अग्रलेख : ‘जिओ’... और जीने दो

Digital-System
Digital-System

‘गुगल’ या अवघी दुनिया व्यापून टाकणाऱ्या डिजिटल यंत्रणेची स्थापना डॉक्‍टरेट करत असलेल्या लॅरी पेज आणि सर्जी या दोन विद्यार्थ्यांनी १९९८ मध्ये केली, तेव्हा आणि नंतरच्या सहा वर्षांतच ‘फेसबुक’ नावाचे संवाद माध्यम मार्क झुकेरबर्ग या १९ वर्षांच्या युवकाने व्हर्च्युअल विश्वात आणले, तेव्हा अनेकांनी आश्‍चर्याने तोंडात बोटे घातली होती. पुढच्या दोन दशकांत हेच तरुण ‘डिजिटलचे सम्राट’ म्हणून जगभरात ओळखले गेले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, आता याच दोन माध्यमांच्या हातात हात घालून, किमान भारतात तरी डिजिटलचे सम्राट मुकेश अंबानीच असतील. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून अधोरेखित झाले ते हेच वास्तव. गेल्या काही महिन्यांत सारे जग कोरोना विषाणूच्या थैमानामुळे अस्वस्थ आणि आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडले असताना, ‘रिलायन्स’ कंपनीने ‘कर्जमुक्त’ तर होऊन दाखवलेच; शिवाय याच काही महिन्यांत दोन लाख कोटींची गुंतवणूकही जगभरातून पैदा केली!

भारताच्या डिजिटल प्रगतीला अधिक वेगाने चालना देण्यासाठी ‘गुगल’ने भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यासंबंधात केलेल्या घोषणेनंतर चार दिवसांतच त्यापैकी ३४ हजार कोटींचा घसघशीत वाटा हा ‘रिलायन्स जिओ’च्या पदरात पडला आहे! ‘गुगल’च्या एकूण प्रस्तावित गुंतवणुकीपैकी ही रक्कम ४५ टक्के आहे. अंबानी यांनी या घोषणेबरोबरच आणखी अनेक निर्णय या सर्वसाधारण सभेत जाहीर केले. त्यापैकी सर्वात ‘मूल्यवान’ निर्णय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेतून ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञान विकसित करण्याचा. एकदा हे तंत्रज्ञान ‘जिओ’कडे आहे, हे स्पष्ट झाले की पुढे जेव्हा केव्हा हा ‘फाईव्ह जी’चा स्पेक्‍ट्रम सरकार ‘बाजारा’त आणेल, तेव्हा त्या स्पर्धेत ‘रिलायन्स जिओ’च बाजी मारेल, हे भविष्य ‘गुगल’वर सर्च केले तरी सहज कळू शकेल!

‘रिलायन्स जिओ’चे आजमितीला ३७ कोटी ग्राहक असल्याचा दावा याच सर्वसाधारण सभेत करताना, अंबानी यांनी पुढच्या तीन वर्षांत हे जाळे ५० कोटी ग्राहकांपर्यंत पोचवण्याचा दावा केला आहे. टेलिकॉम आणि डिजिटल क्षेत्रांतील प्रतिस्पर्धी कंपन्यांवर मात करण्यासाठी ‘रिलायन्स जिओ’ने अवलंबिलेले तंत्र अगदीच साधे सरळ असे व्यापारी गणित मांडणारे होते. अन्य कंपन्यांपेक्षा कमालीच्या स्वस्तात ‘डेटा’ उपलब्ध करून देतानाच त्यांनी ‘अँड्रॉइड’ची सुविधा उपलब्ध असलेला फोनही बाजारात आणला. अर्थात, त्याची किंमत बाजारातील अन्य सेलफोनच्या तुलनेत नगण्य असेल, याची दक्षता त्यांनी घेतली! आताही याच सभेत ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञान सहजपणे आत्मसात करू शकेल, असा सेलफोन अगदीच कमी किमतीत बाजारात आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

छोटे किराणा दुकानदार या डिजिटल माध्यमाशी जोडून घेताना, ‘गुगल-पे’ सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्या प्रमाणात केला जाईल. त्यातून या छोट्या किराणा दुकानदारांचा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. आपल्या भाषणात अंबानी यांनी देशातील अनेक स्टार्ट अप्सना जोडून घेण्याचा मनोदय व्यक्त केला. लहान व मध्यम अशा क्षेत्रातील अनेक उद्योजकांना बाजारपेठेची उपलब्धता, भांडवल उभारणी आणि उत्पादन विकासासाठी याचा फायदा होऊ शकेल. अशा प्रकारे अवघे भारतीय डिजिटल विश्व आणि व्यापार व्यापून टाकण्यासाठी ‘रिलायन्स’ उचलत असलेल्या या पावलांमुळे काही मूलगामी मुद्देही ऐरणीवर आले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा आहे तो ग्राहकांच्या स्वत:संबंधातील वैयक्तिक ‘डेटा’च्या मालकी हक्काचा. या मालकीला संरक्षण देणारा कायदा आजमितीला भारतात नाही. अशा कायदेशीर चौकटीची आपल्याला नितांत गरज आहे. ग्राहकांच्या सवयी आणि त्यांची जीवनशैली यासंबंधातील वैयक्तिक, तसेच खासगी तपशील या डिजिटल कंपन्यांच्या हातात आता अगदी सहजगत्या जाऊन पडतील.

भारतातील प्रचंड अशा बाजारपेठेची नस या बलाढ्य उद्योगसमूहाच्या हातात जाऊ शकते. आर्थिक-औद्योगिक शक्ती अशी एकवटली आणि नियमनाची यंत्रणा भक्कम नसेल, तर स्पर्धेचा परीघ आक्रसत जातो. प्रचंड संख्येने असलेल्या ग्राहकांच्या संपूर्ण माहितीचा खजिना हाती आल्यानंतर या ग्राहकांच्या खरेदीच्या सवयी काय हे कळू शकते. त्यात आपल्याला अनुकूल असे बदल घडवून आणणेही त्यांना सहज शक्‍य होईल.

भाजीपासून वस्त्रप्रावरणापर्यंत अनेकानेक उत्पादने आणि विविध सेवा पुरवणारे एकच छत्र निर्माण होणे, हे उद्योग क्षेत्रातील एकछत्री साम्राज्यासारखेच. यातून तयार होणारी मक्तेदारी ग्राहकांचे स्वातंत्र्य झाकोळून टाकू शकते. त्यामुळेच याबाबतीत सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. स्पर्धेसाठी पुरेसा अवकाश शिल्लक आहे ना याची काळजी सरकारने करणे आवश्‍यक आहे. ‘जिओ’चा डंका पिटताना ‘जीने दो’चे तत्त्व विसरता कामा नये.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com