अग्रलेख : हैदराबादचे रण

BJP
BJP

भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ राबवून २००७ मध्ये कर्नाटकाची सत्ता हस्तगत केली तेव्हा हे ‘दक्षिण दिग्विजया’च्या दिशेने पहिले पाऊल आहे, असे डिंडिम पिटले गेले होते. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले; पण कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील अन्य कोणत्याच राज्यात भाजपला चंचूप्रवेशही करता आला नाही. त्याला तप उलटल्यानंतर पुन्हा भाजपने दक्षिणेतील आणखी एका राज्यावर कब्जाचे मनसुबे रचले आहेत. त्याची चुणूक हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक प्रचारात दिसली. खरेतर ही एका महानगराची आणि अलीकडेच आंध्र प्रदेशचे विभाजन करून निर्माण झालेल्या तेलंगण राज्याच्या राजधानीची स्थानिक पातळीवरची निवडणूक! पण भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आदी मोहरे प्रचारात उतरवल्यामुळे या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे.

‘गल्लीतल्या निवडणुकांसाठी भाजपला आपले कळीचे मोहरे मैदानात उतरवावे लागले,’ अशा टीकेने न डगमगता ‘हैदराबाद महापालिकेची निवडणूक ही तेलंगण काबीज करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे!’ असे रोखठोक उत्तरही भाजपने दिले. नागरी भागातील मोठा जनसमूह हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याने अद्याप भारावून गेलेला आहे, हे लक्षात घेऊनच ही चाल करण्यात आली, यात शंकाच नाही. अर्थात, या खेळीमागील रणनीतीही स्पष्ट आहे. विभाजन होण्यापूर्वीपर्यंत प्रदीर्घ काळ आंध्र प्रदेशवर काँग्रेसचे वर्चस्व होते, त्यास प्रथम शह एन. टी. रामाराव यांनी १९८३मध्ये दिला. तेव्हापासून काँग्रेसचा येथील प्रभाव हळूहळू कमी होत गेला, तीच पोकळी भरून काढण्यासाठी आता भाजपने मैदानात उडी घेतली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात, त्या पलीकडले अनेक पदर तेलंगणातील रणांगणास असल्याचे दिसून येते. त्यातील मुख्य भूमिका ही अर्थातच असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘एमआयएम’ पक्षाची आहे. हैदराबाद हे मुस्लिमबहुल महानगर आहे. तेथे सत्ता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ‘तेलंगणा राष्ट्रीय समिती’ (टीआरएस) या पक्षाची आहे. १५० सदस्यांच्या या महापालिकेत या पक्षाचे आजमितीला ९९ नगरसेवक आहेत. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे बळ २०१६ मध्ये एकदम अवघे दोन नगरसेवक महापालिकेत पाठविण्याइतके घटले; तर २००९ मध्येच ‘तेलुगू देसम’ने जिंकलेल्या ४५जागांपैकी अवघी एकच जागा नंतरच्या पाच वर्षांनी त्या पक्षाला राखता आली. या पार्श्वभूमीवर ‘एमआयएम’ने मात्र या दोन्ही निवडणुकांत ४०पेक्षा जास्त जागा जिंकून प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले होते. त्यास अर्थातच ओवेसी आणि चंद्रशेखर राव यांची छुपी आघाडी कारणीभूत आहे. महापालिकेत ‘एमआयएम’शी केलेल्या सहकार्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मते फोडून ओवेसी यांनी केली होती. आताच्या निवडणुकीतही चंद्रशेखर राव यांचाही भरवसा त्यांच्यावरच आहे.

ओवेसी यांनीही अमित शहा असोत की योगी आदित्यनाथ आणि नड्डा यांच्या घणाघाती प्रचाराला तितक्‍याच त्वेषाने उत्तरे देऊन ते दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती ही अर्थातच ध्रुवीकरणाची आहे. ‘हैदराबाद’चे ‘भाग्यनगर’ असे नामांतर करता येणार नाही का, असे आपल्याला लोक विचारत आहेत, असे सांगत योगी आदित्यनाथ यांनी तो विषय ऐरणीवर आणून भाजप कोणत्या प्रकारचे राजकारण करू इच्छितो, ते दाखवून दिलेच आहे. त्यामुळेच २००९ असो की २०१६ या दोन्ही निवडणुकांत अवघे चार नगरसेवक निवडून आणू शकणाऱ्या भाजपने आपली सारी फौज अत्यंत मुत्सद्देगिरीने मैदानात उतरवली आहे. हैदराबादेत मराठी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. निजामशाहीविरोधात लढा देणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचा पगडा अजूनही तेथील गेल्या पिढीतील मराठी समूहावर आहे. हे लक्षात घेऊनच फडणवीस तसेच जावडेकर यांना तेथे धाडण्यात आले होते. एकदा लक्ष्य ठरवल्यावर भाजप किती दूरदृष्टीने विचार करतो, तेच या आखीव-रेखीव रणनीतीमुळे पुन्हा सामोरे आले आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस मात्र काहीच करू इच्छित नाही, हेही बिहार निवडणुकांप्रमाणेच यावेळीही स्पष्ट दिसते आहे. गमावलेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी काँग्रेस वारंवार हातातून घालवत असल्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष या लढाईस आता भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असे स्वरूप आले आहे. ते काहीही असो, पण सत्तेच्या विकेंद्रीकरणाविषयी उठताबसता आपले नेते प्रवचने झोडत असतात, पण एका महापालिकेच्या निवडणुकीला राष्ट्रीय पक्षाचे मोहरे उतरतात, स्थानिक प्रश्‍न केवळ तोंडी लावण्यापुरते चर्चेत आणतात, तेव्हा हे त्याचाशी विसंगत नाही का? आता मंगळवारी होणाऱ्या मतदानातून हैदराबादची जनता काय कौल देते, यावरच भाजपने तेलंगणावर कब्जासाठी आखलेली रणनीती यशस्वी होते का नाही, ते स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच उडालेल्या प्रचाराच्या धुरळ्यात आपली सर्व ताकद पणास लावून पुढच्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने केली आहे, यात शंकाच नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com