esakal | अग्रलेख : वर्षपूर्तीची भेट! 
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikasaghadi

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’ने शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील पाचही जागा जिंकल्यामुळे राज्यातील जनतेने या सरकारला दिलेली ही वर्षपूर्तीची भेटच म्हणावी लागेल! खरेतर या मतदारसंघांची मानसिकता ही सर्वसाधारणपणे विरोधी उमेदवारांच्या बाजूची असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाने हे मतदारसंघ शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेले आहेत, त्यामुळेच या पाच जागांबरोबरच धुळे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील एक अशा सहाही जागा जिंकण्याच्या गमजा भाजपचे राज्यातील नेते मारत होते.

अग्रलेख : वर्षपूर्तीची भेट! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील ‘महाविकास आघाडी’ने शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघातील पाचही जागा जिंकल्यामुळे राज्यातील जनतेने या सरकारला दिलेली ही वर्षपूर्तीची भेटच म्हणावी लागेल! खरेतर या मतदारसंघांची मानसिकता ही सर्वसाधारणपणे विरोधी उमेदवारांच्या बाजूची असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय जनता पक्षाने हे मतदारसंघ शिस्तबद्ध पद्धतीने बांधलेले आहेत, त्यामुळेच या पाच जागांबरोबरच धुळे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील एक अशा सहाही जागा जिंकण्याच्या गमजा भाजपचे राज्यातील नेते मारत होते. प्रत्यक्षात भाजपच्या हाती लागली, ती धुळ्यातील एकमेव जागा. त्यामुळे अमरीश पटेल यांनी भाजपला या दारुण पराभवात थोडाफार दिलासा दिला असला, तरी त्या विजयाशी भाजपचा काडीमात्रही संबंध नाही. हा विजय अमरीशभाईंनी स्वकर्तृत्व आणि आपला लोकसंग्रह या जोरावर मिळवला आहे. त्यामुळेच उर्वरित पाच मतदारसंघांत आलेले अपयश भाजपच्या जिव्हारी न लागते तरच नवल! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पाच मतदारसंघांपैकी चार जागांवर काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचे उमेदवार विजयी झाले, तर अमरावतीत विजयी झालेले अपक्ष उमेदवार ॲड. किरण सरनाईकही खरेतर काँग्रेसच्या विचारांशी जवळीक असलेलेच आहेत. त्यामुळे या पाचही मतदारसंघांत भाजपच्या उमेदवारांना थेट अस्मान दाखवण्यात आले, असे म्हणता येते. या पराभवाच्या धक्‍क्‍यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्यासारखे बडे नेते ‘शिवसेनेचे खच्चीकरण करून, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी यांनी हा विजय मिळवला आहे!,’ अशी उपरोधिक टिप्पणी करून समाधान मानून घेत आहेत. ‘गेल्या वर्षभरात ‘महाविकास आघाडी’च्या सरकारने काहीही केले नाही, त्यामुळे राज्यातील जनता या सरकारवर नाराज आहे,’ असा विचार गेले काही दिवस भाजप नेते सातत्याने मांडत होते. त्याला या निकालांनी आरपार छेद दिला आहे. त्यामुळे आता ‘हिंमत असेल तर एक-एकटे लढून दाखवा!’ असे फुकाचे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. मात्र, त्यात काहीच अर्थ नाही; कारण मग त्यांना गेल्या निवडणुकीत कोथरूडमध्ये मिळालेला विजयही शिवसेनेशी असलेल्या युतीमुळेच मिळाला, असेही म्हणता येईल. शेवटी निवडणूक ही निवडणूकच असते आणि विजय हाच काय तो बोलका असतो. 

या निकालाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, आघाडीतील घटक पक्षांची मते एकमेकांना मिळाली. आघाडीतील या प्रकारचा ताळमेळ अपवादात्मक असतो. पुणे तसेच पश्‍चिम महाराष्ट्रासारखा विकसित भाग असो, की विदर्भ-मराठवाडा असो; सर्वत्र भाजपला धक्का बसला. त्यातही विदर्भ आणि विशेषतः नागपूरमधील पराभव हा फडणवीस यांना अत्यंत झोंबणारा आहे.

खरेतर फडणवीसांबरोबरच नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेतेही नागपूरचेच. मात्र, तेथील पराभवास भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फटका बसला, असे दिसते. येथील मावळते विधान परिषद सदस्य अविनाश सोले हे गडकरी यांच्या निकटवर्ती. त्यांना उमेदवारी नाकारून फडणवीस यांच्याशी हृद्य संबंध असलेले संदीप जोशी यांना उमेदवारी दिली गेली आणि याच राजकारणाचा फटका भाजपला बसला.

विदर्भातल्याच अमरावती मतदारसंघातील जागा ही या निवडणुकीत शिवसेनेने आपल्या मर्जीतील उमेदवाराला दिलेली एकमेव जागा. मात्र, तेथे काँग्रेसशी जवळीक असलेले ॲड. सरनाईक यांनी बंडाचा झेंडा रोवून विजयाची मुहूर्तमेढ रोवताना भाजप उमेदवाराला थेट सहाव्या क्रमांकावर फेकून दिले. त्यामुळेच ‘महाविकास आघाडी’ सरकार अंतर्गत मतभेदांनी कोसळून पुन्हा आपणच परत येऊ, अशी दिवास्वप्ने पाहणाऱ्यांचा मुखभंग झाला आहे.

मराठवाड्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराने फार मोठ्या फरकाने विजय संपादन करताना, त्या विभागात सर्वत्र आघाडी घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना या विजयामुळे नवा आत्मविश्वास कसा मिळाला आहे, त्याचेच दर्शन ‘फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुनश्‍च विधानसभा लढवून दाखवावी!’ या ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना दिलेल्या थेट आव्हानातून घडले आहे. 

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्ताने गुरुवारी पुस्तिकेचे प्रकाशन करण्याच्या कार्यक्रमातही शरद पवार, बाळासाहेब थोरात, अजित पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देहबोलीतून या आत्मविश्वासाचे दर्शन घडले. ‘राष्ट्रवादी’ तसेच काँग्रेस यांच्या नेत्यांना सुखवणारी आणखी एक बाबदेखील याच कार्यक्रमात बघायला मिळाली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आघाडीतील अन्य पक्षीय नेत्यांचा मुक्तकंठाने केलेला गौरव आणि ‘टीमवर्क’ला दिलेले श्रेय हे आघाडीतील अंतर्गत तणाव कमी करण्यास निश्‍चितच कारणीभूत ठरेल, यात शंका नाही. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी प्रथमपुरुषी एकवचनी राग आळवल्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता आघाडीत नवीन वातावरण यामुळे निर्माण होऊ शकते.

Edited By - Prashant Patil

loading image