अग्रलेख - निखाऱ्यांशी नसता खेळ

karnataka maharashtra
karnataka maharashtra

सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये अनुभवण्यास येत असलेला तणाव म्हणजे पुन्हा एकदा मांडलेला अस्मितांचा बाजार आहे. त्यातून पेटलेल्या निखाऱ्यांची झळ सर्वसामान्यांनाच बसते आहे. अस्मितेच्या नावावर कन्नडिगांनी अरेरावी करत पुन्हा मराठीजनांची कळ काढून सीमावाद भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा परिणाम म्हणून दोन्ही राज्यांच्या सीमांवरील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दोन्ही राज्यांतील प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडलेत, तर अनेकांना आपापल्या गावी परतणे अवघड बनलेले आहे. यातून सगळे वातावरण गढूळ बनलेले आहे. महिनाभरापूर्वी बेळगाव महापालिकेच्या प्रांगणात कन्नड संघटनांच्या काही कार्यकर्त्यांनी लाल-पिवळा झेंडा उभारून बेळगाव कर्नाटकचेच आहे, हे सांगण्याचा नाहक अट्टहास केला आणि त्यातून पुन्हा वादाला तोंड फुटले. तो झेंडा हटविण्याच्या मागणीसाठी मोर्चे, आंदोलने करण्यात आली; मात्र तो झेंडा काही काढण्यात आला नाही. उलट झेंडा काढण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणाऱ्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना तुम्हीच सबुरीने घ्या, असे सांगण्यात आले. त्या वेळी शिवसैनिकांनी कर्नाटकात घुसून हदनाळला भगवा फडकवला. त्यानंतर हा विषय धुमसत असतानाच शनिवारी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमक्ष शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर हल्ला करून वाहनावरील फलक तोडून टाकला आणि काळे फासण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी मराठी दुकानांच्या पाट्यांना काळे फासले. त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उमटली आणि दोन्ही राज्यांतील प्रवासी वाहतूक ठप्प झाली. 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचे घोंगडे सहा दशकांहून अधिक काळ भिजत आहे. राजकीय पक्षांसाठी हा प्रश्‍न निवडणुकीचा मुद्दा बनून राहिलेला आहे. या प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तेथे दोन्ही राज्ये आपापले म्हणणे मांडत आहेत. दोन्ही राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा एकाच पक्षाचे सरकार होते तेव्हा हा प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्‍यकता होती; मात्र तसे कधीच झालेले नाही. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेवर आहे, तर कर्नाटकात भाजप सत्ताधारी आहे. सद्यस्थितीत दोन्ही पक्षांमधून विस्तव जात नाही. त्यामुळे या प्रश्‍नावर सध्या साधक-बाधक चर्चा होणे कठीणच दिसते. उलटपक्षी शिवसेनेने भाजपशी दोन हात केल्यामुळे कर्नाटक सरकारकडून तसेच तेथील कन्नडिगांकडून मुद्दाम मराठी भाषकांची कळ काढून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्नच सुरू असल्याचे दिसते. शिवसेना त्यावर प्रतिक्रिया न देईल तर नवलच. आणि सध्या नेमके तसेच होताना दिसत आहे. यामधील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा जेव्हा कर्नाटकात राजकीय पटलावर अस्थिरता निर्माण होते किंवा काही मोठ्या घडामोडी घडू पाहतात तेव्हा तेव्हा सीमाप्रश्‍नाचा मुद्दा पुढे आणून वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होतो. मराठी भाषकांवर दंडेलशाही करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो. यातून नाहक तेढ वाढत राहते. बेळगावसह सीमाभाग आमचाच आहे, अशा गर्जना कन्नडिगांकडून वारंवार केल्या जातात आणि मराठी भाषकांना वेठीस धरले जाते. कर्नाटक प्रशासन प्रत्येकवेळी बघ्याची भूमिका घेते. कोणतीही राजवट याविषयी ठोस भूमिका न घेता हा मुद्दा भावनिक पातळीवरच राहील हेच पाहते.

अस्मितांवर फुंकर घालून सीमावादाचा विषय पेटवण्याचा प्रयत्न केला जात असताना, सामान्य माणसाच्या जगण्याचा मुद्दा मात्र बाजूला पडतो. कोरोनाच्या तडाख्यामुळे मोडकळीस आलेलं जगणं पुन्हा उभे करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने धडपडत आहे. मिळेल ते काम करून जगणं सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा वेळी असे उफाळून येणारे वाद जगण्याच्या चक्राला थांबवतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारी चाके जेव्हा थांबतात तेव्हा त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसतो. व्यापार थांबतो, पैसा थबकतो. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत उभी राहते. कर्नाटकातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बससेवा चालते. त्यावरच कर्नाटकातील वायव्य परिवहन मंडळाचा आर्थिक डोलारा उभा आहे. आणखी काही दिवस तेथून बससेवा बंद राहिल्यास तेथे पगार देणेही अवघड होणार आहे. अशावेळी राज्यकर्त्यांनी खोड्या काढणाऱ्या मुठभर गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना वेसण घालणे आवश्‍यक आहे. जो विषय सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत आहे असा विषय रस्त्यावर आणून तेढ निर्माण करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त करण्याची आवश्‍यकता आहे. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून वास्तवाचे भान राखत वाद चिघळणार नाहीत हे पहायला हवे. चेतवणारी भाषणे करण्यापेक्षा सर्वसामान्यांचे हित पाहणे आवश्‍यक आहे. देशाची एकात्मता, राष्ट्रवाद याविषयी उच्चरवात भूमिका मांडणाऱ्या भाजपची सत्ता कर्नाटकात आहे. मराठी बांधवांना त्रास देणाऱ्या त्या भागातील कन्नडिगांना आवर न घालता स्वस्थ बसून राहणे हे  त्या भूमिकेला छेद देणारे आहे, एवढे तरी तिथल्या सरकारने लक्षात घ्यायला हवे. मराठी माणूस खोडसाळपणाला चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे. पण तो सुज्ञ आहे. आत्ता वेळ जगण्याची लढाई जिंकण्याची आहे...अस्मितांवर स्वार होऊन भडकण्याची नाही हे तो जाणतो.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com