अग्रलेख : युद्ध आपुले सुरुच...

Social-Distencing
Social-Distencing

एका फटक्यात आपली जीवनशैली आरपार बदलून टाकत, जगभरात लाखोंच्या संख्येत बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पहिला बळी घेतला तो १७ मार्च २०२० रोजी. दुबईहून मुंबईत आलेल्या ६४ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाने मुंबईच्या कस्तुरबा इस्पितळात अखेरचा श्वास घेतला आणि तेव्हापासून राज्यात बळींची तसेच बाधितांची मालिकाच सुरू झाली. त्या घटनेस नेमके एक वर्ष पूर्ण होत असतानाच, या विषाणूची दुसरी लाट महाराष्ट्रावर स्वारी करून आली आहे. आज घडीला या विषाणूची बाधा झालेल्या रूग्णांची सर्वाधिक वाढ देशातील आपल्याच राज्यात होत असल्याचे आकडेवारी सांगत आहे. त्यामुळेच अखेर राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचा अहवाल केंद्रीय पथकाने सादर केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तसे राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ या राज्यांत विशेष काळजी घ्यावी लागेल, असे नमूद करतानाच  ‘मायक्रो कंटेनमनेंट झोन'' तयार करून त्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची सूचना केली. ‘दवाई भी, कडाई भी’ असा संदेश त्यांनी दिला. लस आली आता पूर्ववत वागले तरी चालेल, असा अनेकांचा समज झाला असून तो दूर करायला हवा.

राज्यातील ‘महाविकास आघाडी’ सरकारने काही पावले उचलली असून, कार्यालयांतील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे तर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सभा, सोहळे यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घातली आहे. एवढेच नव्हे तर अंत्यविधीसाठीही केवळ २०  जणांनाच उपस्थित राहता येणार आहे. महाराष्ट्रात मंगळवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत १७ हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे या दुसऱ्या लाटेचे संकटाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. मात्र, गेल्या काही दिवसांतील आणि विशेषत: ठाणबंदीची अनेक दारे उघडल्यानंतर राज्यातील अत्युत्साही नागरिकांचे वर्तन बघता, हा या विषाणूचा फटका जरूर असला तरी हे दुखणे विकतचेच आहे, असे सहज म्हणता येते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या मार्चमध्ये प्रथम ‘लॉकडाऊन’ जारी केला होता आणि त्यानंतर देशभरात खरोखरच सन्नाटा निर्माण झाला होता. कालांतराने या विषाणूचा जोर कमी होत असल्याचे दिसू लागले आणि राज्यातील जनतेला वारंवार सावधगिरीच्या सूचना देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ‘मिशन बिगीन अगेन!’ असा मंत्रजप सुरू केला. ते अपरिहार्यच होते; कारण राज्याच्याच नव्हे तर देशभराच्या ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हे सहा-सात महिने बंद राहिलेले दरवाजे उघडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र, हा एवढा मोठा काळ घराघरांत ठाणबंद होऊन राहणे भाग पडलेल्या नागरिकांनी या स्वातंत्र्याचा गैरफायदा उठवण्यास सुरुवात केली. हे स्वातंत्र्य आपल्यासोबत मास्क, ‘दो गज की दुरी’ तसेच सतत हात धुणे अशी त्रिसूत्री घेऊन आले होते, याकडे जनतेने साफ दुर्लक्ष केले. मास्क हा तर नाका-तोंडाला नव्हे तर गळ्याभोवती गुंफण्याचा एक अलंकारच आहे, अशा थाटात लोक वावरू लागले. खाजगी तसेच सार्वजनिक पार्ट्याही नव्या जोमाने सुरू झाल्या. त्यामुळे आता या दुसऱ्या लाटेचा इशारा पदरात घेताना खरोखरच या विषाणूने जोर केला आहे, की आपल्या या अनिर्बंध वर्तनाने आपणच हे दुसऱ्या लाटेचे संकट ओढवून घेंतले आहे की काय, याचा जनतेनेच गांभीर्याने विचार करावा.

केंद्र सरकारने त्यामुळे महाराष्ट्राला कडक इशारा देणे, हे रास्तच असले तरी लोकांचे हे असे अनिर्बंध वर्तन काही केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे, असे नाही. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेसाठी सुरू असलेल्या रणधुमाळीत हजारोंच्या सभा-मिरवणुका सुरू आहेत. तेथेही मास्क लावलेली प्रजा ही अपवादानेच बघायला मिळत आहे. तर इंग्लंडविरुद्ध अहमदाबादेत झालेल्या दुसऱ्या टी-ट्‍वेण्टी सामन्याच्या वेळी स्टेडियममध्ये तर मास्क लावायला जणू बंदीच घातली आहे की काय, असेच दृश्य होते. त्यामुळेच आता उर्वरित तीन सामने हे प्रेक्षकांविनाच खेळावे लागणार आहेत. हे ‘कर्तृत्व’ अर्थातच या जीवघेण्या विषाणूचे नसून, ते कोरोनासंदर्भातील सर्वच्या सर्व नियमांची बिनधास्त पायमल्ली करणाऱ्या आपणा सर्वांचेच आहे, हे खेदाने नमूद करावे लागते.

देशभरात लोकांचे अनिर्बंध, बेभान तसेच बेताल वागणे आणि त्या पार्श्वभूमीवर एक वर्षानंतर पुनश्च बाधितांच्या संख्येत झालेली वाढ   बघता त्यास आता लस उपलब्ध झाल्यामुळे जनतेच्या मनात नको तितका आत्मविश्वास तर जागा झालेला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, लस घेतल्यानंतरही मास्क घालावाच लागणे आणि शारीरिक अंतराचे भान राखणे बंधनकारक आहेच, हे लक्षात घ्यायला हवे. या पार्श्वभूमीवर देशभरातील बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होणाऱ्या दहा जिल्ह्यांपैकी आठ महाराष्ट्रात आहेत, हे लक्षात घेतले तरी केंद्र केवळ महाराष्ट्रालाच इशारा देत असल्याने त्यामागे काही राजकारण तर नाही ना, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. सध्या वेगवेगळ्या कारणांनी राज्य आणि केंद्र यांच्यात खणाखणी सुरू आहे. त्या तलवारबाजीचा निकाल काय लागायचा तो लागो; मात्र किमान या विषाणूविरोधातील लढतीचे राजकारण होता कामा नये. त्याचवेळी लोकांनीही कमालीची दक्षता पाळायला हवी. लोकांना पुनश्च एकवार घरातच बसायचे असेल, तर मग गोष्टच वेगळी!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com