esakal | अग्रलेख : लोकशाहीतले सरंजामदार
sakal

बोलून बातमी शोधा

अग्रलेख : लोकशाहीतले सरंजामदार

मध्य प्रदेशच्या जनतेने दलबदलूंना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाच, तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कोरोनाकाळातील बंडामुळे गमवावे लागलेले मुख्यमंत्रिपद परत कमलनाथ यांच्या हाती येऊ शकते.

अग्रलेख : लोकशाहीतले सरंजामदार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोनाच्या ऐन सावटात होऊ घातलेल्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रोजच्या रोज बदलणाऱ्या रंगांकडे सर्वांचे लक्ष लागल्यामुळे मध्य प्रदेशातील २८ जागांच्या पोटनिवडणुकांच्या धुरळ्याकडे बहुतेकांचेच दुर्लक्ष झाले होते. मात्र, आता या पोटनिवडणुका बातम्यांच्या मुख्य मथळ्यांमध्ये आणण्याचे काम माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केले आहे आणि तेही स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून! खरे तर या पोटनिवडणुकाही काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत; कारण त्यात मध्य प्रदेशच्या जनतेने दलबदलूंना धडा शिकवण्याचा निर्णय घेतलाच, तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कोरोनाकाळातील बंडामुळे गमवावे लागलेले मुख्यमंत्रिपद परत कमलनाथ यांच्या हाती येऊ शकते. मात्र, प्रचार मोहिमेत कमलनाथांची जीभ घसरली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार इमरती देवी यांचा उल्लेख ‘आयटेम’ असा केला! आपल्या एका दलित आणि महिला उमेदवाराचा असा उल्लेख झाल्यामुळे भाजपने या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले नसते तरच नवल. स्त्रियांविषयीची राजकीय नेत्यांचीच दृष्टी इतकी मागास असेल तर स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, या विचारापासून समाज किती दूर आहे, याची विषण्ण करणारी जाणीव होते. कमलनाथ यांच्या या उद्‌गारांचा निषेध करायला हवा. असली उथळ शेरेबाजी करणे हे त्यांच्या सरंजामशाही वृत्तीचेच निदर्शक आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच तातडीने याची दखल घेऊन कमलनाथ यांचे कान उपटायला हवेत; अन्यथा त्यांचे हे अत्यंत निषेधार्ह असे उद्‌गार काँग्रेसला मोठा फटका देऊ शकतात. इमरतीदेवी यांना संताप येणे स्वाभाविक असले, तरी त्यांनीही प्रत्युत्तर देताना कमलनाथ यांच्या माता, भगिनींचा उल्लेख करणे म्हणजे त्याच पातळीवर घसरण्यासारखे आहे. कमलनाथ यांच्यावर टीका करताना भाजप नेत्यांनी याचाही विचार करायला हवा.

इमरतीदेवी काही महिन्यांपूर्वीपर्यंत काँग्रेसमध्येच होत्या. मात्र, ज्योतिरादित्य यांनी आपल्याच पक्षनेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर आमदारकीचे राजीनामे देणाऱ्या २२ जणांपैकी त्या एक आहेत. या पोटनिवडणुका काँग्रेससाठी अनेकार्थांनी महत्त्वाच्या आणि भाजपसाठीही प्रतिष्ठेच्या आहेत. ज्योतिरादित्य यांनी फडकवलेल्या बंडाच्या निशाणाखाली त्यांचे निकटवर्ती २२ आमदार तातडीने जमा झाले आणि त्यांनी थेट राजीनामे दिल्यामुळे कमलनाथ सरकार अडचणीत सापडले. नेमकी हीच संधी अवघ्या दीड वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील सत्ता गमवावी लागलेल्या भाजपने साधली आणि शिवराजसिंह पुनश्‍च मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर आणखी तीन आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. दरम्यानच्या काळात मध्य प्रदेशात तीन आमदार कालवश झाले होते. त्यामुळे २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या राजकीय खेळामुळे मध्य प्रदेशच्या २३० सदस्य असलेल्या विधानसभेत आता २०२ आमदार आहेत. त्यात भाजपचे १११ आमदार असून, त्यांना चार अपक्षांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे बळ या राजीनामाबहाद्दरांनी ८८ वर आणले आहे. त्याशिवाय, विधानसभेत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाचे दोन आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा एक असे बलाबल आहे. काँग्रेसच्या या दलबदलू उमेदवारांना पावन करून पक्षात घेताना, त्यांना पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्‍वासन भाजपने पाळले आहे. मात्र, तीच बाब आता या सत्ताधारी पक्षासाठी अत्यंत अडचणीची ठरू पाहत आहे. दोनच वर्षांपूर्वी, म्हणजे नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या उमेदवारांना टीकेचे प्रखर लक्ष्य केल्यानंतर, आता कार्यकर्त्यांवर त्यांच्याच पालख्या उचलायची पाळी भाजपने आणली आहे. मतदान जेमतेम दोन आठवड्यांवर आले असतानाही भाजपच्या प्रचाराने म्हणावा तितका वेग घेतलेला नाही. उलट आपल्याच कार्यकर्त्यांना दमदाटी करून, प्रचारात उतरवण्याची वेळ भाजपवर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारांचा सक्रिय प्रचार न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा शिवराजसिंह यांना, जवळपास महिनाभरापूर्वीच कार्यकर्त्यांना देणे भाग पडले होते. त्यानंतर आता पक्षाचे सचिव बी. एल. संतोषी यांनी ‘आपल्या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांचीच असल्याचे’ कठोरपणे बजावले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या नाराजीचीच साक्ष हे इशारे देत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या पार्श्‍वभूमीवर आता कमलनाथ यांच्या घसरलेल्या जिभेमुळे किमान मुख्यमंत्री शिवराजसिंह यांना नवी उमेद प्राप्त झाल्याचे नंतरच्या २४ तासांतच दिसले आहे. इमरतीदेवी या मूळ गरीब शेतकऱ्याच्या कन्या असून, आपल्या हिमतीवर त्या सरकारी नोकरीपर्यंत कशा पोचल्या, याची आठवण शिवराजसिंह चौहान यांनी करून दिली. अगदी जेमतेमच बहुमत असल्याने चौहान यांच्या दृष्टीने पोटनिवडणुकींमधली ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपले सरकार केवळ बंडखोरीमुळे गमवावे लागल्याने अस्वस्थ झालेल्या काँग्रेसला लोकांपर्यंत पोचून पुन्हा भाजपचा डाव उलटविण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक असूनही तिला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे; पण प्रचाराच्या रणधुमाळीत मध्ययुगीन आणि सरंजामी मनोवृत्तीचे जे दर्शन घडत आहे, ते उद्विग्न करणारे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा