अग्रलेख : सुटलेले भान, वाढलेला ताण

कोरोनाला तोंड देत असताना कुंभमेळा असो नाहीतर मरकझ अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने परिस्थिती आणखी गंभीर होते, याचे भान सुटत जाणे धोकादायक आहे.
Kumbhmela
KumbhmelaSakal

कोरोनाला तोंड देत असताना कुंभमेळा असो नाहीतर मरकझ अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने परिस्थिती आणखी गंभीर होते, याचे भान सुटत जाणे धोकादायक आहे. सगळ्यांनीच सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. सरकारनेही सुस्पष्ट धोरण आखण्याची जबाबदारी टाळता कामा नये.

केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर कोरोना विषाणूने चढवलेल्या भयावह प्रतिहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळालेली तीन दृश्ये गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडणारी आहेत. हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठी हजारो साधू-संतांनी ‘हरि की पौडी’ येथे शाही स्नानासाठी तुफानी गर्दी केली होती. तर गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मास्कची पर्वा न करता, असेच हजारोंच्या संख्येने भाविक जमा झाले होते आणि रमझानचा पवित्र महिना मंगळवारी संध्याकाळपासून सुरू होताच, बुधवारी हैदराबादच्या प्रख्यात जामा मशिदीत नमाजपठणासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. हे सारे धार्मिक कर्मकांड आपल्या देशात कोरोनाच्या सावटाची पर्वा न करता असेच सुरू राहणार असेल, तर मग महाराष्ट्र असो की राजधानी दिल्ली येथे जारी करण्यात आलेल्या निर्बंधांची गरज तरी काय, असा प्रश्न पडतो.

गतवर्षी दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ येथील भाविकांच्या गर्दीवरून वाद झाला होता. अशी गर्दी करणे योग्य नव्हतेच. परंतु, तातडीने प्रशासकीय उपाय न योजता त्याचे राजकारण केले गेले. अद्यापही ते प्रकार सुरूच आहेत. त्यामुळेच मरकझसाठीची गर्दी आणि हरिद्वारच्या कुंभातील गर्दी यांची तुलनाच होऊ शकत नाही, असे तर्कट उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह यांनी मांडले. मरकझसाठी एका बंदिस्त वास्तूत अनेक श्रद्धाळू एकत्र येतात, तर कुंभमेळ्यात गंगेच्या विस्तीर्ण घाटावर खुल्या वातावरणात हे भाविक स्नानसंध्या करण्यासाठी जमले असल्याने कोरोना तेथे उद्‍भवूच शकत नाही, असे या तीरथसिंगांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्या या कथनास काही तास उलटायच्या आतच हरिद्वारची पर्वणी साधण्यासाठी आलेल्या महानिर्वाणी आखाड्याचे महंत महामंडलेश्वर कपिल देव यांच्या निधनाचे वृत्त येऊन थडकले. त्याचवेळी या पर्वणीत अनेक संत-महंतांसह भाविकांना कोरोनाची बाधा झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यामुळेच कारभाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करायला हव्यात. निरंजनी आखाड्याचे महंत नरेंद्रगिरी यांच्याकडे अखिल भारतीय आखाडा परिषदेची सूत्रे आहेत. परिषदेचे अध्यक्ष आहेत, ते याआधीच कोरोनाबाधित झाले होते. त्यांची प्रकृती सुधारत आहे. तथापि, कपिल देव यांच्या निधनानंतर या निरंजनी आखाड्याने सारासार विचार करून कुंभमेळ्यातून माघार घेतली. त्यापाठोपाठ आता आनंद आखाड्यानेही बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेकडो वर्षांच्या परंपंरेचे वलय पाठीशी असलेला निरंजनी आखाडा गेली काही वर्षे परिषदेच्या कारभारात वर्चस्व राखून आहे. निरंजनी आणि आनंद या आखाड्यांनी परिस्थितीचे भान ठेवून जो निर्णय घेतला, त्याचे स्वागत करायला हवे. त्याचे अनुकरण इतरांनी करायला हवे. या दोन आखाड्यांच्या निर्णयामुळे आता हरिद्वार येथील गर्दी काही प्रमाणात तरी कमी होईल, अशी आशा करता येते. वास्तविक कोरोनाचा कहर लक्षात घेता, या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा विचार आधीच व्हायला हवा होता.

स्पष्ट धोरण हवे

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक मेळावे, उत्सव, कार्यक्रम आदींबाबत सुस्पष्ट असे सर्वसमावेशक धोरण आवश्यक आहे. पण सरकारने तसे ते तयार केलेले नाही. हा धोरणात्मक अभाव दिल्ली उच्च न्यायालयातही प्रकर्षाने समोर आला. मरकझला परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने या उणीवेवर बोट ठेवले आहे. त्याची दखल घ्यायला हवी. हाताळायला अवघड असे विषय वा वाद न्यायालयात जाईपर्यंत काहीच हालचाल करायची नाही, ही सरकारची प्रवृत्ती अलीकडे अनेकदा आढळून आली. पण त्यामुळे प्रश्न तर सुटत नाहीतच, उलट चिघळत राहतात, हे लक्षात घ्यायला हवे. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण आपल्या पथ्यावर पडेल, असा संकुचित विचार करून निर्णय घेणे हे तर त्याहीपेक्षा घातक आहे. कुंभमेळ्याला धार्मिक परंपरेत विशिष्ट स्थान आहे, हे खरेच. तरीही वर्तमानातील आव्हान नजरेआड करून केवळ प्रथांना महत्त्व देणे, हे घातक ठरेल. महासाथीच्या संकटावर मात करण्यासाठी सुसज्ज होण्याची गरज असताना आपण रीतीरिवाज आणि प्रथा-परंपरा यांच्या बंधनात गुंतून पडत आहोत. याच तथाकथित श्रद्धांच्या जोरावर राजकारणाचा डोलारा उभा करण्याचा प्रयत्न करणे हे खरे म्हणजे या विषाणूपेक्षाही मोठे संकट आहे. एकीकडे मंगळयानाच्या बाता करायच्या आणि त्याचवेळी ते यान पाठवताना ज्योतिषाकडून मुहूर्त काढून घ्यायचा, ही सर्वात मोठी विसंगती आहे. गंगेत पर्वणीकाळात स्नान केल्यामुळे कोरोनाची बाधा होणार नाही, अशा अंधश्रद्धांचा बुजबुजाट सध्या पसरवला जात आहे. सुदैवाने सर्व संत-महंतांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास उत्तराखंड सरकार हा ‘मेला’ थांबवण्यास तयार असल्याचेही वृत्त आता आले आहे. तसे झाले तर चांगलेच! मात्र, झालेले नुकसान त्यामुळे भरून कसे येणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com