अग्रलेख : ‘कोरोना’चे अनर्थ

अग्रलेख : ‘कोरोना’चे अनर्थ

कोरोना विषाणूने चीनमध्ये जो हाहाकार माजवला आहे, त्याची लागण पूर्वेकडील जपान, दक्षिण कोरिया; पश्‍चिम आशियातील इराण आणि युरोपातील इटली या देशातील नागरिकांनाही झाली असून, संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अक्षरशः युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. रुग्णांची वाढती संख्या हा जसा चिंतेचा विषय आहे, तेवढाच या संकटाच्या आनुषंगिक परिणामांचाही. हे परिणाम भारतासह अनेक देशांना जाणवू लागले आहेत. या अनर्थकारी परिणामांमागे वास्तव कारण आहेच; पण त्याच जोडीने अवाजवी भीती, घबराट यांमुळेही काही दुष्परिणाम होत आहेत. त्यांची तीव्रता कमी करणे तरी सर्वसामान्यांच्या हाती आहे. निदान त्यासाठी प्रयत्न करायला हवा. कोरोना विषाणूचा संसर्ग कशामुळे होतो, याची शास्त्रीय माहिती सर्वदूर दिली जाणे आवश्‍यक आहेच; परंतु समाजमाध्यमे आणि इतरही माध्यमांतूनही अशास्त्रीय माहिती, अफवा, पूर्वग्रह असे बरेच काही पसरते आहे. त्याचा वेग रोगापेक्षाही कितीतरी जास्त आहे. ‘व्हॉट्‌सॲप’वर अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ या रोगावरचे अक्‍सीर इलाज छातीठोकपणे सांगत आहेत.

डिजिटल कुजबुजीमुळे आणि गावगप्पांमुळे होणाऱ्या अनर्थांनाही पायबंद घालायला हवा. अंडी वा चिकन खाण्याशी या रोगाचा काहीही संबंध नाही; परंतु अवाजवी भीतीमुळे अनेकांनी आपल्या सवयीतील आहारही सोडून दिला. या घबराटीमुळे कुक्कुटपालन व्यवसायाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. शेअर बाजार हा तर अंदाजांवरच हेलकावे खात असतो. तिथेही भीतीची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला. गेल्या आठवडाभरातील सर्वाधिक घसरण शुक्रवारी नोंदली गेली. घाबरून जाणे आणि सावधता बाळगणे यातला फरक अशावेळी लक्षात घेतला पाहिजे. हे खरेच, की कोरोना विषाणूने फार मोठे आव्हान उभे केले आहे आणि ते प्रामुख्याने चिनी व्यवस्थेपुढचे असले तरी त्याचे परिणाम सर्वव्यापी आहेत. जागतिक समुदायानेच त्याचा मुकाबला करायला हवा. त्यादृष्टीने विविध देशांचे परस्परसहकार्य आवश्‍यक आहे; त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रसंघानेही या कामात पुढाकार घेण्याची अपेक्षा वावगी ठरणार नाही. अमेरिका औषधांच्या संशोधनावर कोट्यवधी डॉलरचा खर्च दरवर्षी करते. त्या देशाने या विशिष्ट प्रश्‍नासाठी आपली सामग्री वापरायला हवी. संसर्ग होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यायची, याची परिपत्रके काढण्याच्या पलीकडे जाऊन जागतिक आरोग्य संघटनेनेही अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी. आंतरराष्ट्रीय समुदाय या संकटाचा सामना करण्यास सज्ज झाला आहे, असे चित्र अद्यापही निर्माण झालेले नाही. 

जागतिकीकरणानंतर आर्थिक व्यवहारांचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर परस्परावलंबी झाले असून, त्याची जाणीव अशा प्रसंगी जास्त ठळकपणे होते. कोरोना विषाणूने चीनच्या वुहान प्रांतात अक्षरशः थैमान घातले. हा प्रांत आर्थिक-औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रामुख्याने निर्यातीभिमुख प्रारूपावर आधारलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला ‘कोरोना’ने अक्षरशः दणका दिला आहे. पुरवठा साखळी खंडित झाली आहे. तेथील अनेक कारखाने, प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. औषधांचा कच्चा माल भारताला प्रामुख्याने चीनमधून येतो. नंतर त्याचे परिपूर्ण उत्पादनात रूपांतर होते; परंतु चीनमधून हा माल येणे बंद झाल्याने भारतातील औषधांच्या निर्मितीवर परिणाम झाला आहे. हेच इतरही अनेक उद्योगांच्या बाबतीत घडते आहे. दोन ते अडीच कोटी किलो सुती धागा दर महिन्याला भारतातून चीनला निर्यात केला जातो; पण आता चीनमधील परिस्थितीमुळे तिकडून मागणी कमी होण्याचा धोका आहे. दुसऱ्या बाजूला बटणांपासून सुईपर्यंत वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व सुटे भाग चीनमधून भारतात आयात होतात. आता या मालासाठी देशांतर्गत पातळीवर मागणी निर्माण होईल; पण तेवढ्या प्रमाणात पुरवठा होऊ शकेल काय, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

भारत वर्षाला जवळजवळ ४६ कोटी डॉलरच्या कृत्रिम धाग्याची चीनकडून आयात करतो. त्यावरही परिणाम होईल. पर्यटन उद्योगालाही मोठा दणका बसतो आहे. वाहनांचे सुटे भागही प्रामुख्याने चीनकडून आपल्याला पुरविले जातात. त्यामुळे मंदीच्या गर्तेतून वर येण्यासाठी आधीच झगडत असलेल्या या उद्योगाच्या अडचणींत भर पडली आहे. वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रातील अनेक बड्या कंपन्या उत्पादन चीनमध्ये करतात. सध्याच्या संकटामुळे ते भारताकडे वळण्याची शक्‍यता आहे; पण त्याचा फायदा उठविण्याइतकी आपली तयारी आहे काय, हाही प्रश्‍न या निमित्ताने समोर आला आहे. संकट जसे नुकसान करते, त्याचप्रमाणे बरेच काही शिकवूनही जाते. प्रश्‍न आहे तो आपण ते धडे गांभीर्याने घेणार की नाही हाच. तसे ते घेऊन तात्कालिक आणि दूरगामी उपायांचा अवलंब होणे ही आजच्या घडीची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com