अग्रलेख :  अड्डे आणि खड्डे

dawoodibrahim
dawoodibrahim

चोहो बाजूंनी आर्थिक तसेच राजकीय कोंडी होत चाललेल्या पाकिस्तानच्या डोक्‍यावर बसलेले कुविख्यात ‘डॉन’ दाऊदचे ‘भूत’ काही केल्या उतरायला तयार नाही, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा ‍आले आहे. पाकिस्तानच्या जनतेला मोठी स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्या कारकीर्दीत ही कोंडी कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचे दिसते आहे. दाऊद इब्राहिम हा जगभरातील एक दहशतवादी; तसेच संयुक्‍त राष्ट्रांनी ‘डेसिग्नेटेड टेररिस्ट’ म्हणून घोषित केलेला क्रूरकर्मा. मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेने भारतात दहशतवादाने पहिले पाऊल टाकले. या कटाचा सूत्रधार दाऊदच असल्याचे उघड होऊन आता जवळपास अडीच दशके लोटली आहेत आणि तेव्हापासून दाऊदला भारतात आणून फासावर लटकवण्याची मागणी सतत केली जात असते. त्यामुळेच शनिवारी पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्रांच्या जगभरातील ‘वॉण्टेड’ अशा कुख्यात गुन्हेगारांच्या जाहीर केलेल्या यादीत दाऊदचे नाव, त्याचा कराचीतील पत्ता आणि त्याच्या पासपोर्टचा तपशील बघावयास मिळाल्याने, आता दाऊदला भारतात आणण्यात अवघा काही तासांचाच अवधी उरला आहे, असे वातावरण काही प्रसारमाध्यमांनी उभे केले होते. मात्र, त्यानंतरच्या काही तासांतच पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने एक पत्रक काढून या यादीत दाऊदचे नाव असले, तरी त्याचा अर्थ तो पाकिस्तानात आहे, असा होऊ शकत नसल्याचे जाहीर केले आहे. पाकिस्तानचे हे घूमजाव त्या देशाचा पूर्वेतिहास पाहता आश्‍चर्याचे नाही. असे खेळ हा देश नेहेमीच करीत आला आहे. परंतु दहशतवादाच्या मुद्यावरून ‘फायनान्शिअल ॲक्‍शन टास्क फोर्स‘ (एफएटीएफ) या संघटनेने पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट‘ मध्ये टाकले असून कठोर आर्थिक निर्बंधांची टांगती तलवार कायम ठेवली असल्याने आपण कारवाई करीत असल्याचे दाखविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो.    

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केवळ दाऊदच नव्हे तर सईद हाफीजपासून मसूद अजहरपर्यंत दहशतवादी संघटनांच्या म्होरक्‍यांच्या नावांची यादीच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने तयार केली आहे. त्यांना मदत आणि आश्रय दिल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे. ‘आपणच कसे दहशतवादाचे लक्ष्य आहोत‘, असे सांगून आणि त्या युक्तिवादाची ढाल पुढे करून कातडी वाचविवण्याचा उद्योग तो देश करीत आला आहे. संबंधित दहशतवादी व त्यांच्या संघटनांवर कारवाई केल्याचे नाटकही नित्यनेमाने पाकिस्तान करीत असतो. याहीवेळी वेगळे घडण्याची शक्‍यता नाही. पण यादी जाहीर झाल्यानंतर काही तासातच भारताने आता दाऊद प्रकरणी आक्रमक पवित्रा घेऊ नये, म्हणूनच ‘दाऊद पाकिस्तानातच आहे’ या आशयाच्या आपण दिलेल्या अप्रत्यक्ष कबुलीबाबत कानावर हात ठेवले आहेत. ‘एफएटीएफ’ ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करून त्यांना संरक्षण देण्याच्या जगभरातील उद्योगांसंबंधात ‘जागल्या’ची भूमिका बजावते. आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालणे, दहशतवाद्यांना पैसा पुरविण्याच्या व्यवहारांना चाप  लावणे अशी संघटनेची उद्दिष्टे आहेत.  या संघटनेने ठरवले तर पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी होऊ शकते. पाकिस्तान आधीच या संघटनेच्या ‘ग्रे’ म्हणजे काठावरच्या यादीत समाविष्ट आहे. आपला समावेश केव्हाही ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये होऊ शकतो आणि त्यानंतर सध्या मिळत असलेल्या अर्थसाह्यावरही गदा येऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या देशातील दहशतवाद्यांची नावे जाहीर करणे भाग पडले होते. अर्थात, ही यादी जाहीर करताना पाकिस्तानने संयुक्‍त राष्ट्रांनी ‘डेसिग्नेटेड टेररिस्ट’ म्हणून जाहीर केलेल्या नावांचा आधार घेत यादी जाहीर केली होती. आता पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याने `आपण दाऊदचा या यादीत समावेश नाव-पत्त्यासह केला असला, तरी त्याचा अर्थ त्याचे पाकिस्तानात वास्तव्य आहे, असा होऊ शकत नाही’, अशी कोलांटउडी मारली आहे. हा सारा प्रकार अनाकलनीय आहे. भारताने अलीकडेच दाऊदला भारताच्या स्वाधीन करण्यास भाग पाडण्याची मागणी थेट संयुक्‍त राष्ट्रांकडे केली होती. मात्र, आता पाकिस्तानने घेतलेल्या या दुटप्पी पवित्र्यामुळे चोहो बाजूंनी कोंडी झाल्यावरही पाकिस्तान कसा मस्तवालपणे वागत आहे, हे दिसते. एकूणच पाकिस्तान सध्या एकाकी पडत चालल्याचे स्पष्ट होत असून, अमेरिकेने त्या देशाची पाठराखण करणे थांबवले आहे. अरब जगतातूनही पाकिस्तानला मिळणारा पाठिंबा कमी कमी होत आहे. सौदी अरेबियासारखा देशही पाकिस्तानवर नाराज आहे. आता फक्त कावेबाज चीन; तसेच तुर्कस्तान, इराण, मलेशिया अशी तीनच मुस्लिम राष्ट्रे  पाकिस्तानला समर्थन देत आहेत.  अशा या अवस्थेत ‘एफएटीएफ’ या संघटनेपुढे पाकिस्तानला मान तुकवणे भाग पडले होते. ‘दाऊद आमच्या देशात नाही,’ असा दावा पाकिस्तान सरकार सातत्याने करत आहे. भारतविरोधी राजकारणासाठी दाऊदचा वापर पाकिस्तानातील नेते करत आले आहेत आणि भारतातही ‘दाऊद’ या विषयावरून होणारे राजकारण नवे नाही. पाकिस्तानने शनिवारी काही तासांत मारलेल्या कोलांटउडीमुळे या जुन्याच विषयास नव्याने फोडणी मिळाली आणि त्याचवेळी दाऊदचे `भूत’ पाकिस्तानवर कसे पकड ठेवून आहे, त्याची प्रचीती आली. दहशतवाद्यांचे अड्डे देशाला खड्ड्याकडे घेऊन चालल्याचे दिसत असूनही पाकिस्तान भानावर यायला तयार नाही, एवढाच त्याचा अर्थ.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com