esakal | अग्रलेख : पुन्हा पेटवू मशाली !
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

कोण, कुठला ‘कोरोना’ नावाचा विषाणू भूतलावर अवतरतो काय आणि जगभरातील जनतेचे मुक्त विहाराचे स्वातंत्र्य हिरावून घेतो काय! भारतात या विषाणूने खरे तर मार्चमध्ये प्रवेश केला आणि कायम पायाला चाके बांधल्यासारखी भिरभिरणारी जनता ‘ठाणबंद’ करून टाकली. या विषाणूच्या सावटाखाली आपण यंदाचा स्वातंत्र्य दिन अनेक निर्बंधांना सोबत घेऊन साजरा करत आहोत.

अग्रलेख : पुन्हा पेटवू मशाली !

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोण, कुठला ‘कोरोना’ नावाचा विषाणू भूतलावर अवतरतो काय आणि जगभरातील जनतेचे मुक्त विहाराचे स्वातंत्र्य हिरावून घेतो काय! भारतात या विषाणूने खरे तर मार्चमध्ये प्रवेश केला आणि कायम पायाला चाके बांधल्यासारखी भिरभिरणारी जनता ‘ठाणबंद’ करून टाकली. या विषाणूच्या सावटाखाली आपण यंदाचा स्वातंत्र्य दिन अनेक निर्बंधांना सोबत घेऊन साजरा करत आहोत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘कोरोना’ने जखडून टाकलेल्या परिस्थितीतून आज ना उद्या आपण मुक्त होऊच; पण या संकटाने शिकवलेले धडे आत्मसात करून आपल्याला झेप घ्यायची आहे. तसा संकल्प करण्यासाठी स्वातंत्र्य दिनाइतका योग्य मुहूर्त दुसरा कोणता असू शकेल? सार्वजनिक शिस्तीचे महत्त्व या संकटाने आपल्याला लक्षात आणून दिले. सामूहिक आरोग्याचे मोठे संकट उभे राहते, तेव्हा सरकारी यंत्रणांवरच भिस्त असते. विकासाची मोठी स्वप्ने जरूर पहावीत; पण सार्वजनिक आरोग्य हा त्याचा पाया असतो. त्याकडे आता प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. 

चीनचा वर्चस्ववाद आणि भारताला घेरण्याची व्यूहरचना एव्हाना पुरेशी स्पष्ट झाली आहे. त्याला तोंड देण्यासाठी अखंड सावध राहावे लागेलच; आपले सैन्यदल सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास सक्षम आहे; पण मुख्य लढाई आर्थिक आघाडीवरची आहे, याचा विसर पडता कामा नये. बहिष्कार, बंदी, आयातशुल्कवाढ हे तात्कालिक आणि नकारात्मक उपाय आहेत. त्यामागचा आवेश समजण्याजोगा असला तरी आता खरी गरज आहे ती जागतिक स्पर्धेत दमदारपणे उभी राहतील, अशी उत्पादने निर्माण करण्याचे. तिथे पराक्रमाला वाव आहे. तसा संस्कार देशातल्या प्रत्येक मुलावर करायला हवा. आपल्याला आधुनिक काळातील लढाया जिंकायच्या आहेत, मध्ययुगीन काळातील नव्हे.

चीनने आर्थिक आघाडीवर बदलांची आपल्याआधी सुरुवात केली आणि निर्याताधारित प्रारूप यशस्वी केले. पण त्याचे कौतुक करताना तिथे सर्वंकष आणि एकाधिकारशाही व्यवस्था आहे, हे नजरेआड करता कामा नये. आपण आजवर जी प्रगती केली, ती लोकशाहीच्या चौकटीत. हा अभिमानाचा विषय आहे. आपण लोकशाही राज्यघटना सात दशके यशस्वीरीत्या राबवली, हे यश थोडेथोडके नव्हे. पण हे संचित आयतेच मिळाल्याने त्याचे महत्त्व लक्षात येत नाही, असे तर होत नाही ना, याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागेल.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैचारिक सहिष्णुता ही या विशाल भारतवर्षाची विलोभनीय वैशिष्ट्ये आहेत. हे वैभव आपल्याला जपायचे आहे. एकीकडे ही परंपरा सांभाळायची अन्‌ दुसरीकडे काळाने उभी केलेली नवी आव्हाने पेलायची अशी दुहेरी कसोटी आहे. त्यामुळे आता हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना, बदललेल्या जगातील नव-आव्हानांचा अधिक गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. हा काळ तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापी प्रभावाचा आहे.

