अग्रलेख : व्हायरस अधिक व्हायरस!

Virus
Virus

कोरोना विषाणूच्या साथीने घातलेल्या थैमानाला खंबीरपणे तोंड देता देता सारे जग बंद घरांमध्ये अडकून पडले आहे. ‘सामाजिक अंतर ठेवा, तोंडाला मास्क गुंडाळा, हात धुवा आणि सॅनिटायझर वापरा,’ अशासारख्या सूचनांचे पालन करत घरातच थांबून राहिलेले जग हात बांधून बसले आहे, असे मात्र नाही. रस्ते आणि कार्यालये ओस पडली असली तरी बरीचशी कामसू माणसे आपापल्या घरात कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप उघडून ‘वर्क फ्रॉम होम’चे कित्ते गिरवत आहेत. घरबसल्या छोटी-मोठी कामे उरकत आहेत.

मोठमोठाल्या कंपन्यांची कार्यालये कुलूपबंद असली, तरी त्यांचे लक्षावधी कर्मचारी आपल्या घरातून व्हिडिओ कॉल, कॉन्फरन्स कॉल, किंवा इ-मेलच्या माध्यमातून जमेल तसे काम रेटत आहेत. सारे काही ठप्प पडलेले असताना थोडी तरी आर्थिक धुगधुगी असायला हवी, हे खरेच. कुणाला बिले भरायची आहेत, कुणाला मासिक हप्ते चुकते करायचे आहेत, कुणाला जीवनावश्‍यक वस्तूंची ऑनलाइन ऑर्डर द्यायची आहे, तर कुणाला व्यवहार वेळच्या वेळी पूर्ण करायचे आहेत. पण कोरोनाचा विषाणू उंबरठ्याबाहेर पडू देत नाही. अशा परिस्थितीत घरातल्या घरात कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा हातातला स्मार्ट फोन याचा अवलंब करावा लागणारच.

‘कोरोना’च्या कचाट्यात सापडलेल्या जगाला आणखी एक असुर सध्या ग्रासतो आहे. तो आहे सायबर गुन्ह्यांचा. लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या संख्यात लक्षणीय वाढ झालेली सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांत एकट्या महाराष्ट्रातच, फसवणूक आणि अफवांच्या गुन्ह्यांमध्ये थोडीथोडकी नव्हे, तब्बल पंचवीस टक्‍के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याचे कारण उघड आहे. ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करणाऱ्यांना इंटरनेटचा वापर करणे क्रमप्राप्त ठरते आहे. परिणामी सायबर दळणवळणात प्रचंड वाढ झाली आहे. साहजिकच सायबर दरोडेखोरांचेही फावते आहे.

मोठमोठाली किंवा मध्यम स्वरूपाच्या संस्था-कंपन्यांची कार्यालये इंटरनेट सुविधांच्या बाबतीत बऱ्यापैकी सुसज्ज असतात. उत्तम दर्जाच्या सायबर सुरक्षा प्रणाली वापरून आपले काम सुरळीत चालेल, याची व्यवस्था बव्हंशी कार्यालयीन ठिकाणी असते. परंतु, घराघरांत मात्र इतकी काटेकोर सुरक्षा मिळेलच याची शाश्‍वती नसते. याचाच फायदा उचलत सायबर दरोडेखोरांनी ‘फिशिंग’ आणि ‘व्हिशिंग’चे उद्योग सुरू केले आहेत, असे दिसते. ‘तुमच्या खात्यात अमूक इतकी रक्‍कम टाकण्यात आली असून, रक्‍कम टाकणाऱ्याची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जा, ओटीपी नमूद करा,’ असल्या सूचनांच्या मेल ‘इनबॉक्‍स’मध्ये येऊन पडतात. चुकून जरी ही लिंक क्‍लिक झाली तर आपले सारे खात्याचे तपशील चोरांच्या हातात गेलेच म्हणून समजा! याला ‘फिशिंग’ म्हणतात. ‘व्हिशिंग’ म्हणजे व्हॉइस कॉलच्या आधारे केलेले ‘फिशिंग’च! इथे संबंधिताला बॅंक कर्मचारी असल्याचा फोन येतो आणि मखलाशीने खात्याचे तपशील काढून घेतले जातात. ‘कोरोना’बाधितांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पीएम-केअर्स’ निधीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच ‘पीएम-केअर्स’साठी अमूक इ-मेल पत्त्यावर रक्‍कम पाठवा’ असे सांगणाऱ्या डझनावारी साइट्‌स उद्‌भवल्या! येथे पाठवलेली रक्‍कम कुठल्या तरी सायबर दरोडेखोराच्या हातात जाणार हे तर उघड होते.

‘कोविड-१९’ ची मोफत तपासणी करून देण्याच्या ऑफर्सदेखील अनेक ठिकाणी अवतरल्या. ऑनलाइन शॉपिंगसाठी उत्सुक असलेल्या तरुणाईवर मोहजाल फेकणारे सायबरखोरदेखील आहेत. वास्तविक जीवनावश्‍यक वस्तू वगळता कुठलीही अन्य वस्तू वा सेवा सध्या कार्यरत नाही. परंतु, वाट्टेल त्या चंगळीच्या वस्तू घरपोच डिलिव्हरीच्या आश्‍वासनासहित पुरवणारी स्थळेही अचानक अवतरली. केरळ आणि तेलंगणात तर ‘क्रेडिट कार्डाने पेमेंट करा, घरपोच मद्य मिळवा’ असल्या ऑफर्स मोबाइल फोनवर येऊन धडकू लागल्या. गुजरातेत नर्मदा सरोवर धरणासमोर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच असा सरदार पटेलांचा उत्तुंग पुतळा तीस हजार कोटी रुपयांना विकणे आहे, अशी जाहिरात एका प्रसिद्ध संकेतस्थळावर झळकली. असे सारे गुन्हे ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करणाऱ्या जमातीला जाळ्यात ओढण्यासाठीच घडले व अजूनही घडत आहेत. अशा गुन्ह्यांना रोखण्यासाठी ‘सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम’ (सीइआरटी) नावाचे पथक कार्यरत आहे.

परंतु, या गुन्ह्यांचा ओघ इतका प्रचंड आणि व्यापक आहे की त्यांना संपूर्ण प्रतिबंध करणे, अशक्‍य व्हावे. यावरचा एकमेव उपाय ‘कोरोना’च्या साथीनेच सांगून ठेवला आहे. तो आहे सायबर आरोग्याचा. शरीराच्या आरोग्याइतकेच सायबर आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे आणि ‘वर्क फ्रॉम होम’वाल्यांना त्याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक तास इंटरनेटवर सक्रिय राहण्याचे काही तोटेही असतात, त्यापैकी हा एक. ‘कोरोना’ काय, किंवा सायबर गुन्हे काय, दोन्हीही व्हायरसच! त्यांचा प्रतिबंध करण्याचा ज्ञात उपाय एकच- मास्क लावा, आणि सामाजिक अंतर ठेवा! सध्या तरी आपण एवढेच करू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com