अग्रलेख : अमेरिकी राग‘रंग’

kamala-harris
kamala-harris

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली, की भावनिक, वांशिक, सांप्रदायिक वगैरे मुद्‌द्‌यांचा धुरळा उडवला जाणे, हे एकेकाळी ‘तिसरे जग‘ म्हटल्या जाणाऱ्या देशांतच घडते, अशी एक समजूत होती. काही प्रमाणात ते कटू वास्तव होते आणि आहेच; परंतु पुढारलेल्या देशांतही प्रचाराला तसेच वळण दिले जाते, याचा प्रत्यय अमेरिकी निवडणुकीत ठळकपणे येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृष्णवर्णीय नागरिकाची गोऱ्या पोलिसाने केलेली हत्या आणि त्यानंतर झालेली आंदोलने यामुळे त्या देशात ध्रुवीकरण होऊ लागले आणि राजकारण्यांनी; विशेषतः सत्ताधाऱ्यांनी ते वाढविले. ट्रम्प विरुद्ध ज्यो बिडेन यांच्यात येत्या डिसेंबरमध्ये अध्यक्षपदासाठी होणाऱ्या लढतीने जगाचे लक्ष वेधून घेतलेले असतानाच, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड करून बिडेन यांनी एक चांगली खेळी केली आहे. कमला यांची आई भारतीय असून, वडील जमैकातील कृष्णवर्णीय होते. त्यामुळे या उमेदवारीस राजकीयदृष्ट्या कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

कमला हॅरिस यांची उमेदवारी जाहीर होताच, ‘एक मतलबी आणि भयंकर महिला’ या शब्दांत ट्रम्प यांनी त्यांची संभावना केली. २००४ मध्ये बराक ओबामा हे डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे अध्यक्षपदासाठी उमेदवारीच्या लढतीत उतरले, तेव्हापासून कमला त्यांच्या समर्थक आहेत. अर्थात, त्यांच्या या निवडीस त्यापलीकडला आणखी एक पैलू आहे. तीनच महिन्यांपूर्वी अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय नागरिकाची एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने हत्या केली आणि त्यामुळे संपूर्ण अमेरिकेत जनक्षोभ उसळला. ठिकठिकाणी कृष्णवर्णीयांच्या बाजूने जोरदार निदर्शने झाली होती. तेव्हा या अमानुष हत्येच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी ट्रम्प यांनी ही निदर्शने मोडून काढण्यासाठी आपले समर्थक धाडले होते. या पार्श्‍वभूमीवर वर्णद्वेषाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या एका लढाऊ महिला नेत्याची निवड करून बिडेन यांनी ट्रम्प यांना शह दिला आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून जानेवारी २०१७ मध्ये सूत्रे हाती घेतल्यापासून ट्रम्प यांनी मनमानी कारभार करतानाच वर्णद्वेषाविरोधात सुरू असलेल्या अथक संघर्षात गौरवर्णीयांचीच तळी उचलली आहे. दुसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरतानाही गौरवर्णीय समाज हाच आपली ‘मतपेढी’ असल्याचे त्यांनी वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळेच बिडेन यांची भिस्त ही अमेरिकेतील कृष्णवर्णीय तसेच भारतीय मतदारांवर आहे. ओबामा यांनी २००८ मध्ये प्रथम अध्यक्षपदाची निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी बिडेन यांची आपल्या पक्षातर्फे उपाध्यक्षपदासाठी उभे केले होते. तोच ‘पॅटर्न’ आता पुन्हा उभा करताना, कमला यांचा भारतीय वंशही विचारात घेतला गेला असणारच.

मात्र, केवळ तेवढ्या कारणामुळे कमला हॅरिस यांना ही उमेदवारी मिळालेली नाही, तर कमला यांचे कर्तृत्वही त्यास कारणीभूत आहे. त्यांना राजकारण, समाजकारण आणि मुख्य म्हणजे न्याय आणि समतेचे धडे मिळाले ते व्ही. गोपालन या त्यांच्या आजोबांकडून. पूर्वी ऱ्होडेशिया नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजच्या झिंबाब्वेमध्ये सामाजिक समता, तसेच कृष्णवर्णीयांचे हक्‍क यासाठी झालेल्या अनेक लढ्यात त्यांचा सहभाग होता. कमला यांनीही अमेरिकेत अशा अनेक लढ्यांमध्ये हिरीरीने भाग घेतला आहे. बिडेन हे अमेरिकेच्या पूर्व किनारी भागाचे प्रतिनिधित्व करतात, तर कमला यांचे कार्यक्षेत्र पश्‍चिम किनारा परिसर आहे. मात्र, या रणनीतीमुळे डेमॉक्रेटिक पक्षाने या निवडणुकीत समतोल साधला आहे. 

ट्रम्प यांचे सारे राजकारण राष्ट्रवादाच्या आक्रमक घोषणांवर अवलंबून आहे. आपल्या कारभारातून आपण गोऱ्यांचे तारणहार असल्याची प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. कमला हॅरिस यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी पुढे आणण्याची बिडेन यांची खेळी मुत्सद्देगिरीची असली तरी ट्रम्प यांच्यावर त्याचा काही परिणाम होईलच, असे नाही. उलट तेही याचा उपयोग करून आपला छुपा वांशिक अजेंडा आणखी रेटतील. आता निवडणुकीस उरलेल्या जेमतेम काही महिन्यांच्या काळात परदेशी वंशाच्या आणि मुख्य म्हणजे कृष्णवर्णीय कमला यांच्या उमेदवारीमुळे ट्रम्प आणि त्यांचे प्रचारक हे गोऱ्यांची मतपेढी भक्कम करण्याच्या प्रयत्नाला लागणार, हे उघड आहे. त्याला शह देण्यासाठी बिडेन आणि कमला हॅरिस हे ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत ट्रम्प यांनी तोडलेले तारे यांचा वापर प्रकर्षाने करतील, हे सांगावयास नको.

राजकारणात टोकाची आणि एककल्ली भूमिका घेणाऱ्या नेत्यांमागेच लोक जायला तयार असल्याचे जगभरात दिसत आहे. मात्र, भविष्याचा विचार करून मध्यममार्गी आणि न्याय, समता यांची पाठराखण करणाऱ्या नेत्यांसाठी ही लढाई त्यामुळे कठीण असली तरी अशक्‍यप्राय नाही.  बिडेन आणि कमला हॅरिस ही जोडी आता ट्रम्प यांच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला कसा शह देते, ते लवकरच बघायला मिळेल. अमेरिकेच्या राजकारणात आजतागायत एकही महिला अध्यक्षपदी वा उपाध्यक्षपदी विराजमान झालेली नाही, हाही मुद्दा यानिमित्ताने पुन्हा चर्चेला येणार हे स्वाभाविक आहे. जागतिक महासत्तेचे हे न्यून कधी दूर होणार, हाही व्यापक औत्सुक्‍याचा विषय आहेच. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com