अग्रलेख : इशारे आणि नगारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zelensky

युद्ध जसजसे लांबत आहे, तसतशी सगळ्यांचीच अस्वस्थता वाढत आहे. खुद्द अमेरिकाही त्याला अपवाद नाही. युक्रेनचा धावता दौरा हे त्याचेच निदर्शक.

अग्रलेख : इशारे आणि नगारे

युद्ध जसजसे लांबत आहे, तसतशी सगळ्यांचीच अस्वस्थता वाढत आहे. खुद्द अमेरिकाही त्याला अपवाद नाही. युक्रेनचा धावता दौरा हे त्याचेच निदर्शक.

रशिया-युक्रेन युद्धाला वर्ष होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेनला दिलेली भेट आणि त्याआधी परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला दिलेली निर्बंधांची धमकी यावरून वरकरणी अमेरिकी आक्रमकता दिसत असली तरी प्रत्यक्षात या सगळ्याच संघर्षातील तिची हतबलताच प्रकर्षाने समोर आली आहे. बायडेन यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही युद्ध जसजसे लांबत आहे, तसतशी अस्वस्थता वाढत असल्याचेच हा धावता दौरा हे निदर्शक आहे. युक्रेन सतत अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची मागणी करीत आहे. या पार्श्वभूमीवर देशांतर्गत दबावालाही अमेरिकी अध्यक्षांना आता तोंड द्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

चीनला दिलेल्या ताज्या इशाऱ्यामागेदेखील हीच अस्वस्थता आहे. युद्धग्रस्त रशियाला कोणत्याही स्वरुपाच्या शस्त्रास्त्रांची मदत देऊ नयेच; अन्यथा जबरदस्त किंमत मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेने चीनला दिला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्थनी ब्लिंकेन आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात म्युनिक सुरक्षा परिषदेनिमित्ताने भेट झाली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांतील अमेरिकेच्या प्रतिनिधीनेदेखील तोच राग, त्याच शब्दांत आळवला.

एवढेच नव्हे तर जाहीर व्यासपीठावर जिथे संधी मिळेल तिथे अमेरिका चीनला मदतीच्या मुद्द्यावरून खडे बोल सुनावत आहे. चिनी बलून अमेरिकेने कारवाई करून पाडला. तो टेहळणीसाठी होता की, अवकाश युद्धाच्या नव्या आयामाची चाल रचण्यासाठी पाठवलेला होता की, चिनी दाव्याप्रमाणे तो खरोखरच हवामान संशोधनासाठी होता, यावर अद्याप ठोस शिक्कामोर्तब झालेले नाही. मात्र त्या घटनेनंतर ब्लिंकेन यांनी चीन दौरा रद्द केला. अमेरिकी अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनवर आगपाखड केली होती. वातावरण चांगलेच तापले आहे. एकमात्र खरे की, अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध या दशकातील निचांकावर पोहोचले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापारयुद्ध पेटले, त्याच्या ठिणग्या अधूनमधून उडतच असतात. बायडेन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ते शमेल असे वाटत होते. तथापि, तैवानच्या मुद्यावरून पुन्हा उभय महासत्तांत राजकीय संघर्ष आणि शह-काटशह वाढला. एकमेकांना बेटकुळ्या दाखवणे सुरू आहे. रशिया-युक्रेन संघर्षाने त्याला नवे परिमाण प्राप्त होत आहे. चीनच्या दृष्टीने या युद्धाचे रशिया आणि युक्रेन यांच्यावर होणारे निर्णायक परिणाम लिटमस टेस्टसारखे आहेत. कारण त्याच्या चौकटीत भविष्यात त्यांना तैवानचा मुद्दा बसवायचा आहे, हे वास्तव आहे.

रशियाने युक्रेनवर आक्रमण करू नये म्हणून अमेरिकेने हरतऱ्हेचे प्रयत्न करूनही यश आले नाही. युद्धाच्या तोंडावर रशिया आणि चीन यांच्यात ‘अमर्याद भागीदारीचा’ (नो लिमिट पार्टनरशीप) करार करण्यात आला. त्यातून एकमेकांला सर्वतोपरी मदत करण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. युद्धाचा काळ असतानाही रशिया-चीन यांच्यातील चालू खात्यावरील व्यापार २२७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, आधीच्या वर्षी तो १२०अब्ज डॉलर होता.

मायक्रोचिप्स, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स सर्किट, संगणक यांच्यापासून विविध प्रकारची निर्यात चीनने रशियाला केली आहे. रशियाच्या युरोपीय पुरवठादारांची जागा चीनने घेतली आहे. दुसरीकडे रशियन खनिज तेलाने चिनी टाक्या ओसंडत आहेत. रशियाला चीनने अत्याधुनिक रडार, नेव्हीगेशन साहित्य, जामिंगचे तंत्रज्ञान, जेटचे सुटे भाग पुरवले आहेत. या सहकार्याच्या पर्वाला कुंपण घालण्यासाठीच अमेरिकेने पावले उचलली आहेत. चीनने रशियाला विध्वंसक शस्त्रास्त्रे पुरवू नयेत म्हणून अमेरिकाच नव्हे तर इटली, जपान, फ्रान्ससह युरोपीय देशांनी दबावाचे राजकारण चालवले आहे. त्याला चीन कितपत दाद देतो, हे पाहावे लागेल.

आतापर्यंत रशियाच्या हल्ल्याचा चीनने निषेध केलेला नाही किंवा ते युद्ध आहे, हे वास्तवही स्वीकारलेले नाही. युक्रेनमधील मनुष्यहानीबद्दल रशियाला दोषही लावला नाही. उलट, एकमेकांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा सन्मान करावा, शांततेच्या मार्गाने तोडग्याच्या प्रयत्नांना स्वीकारावे, अशी भूमिका मांडली. खरेतर शीतयुद्धोत्तर काळात रशियाचे महत्त्व टिकवण्याच्या महत्त्वाकांक्षेतून अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आखातापासून सगळीकडे अमेरिकेला रोखण्याचा प्रयत्नांत आहेत. त्याला चीनचे सहकार्य लाभत गेले आहे.

यातून अमेरिका, युरोपीय देश, जपान, दक्षिण कोरिया अशा अमेरिकापाठीराख्यांचा संघ उभा राहिला. त्याला शह देण्यासाठी रशिया आणि चीन यांनी मोट बांधणे चालवले आहे. वरचेवर अणवस्त्र चाचण्यांनी चर्चेत येणारा उत्तर कोरिया, अमेरिकेच्या नाकाखाली आण्विक कार्यक्रम राबवणारा इराण त्यांच्याबरोबर आहे. ही मांडणी अधिक बळकट झाल्यास शीतयुद्धाची नवी समीकरणे आकाराला येतील किंवा जगातील ध्रुवीकरणाचे नवे प्रारुपही ठरू शकते. तसे झाल्यास मुळातच युद्धाने उडालेला महागाईचा भडका, धोक्यात आलेली अन्न सुरक्षा, विस्कळीत पुरवठा साखळी यामुळे जगभरात लाखो लोकांच्या जगण्याचा निर्माण झालेला प्रश्‍न आणखी बिकट होऊ शकतो. रशियाचे चीनवरील अवलंबित्व वाढेल, तशी चीनची शिरजोरी वाढेल. एकमेकांविषयी अविश्‍वासाचे वातावरण आणि संशयाचे भूत मानगुटावर स्वार झाले की, भीतीपोटी सावध पावले टाकली जातात. तशीच स्थिती सध्यातरी आहे.