली अनेक वर्षे असेच सुरू आहे. कोल्हापुराचे उदाहरण पाहायचे, तर रेड झोनमधील बांधकामे, नाल्या काठाजवळील बांधकामांमुळे महापुराचा विळखा वाढतो, हे १९८९, २००५ आणि २०१९च्या महापुराने दाखवून दिले, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याऐेवजी नियमांतून पळवाटा कशा काढता येतील, हे पाहिले गेले. यंत्रणा त्याच चाकोरीत काम करतात. सांगली, कोल्हापूरला अलमट्टी धरणाणुळे फुग वाढते, हे कारण पुढे आल्यानंतर तेथील कर्नाटकातील सरकारशी सन्मवय ठेऊन पाणी सोडण्याचे नियोजन सध्या चांगल्या रीतीने सुरू आहे;

मग महापुरासाठी कारणीभूत असलेल्या अन्य कारणांकडे सोयीस्कर दुर्लक्ष का? विकासाच्या भरात आपण निसर्गाशी छे़डछाड केली. दरवर्षी पुराचे पाणी ज्या भागात धुमाकूळ घालते, तेथील बांधकांमांवर निर्बंध आणले जात नाहीत,नैसर्गिक प्रवाह कसे सुरू राहतील, हे पाहिले जात नाही. हे चित्र बदलले नाही आणि योग्य नियोजन केले नाही, तर पुन्हापुन्हा आदळणाऱ्या आपत्तींना आपण आणि आपले धोरणकर्ते जबाबदार असू. निदान आता तरी यापासून धडा घेऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com