त्यामुळे आपली जीवनशैलीही बदलते आहे. वैयक्तिक जीवनापासून ते सार्वजनिक धोरणनिर्मितीपर्यंत प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानाने व्यापली आहे. त्यामुळेच एकूणच तंत्रसाक्षरता वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याचवेळी नवी डिजिटल विषमता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.

एकविसावे शतक आपल्यासोबत इंटरनेटची जादुई दुनिया घेऊन आले आणि त्या महाजालाचा हात धरून आपण एका आभासी मायाजालात प्रवेश केला. हेच महाजाल मग जगभरातील राजकीय उलथापालथींमध्ये जशी महत्त्वाची कामगिरी बजावू लागले, त्याचबरोबर समर्थकांच्या झुंडीही उभ्या करू लागले.

त्यातून जगभरात ‘आम्ही आणि तुम्ही’ अशी दुराव्याची दरी उभी राहिली. म्हणूनच या साऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक हात कम्प्युटरच्या माऊसवर असणे आवश्‍यक असले तरी त्याचवेळी दुसऱ्या हाताने जमिनीशी असलेली नाळ अधिक घट्ट करावी लागेल. अन्यथा, ‘कोरोना’नंतरचे अवघे जगच ‘आभासी’ होऊन जाऊ शकते. गेल्या सात-साडेसात दशकांत सरकारवर विसंबून राहण्याची आपली प्रवृत्ती वाढीस लागली आहे. वास्तविक ‘आत्मनिर्भरता’ ही केवळ सरकारी धोरणाची बाब नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या अंगी मुरण्याची गरज आहे. त्याचवेळी सत्ताधारीही जनतेला अव्वाच्या सव्वा आश्वासने देऊन, एका नव्याच ‘आभासी’ जगात नेतात असे दिसते. पण ही आश्वासने पूर्ण झाली नाहीत, तर व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वासच उडून जाण्याचा धोका असतो. दुसरे म्हणजे सत्ताधारी आणि जनता यांच्यात दुराव्याची दरी असता कामा नये, हे खरेच; पण त्याचवेळी सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाजही व्यक्त  होत राहिला पाहिजे. तेच तर लोकशाहीचे सौंदर्य असते.

लोकशाही प्रणालीत सत्ताधाऱ्यांइतकेच महत्त्व अन्य अनेक संस्थांना असते. त्याची स्वायत्तता अबाधित राहिली पाहिजेच; पण त्याचवेळी त्या संस्थांच्या काही चुका असतील, तर त्याही निर्भयपणे दाखवून देण्याचे स्वातंत्र्य जनतेला असले पाहिजे. आजच्या स्वातंत्र्य दिनी केवळ गतस्मृतींच्या विश्‍वात रममाण न होता, भविष्यातील आव्हानांना कसे सामोरे जाता येईल, याचा विचार गांभीर्याने व्हायला हवा आणि त्यात समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हायला हवे.

जवळच येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्याचा अमृमहोत्सव साजरा करताना प्रगतीच्या आड येणाऱ्या सर्व बेड्या तोडून टाकण्यात आपल्याला यश आलेले असेल, अशी आशा आणि विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करूया आणि त्या जिद्दीने त्यासाठी कामाला लागूया.

Edited By - Prashant Patil

loading image