
‘जग हे करणे शहाणे बापा’ असे म्हणणाऱ्या, साहित्याच्या मार्गाने जग शहाणे करता येईल, यावर विश्वास असलेल्या आणि तशी कृतीही करणाऱ्या संत गोरोबा कुंभार यांच्या भूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावे हे उचितच झाले.
‘जग हे करणे शहाणे बापा’ असे म्हणणाऱ्या, साहित्याच्या मार्गाने जग शहाणे करता येईल, यावर विश्वास असलेल्या आणि तशी कृतीही करणाऱ्या संत गोरोबा कुंभार यांच्या भूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरावे हे उचितच झाले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
संतसाहित्याचा ज्यांचा अभ्यास आहे, संतवाणी ज्यांच्या अधरी आहे आणि संतांचे मार्दव ज्यांच्या अंतःकरणी आहे, असे फादर फ्रान्सिस दिब्रिटो या संमेलनाचे अध्यक्ष असणे हेही योग्यच झाले. दिब्रिटो हे गुणवान साहित्यिक आहेत, त्याचबरोबर ते अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध, पर्यावरणासाठी रस्त्यावर उतरणारे लढवय्ये कार्यकर्तेही आहेत. वातावरणातील विषारी वायू ओळखून आसपासच्या सर्वांना सावध करणारे संवेदनशील कविहृदय त्यांच्यापाशी आहे, ही त्यांची सारीच वैशिष्ट्ये त्यांच्या विचारात, लेखणीत, भाषणात उमटत असतात. त्यांची एरवीची भाषणेही मृदू, खालच्या पट्टीतील असतात, तरीही त्यांना जे सांगायचे ते ते ठामपणे मांडतात. त्यामुळे एरवीही ऐकताना मवाळ वाटणाऱ्या त्यांच्या भाषणातील सत्याग्रही सूर विचारातील कणखरता प्रखरतेने प्रकट करणारा असतो. त्यामुळेच मराठी साहित्यक्षेत्राचे नेतृत्व करण्यासाठी निघालेल्या फादर दिब्रिटो यांच्याकडून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात अशाच प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा होती.
मात्र, मराठी भाषेच्या चिंतेपासून डिजिटल युगापर्यंत आणि असहिष्णू वातावरणापासून पर्यावरणाच्या हानीपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करीत निघालेल्या दिब्रिटो यांनी लढवय्या कार्यकर्त्याचा सत्याग्रही सूर लावण्याऐवजी ‘मवाळ हळवे सूर’च गायिले. मात्र, एक गोष्ट संमेलनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर घडली. साहित्यिकांच्या कृतिशीलतेवर भर देणाऱ्या दिब्रिटो यांनी वसईकरांना आवाहन केले होते, की शाल-श्रीफळाऐवजी मराठवाड्यातील दुर्दैवी शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात पुढे करूया. वसईकरांनीही पंधरा लाख रुपये जमा करून त्यांना साथ दिली. आता ही सहसंवेदनेची साथ पसरायला हवी.
वेदनेतून अभिजात साहित्य प्रसवले जाते, या सत्याची फादर दिब्रिटो यांनी पुन्हा मांडणी केली. मात्र, आजच्या घडीला साहित्याचे प्रयोजन काय असले पाहिजे, हे नेमकेपणाने त्यांनी सांगितले नाही. हृदयात काटा घुसवून घेऊन अभिजात गाणे गाणाऱ्या कंटक पक्ष्याची कहाणी ऐकवून त्यांनी साहित्यिकांना, कलावंतांना आवाहन केले खरे; पण आसपास वाढत चाललेल्या काटेरी जंगलाला आव्हान देण्यासाठी साहित्यिकांना प्रवृत्त करण्याइतकी आवाहकता त्यात दिसली नाही. मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता कधी नव्हे, तेवढी आज वाढली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मराठीपुढच्या आव्हानांची चर्चा वेळोवेळी झाली आहे. मराठी माध्यमाची, मराठी भाषा अध्यापनात अनिवार्य करावी यासंबंधीची, शैक्षणिक दर्जाची चर्चा सध्या होऊ लागलेली आहे. आजवर झालेल्या या चर्चेची उजळणी दिब्रिटो यांनीही केली आहे. ‘जे जिवंत आहे, त्यापुढे जगण्याचे आव्हान असते, त्यावर मात करून ते टिकाव धरते,’ हा सुविचार ऐकवून ते थांबतात. वसईतील पर्यावरणासाठी त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. पण, ही ‘श्वासाची लढाई’ जिंकण्यासाठी ‘पर्यावरण रक्षण करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य आहे’, एवढीच जाणीव ते करून देतात. साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठावरून वेगवेगळ्या प्रश्नांचा ऊहापोह केला गेला पाहिजेच.
राजकारणापासून पर्यावरणापर्यंत सर्वच क्षेत्रांवर साहित्यिक व्यासपीठावरून चर्चा झडलीच पाहिजे, तशी ती येथे होते. पण त्यासंबंधीची अहवालात्मक माहिती दिल्यानंतर ठाम विधानही करायला हवे, तरच त्या चर्चेला अर्थ उरतो. आणीबाणी न लादताही नागरी स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे, धर्माच्या नावाने भेदाभेद होत आहे, एखाद्या प्रदेशाला नजरकैदेचे स्वरूप आलेले असते, सर्वसामान्यांची उपजीविकेची साधने हिरावून घेतली जातात, शिक्षणात मराठीची उपेक्षा होत आहे, या सगळ्याची जाणीव ते करून देतात. धर्मनिरपेक्ष घटना सुरक्षित असेपर्यंत देशाच्या अखंडतेला धोका नाही, ही आश्वासकता व्यक्त करतात. सर्जकांचे द्रष्टेपण कलात्मकरीतीने व्यक्त होताना काही वेळा ते प्रक्षोभक असू शकते; मात्र परंपरावाद्यांना आणि संस्कृतिरक्षकांना ते पचवणे अवघड जाते याकडे ते लक्ष वेधतात. या शिखर व्यासपीठावरून दिब्रिटो हे समाजासमोरच्या विविध प्रश्नांची मांडणी करतात; मात्र कोणतेही ठाम विधान करण्याआधीच थांबतात. आता हेच पाहा, बडोद्याच्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून ‘राजा, तू चुकलास’ असे लक्ष्मीकांत देशमुख यांनी खडे बोल सुनावले होते; पण नंतरच्या दोन वर्षांत बाहेरचे वातावरण अधिकच बिघडलेले आहे, याची जाणीव करून देतानाच दिब्रिटो मवाळ सुरात सांगतात, ‘राजा, कठोर आत्मपरीक्षणाची वेळ जवळ आली आहे.’ दिब्रिटोंमधील लढवय्या कार्यकर्त्याची गर्जना ऐकू आलीच नाही; व्यासपीठावरून झाले ते कनवाळू धर्मोपदेशकाचे प्रवचन.