अग्रलेख  :  विळखा सैल होताना...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020

गेल्या पंधरवड्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण हे आधीच्या १५ दिवसांच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. तर, ‘केईएम’ या मुंबईतील प्रमुख रुग्णालयात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधितावर मृत्यूने झडप घातलेली नाही.

अधिक मासातला शेवटचा रविवार हा किमान महाराष्ट्रासाठी तरी काही चांगल्या बातम्या घेऊन आला आहे! गेले सहा महिने आपले सारे जीवनमान पोखरून टाकणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग आता मंदावण्याच्या मार्गावर आहे, ही त्यातील सर्वांत दिलासादायक बातमी. गेल्या पंधरवड्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण हे आधीच्या १५ दिवसांच्या तुलनेत २० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. तर, ‘केईएम’ या मुंबईतील प्रमुख रुग्णालयात गेल्या २४ तासांत एकाही कोरोनाबाधितावर मृत्यूने झडप घातलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबरच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात गेल्या मार्चपासून लागू करण्यात आलेले ठाणबंदीसंदर्भातील सर्व नियम उठवण्याचे सूतोवाच शनिवारी पुण्यात केले. मात्र, ठाणबंदी पूर्णपणे उठवण्यासंबंधी हे सूचन केवळ राज्यातील भयग्रस्त जनतेला दिलासा देण्यापुरते राहता कामा नये. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, हे बघण्याची जबाबदारीही आता राज्य सरकारवर आली आहे. ठाणबंदी ही कायम स्वरूपाची असता कामा नये, तर कोरोनाविरोधातील सर्व नियमांचे पालन करत व्यापार-उदीम तसेच बाजारपेठा, छोटे-मोठे व्यवसाय तसेच उत्पादन क्षेत्र हे खुले व्हायला हवे, अशी भूमिका ‘सकाळ’ने सातत्याने मांडली. आता सरकारही अनलॉकचा विचार करू लागले आहे, ही आनंदाची बाब. ठाणबंदी पूर्णपणे उठवतानाच शाळांची घंटा पुन्हा पहिल्याप्रमाणेच वाजू लागेल, हेही सरकाला बघावे लागेल. देशातील काही राज्यांत शाळा-कॉलेज काही निर्बंधांसह सुरू झाली आहेत. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शाळा-कॉलेज आणखी काही काळ बंद ठेवल्यास आजच्या या स्पर्धेच्या युगात आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो; विशेषतः दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना. त्यामुळे यासंदर्भातही काही ठोस निर्णय व्हायला हवा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आता येत्या शनिवारी अधिक मास संपून ‘घटस्थापना’ होईल आणि नवरात्र-दसरा-दिवाळी असा सणासुदीचा मोसम सुरू होईल. अर्थव्यवस्थेला चालना देणारा हाच मोसम असतो. याच काळात बाजारपेठा गर्दीने फुलून जातात. नवे वाहन असो की घरातील काही नवे इलेक्‍ट्रॉनिक उपकरण असो; नवे वाहन असो की नवे घर किंवा नवीन कपडेखरेदी, यांचा हाच हंगाम असतो. बहुसंख्य व्यापारी याच काळातील जोरदार खरेदीच्या जोरावर बाकीच्या आठ-दहा महिन्यांतील मंदीला तोंड देत असतात. त्यामुळे आता ‘लॉकडाउन’ दिवाळीनंतर पूर्णपणे उठवण्याचे हे ‘शुभ वर्तमान’ स्वागतार्हच म्हणावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील जनतेशी संवाद साधताना, आरोग्यमंत्र्यांच्या निवेदनाचा थेट संदर्भ दिला नसला, तरी ठाणबंदी आता आपण कशी हळूहळू उठवत आहोत, तेच तपशीलवारपणे सांगितले. राज्य पूर्वपदावर येण्यासाठी आजमितीला सर्वांत मोठी गरज आहे ती सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची. त्यातही मुंबईची जीवनवाहिनी असे बिरुद लाभलेल्या उपनगरी रेल्वेमध्ये सर्वसामान्य जनतेला अद्याप खुला प्रवेश देण्यात आला नसल्याने मुंबई तसेच याच महानगरात रोजी-रोटीसाठी येणे भाग पडलेल्या ठाणे तसेच नवी मुंबई येथील चाकरमान्यांना अतोनात हालअपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारने या लोकल ट्रेनच्या फेऱ्या अधिक प्रमाणात सुरू करण्याची विनंती केंद्राला केली असून, या फेऱ्या वाढताच अधिकाधिक लोकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या या संवादातील मुख्य बातमी ही अर्थातच मुंबईतील मेट्रोची ‘आरे’तील कारशेड आता कांजुरमार्ग येथे होणार, ही आहे. ठाकरे सरकारची तशी स्पष्ट भूमिका होती आणि आता तसा अधिकृत निर्णय झाला आहे. मुख्य म्हणजे कांजुरमार्ग येथील सरकारी जमीन त्यासाठी मोफत देण्यात येणार असल्याने, आता ही जागा बदलली तरी त्याचा वाढीव बोजा पडण्याचे टाळले गेले आहे. या निर्णयाचा कोरोनाशी थेट संदर्भ नसला तरी उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाची बूज राखण्याचे काम यामुळे आपसूकच होणार आहे. शिवाय, ‘आरे’ वसाहतीतील ६०० एकर जागा जंगल म्हणून राखून ठेवण्याच्या निर्णयातही याच पार्श्‍वभूमीवर अधिक चांगला निर्णय झाला असून, आता ८०० एकर जागा जंगल म्हणून ‘आरक्षित’ करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी करताना, या वसाहतीतील मूळ आदिवासी तसेच त्यांचे पाडे यांना जराही धक्‍का बसणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या सगळ्या सकारात्मक घडामोडी असल्या, तरी त्यामुळे नागरिकांची; म्हणजेच तुमची-आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत त्याची आठवण जनतेला करून दिली आणि चिन्हे चांगली दिसत असली, तरी मास्क तसेच सामाजिक दुरस्थतेचे नियम धाब्यावर बसवून, सरकारला पुन्हा लॉकडाउन करायला भाग पाडू नका, असा  इशाराही त्यांनी दिला. एकुणात,  स्वयंशिस्त पाळली आणि सार्वजनिक ठिकाणी वावरण्याच्या सध्याच्या नियमांचे पालन केले, तर सणासुदीचा हा हंगाम आनंदात जाऊ शकतो. त्याची तयारी सरकारी यंत्रणेने करावी आणि नागरिकांनीही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article about maharashtra coronavirus has decreased