लोकशक्तीला साद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

देशाच्या राजधानीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर्थिक राजधानीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात एक सुखद असा समान धागा आहे. तो म्हणजे या दोघांचाही सूर हा जनतेवर कोणतीही सक्‍ती न करता, समजावणीचा आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अवघा भारतवर्ष हवालदिल झालेला असताना, देशाच्या राजधानीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर्थिक राजधानीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात एक सुखद असा समान धागा आहे. तो म्हणजे या दोघांचाही सूर हा जनतेवर कोणतीही सक्‍ती न करता, समजावणीचा आहे. कोरोना विषाणूच्या फैलावावर मात करण्याचा सध्या तरी एकमेव उपाय आहे तो स्वयंस्फूर्तीने सामाजिक संबंध टाळण्याचा. खरे तर हाती असलेल्या अधिकारांचा वापर करून पंतप्रधान काय किंवा मुख्यमंत्री काय यांना या विषाणूंनी ठाण मांडलेल्या किमान काही मोठ्या शहरांत सक्‍तीची संचारबंदी सहज लागू करता आली असती. मात्र, पंतप्रधानांनी ते करणे टाळले आणि त्याऐवजी देशभरातील लोकांना उद्याच्या, रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले. तर उद्धव ठाकरे यांनी मुंबापुरीतील लोकल गाड्या व बससेवा बंद करण्याचा काहींचा आग्रह असतानाही, लोकांनीच सध्या घरात बसावे आणि या सेवांचा वापर होता होईल टाळावा, असे सामंजस्याचे आवाहन केले.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

देशभरातील जनता आणि विशेषत: रोज पायाला चाके लावल्यागत फिरणारे मुंबईकर यांना हा मोठाच दिलासा आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबरच आणीबाणीच्या प्रसंगी घराबाहेर पडावे लागणाऱ्या लोकांसाठी या सेवा सुरू राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यातील लोकसहभाग जेवढा व्यापक आणि परिणामकारक असेल त्यावर त्याचे यश अवलंबून असेल, याची जाणीव मोदींच्या आवाहनात दिसते. रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याची आणि या संकटाच्या मुकाबल्यासाठी दिवसरात्र एक करून कामात व्यग्र असलेल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाची त्यांची कल्पना स्वागतार्ह आहे. रविवारी त्यात सर्वांनी सामील व्हायला हवे. संकल्प आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या जर लोकांनी स्वीकारल्या तर त्याचे दृश्‍य परिणाम जाणवल्याशिवाय राहणार नाहीत. मात्र भावनिक आवाहनाच्या जोडीनेच सरकारच्या प्रत्यक्ष कृतीचा तपशीलही सांगायला हवा होता. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सुविधा जर अपुऱ्या पडल्या तर सरकार त्याची काय योजना करणार आहे, कोरोना विषाणू संसर्गाच्या निदानाची केंद्रे वाढविण्यासाठी कोणती पावले उचलण्यात येत आहेत आणि डॉक्‍टर, परिचारिका तसेच या क्षेत्रातील अन्य मनुष्यबळ कसे उपलब्ध केले जाणार आहे, याविषयीही माहिती पंतप्रधानांनी दिली असती तर जास्त चांगले झाले असते. लोकांना आश्‍वस्त करण्यासाठी हे आवश्‍यकही आहे.

उद्धव ठाकरे यांचा सारा भर हा मुंबईतील अलोट गर्दी कशी टाळता येईल, यावर होता. गेल्या दोन दिवसांत या गर्दीने स्वत:हून काही प्रमाणात तरी काढता पाय घेतला असला, तरी विषाणूच्या फैलावावर मात करण्यास ते पुरेसे नाही, हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादातून जाणवून दिले. जगण्यासाठी माणसाला अहोरात्र धडपडावे लागते, मात्र आता जगण्यासाठी शांत बसणे कसे आवश्‍यक आहे, ते त्यांनी समजावून सांगितले. आता महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर या चार शहरांत जीवनावश्‍यक सेवा, तसेच लोकांच्या गरजेच्या वस्तू, म्हणजेच किराणा, औषधे आदी दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. हे काम स्वयंस्फूर्तीने होईल, असा विश्‍वास व्यक्‍त करतानाच ‘तसे न झाल्यास नाईलाजाने ते काम सरकारला करावे लागेल,’ असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार या संसर्गाला आळा घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना, आता जनतेनेही प्रत्यक्ष कृतीने त्यांना साथ द्यायला हवी. या संकटाशी मुकाबला करणे प्रामुख्याने ‘आम आदमी’च्याच हातात आहे, ही बाब या संवादांमुळे अधोरेखित झाली. लोकशक्तीला घातलेली ही साद आहे, त्याला प्रतिसाद द्यायला हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial article Coronavirus infection