esakal | अग्रलेख : विषाणूशी लढाई
sakal

बोलून बातमी शोधा

Virus

कोरोना विषाणूसारखे संकट येते, तेव्हा ते सर्वस्पर्शी असे आव्हान उभे करते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, ती शोधून काढण्यासाठी वैद्यकीय संशोधकांपुढे आव्हान आहेच; परंतु तातडीची परीक्षा आहे ती संसर्गाची व्याप्ती आटोक्‍यात आणण्याची.

अग्रलेख : विषाणूशी लढाई

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोरोना विषाणूसारखे संकट येते, तेव्हा ते सर्वस्पर्शी असे आव्हान उभे करते, याचा प्रत्यय सध्या येत आहे. या विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही, ती शोधून काढण्यासाठी वैद्यकीय संशोधकांपुढे आव्हान आहेच; परंतु तातडीची परीक्षा आहे ती संसर्गाची व्याप्ती आटोक्‍यात आणण्याची. चीनच्या वुहान प्रांतात प्रामुख्याने या विषाणूचा संसर्ग आढळून आला असला तरी, जगाच्या विविध भागांत तो पसरत असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायात चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविकच; परंतु घबराट माजणे कोणत्याच अर्थाने समाजाच्या हिताचे नाही. तसे झाल्यास नुकसानच अधिक होईल.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप

मात्र, सावधपणा असायला हवा. त्या दृष्टीने भारताची सज्जता कितपत आहे, हा प्रश्‍न महत्त्वाचा ठरतो. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २८ असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी सांगितले. सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या नागरिकांची कसून आरोग्य तपासणी करण्यात येत असून, रुग्णांचे विलगीकरण करण्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सरकारी पातळीवरील या उपाययोजना महत्त्वाच्या असल्या तरी तेवढ्याच पुरेशा नाहीत. या संकटाला तोंड देण्यातील परिणामकारक लोकसहभाग ही सर्वांत कळीची बाब. जागतिक आरोग्य संघटना आणि चीन सरकार यांनी गेल्या काही दिवसांत संयुक्तरीत्या केलेल्या अभ्यासपाहणीनंतर एक अहवाल तयार केला असून, त्यात ज्या शिफारशी करण्यात आल्या आहेत, त्यातही लोकशिक्षणावर भर दिलेला आहे.

रोगाच्या प्रसाराला आळा घालायचा तर सार्वजनिक जीवनात काही पथ्ये पाळायला हवीत. स्वच्छतेविषयीच्या सूचना आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घ्यावयाची काळजी याविषयी सर्वदूर माहिती पोचायला हवी. मास्क वापरण्यापासून ते गर्दीच्या ठिकाणी न जाण्यापर्यंत आणि नियमितपणे हात, पाय, चेहरा स्वच्छ धुण्यापासून ते हस्तांदोलनासारख्या सामाजिक सवयी बदलण्यापर्यंतच्या विविध सूचनांचा त्यात समावेश असेल. कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तीला खोकला आणि ताप येतो.

खोकल्याद्वारे हा विषाणू पसरू शकतो. खोकताना तोंडावर रुमाल धरण्याची सवय सार्वत्रिक झाली पाहिजे. स्वतःच्या चेहऱ्याला वारंवार आपण स्पर्श करीत असतो. डोळे, नाक, तोंड यांना असा स्पर्श करणे जाणीवपूर्वक टाळायला हवे. कोणालाही लक्षणे जाणवत असल्यास त्याची माहिती लपवून ठेवण्याचा प्रयत्न न करता तातडीने डॉक्‍टरांकडे जायला हवे. या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या सवयीविरुद्धही जागृतीमोहीम राबविता आली, तर ते समाजहिताचे ठरेल. मुख्य मुद्दा आहे तो या संकटाचे नेमके स्वरूप समजावून देण्याचा आणि त्याचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा. दूरदेशीचे हे संकट आहे, त्याचा आपल्याशी काय संबंध, असा ज्यांचा समज आहे, तो लवकरात लवकर दूर केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा होळीच्या उत्सवात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामागची भूमिका लक्षात घेऊन नागरिकांनीही उत्सवाच्या वा अन्य निमित्ताने गर्दी करण्याचे, आवश्‍यकता नसताना गर्दीत मिसळण्याचे टाळायला हवे. सर्वच पातळ्यांवर संवादाची दारे मोकळी असणे किती महत्त्वाचे असते, याचाही धडा अशावेळी मिळतो. वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर स्थानिक लोकांनी पक्षयंत्रणेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत वास्तव पोचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. नंतर परिस्थिती गंभीर बनली.

आता मात्र तेथील सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या असून, चीन अक्षरशः युद्धपातळीवर या संकटाचा मुकाबला करीत आहे. पण मुद्दा आहे तो संवादाचा. आपल्याकडची समस्या चीनसारखी नसली तरी समाजमाध्यमांतून या निमित्ताने अफवा, वदंता, भाकडकथा मोठ्या प्रमाणावर पसरविल्या जात असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. त्यामुळे अधिकृत स्रोतांकडून मिळालेल्या माहितीचा परिणामकारक प्रसार होणे ही मोठी गरज आहे. हे लक्षात घेऊन सरकारने शास्त्रीय, विश्‍वासार्ह, नेमक्‍या माहितीच्या प्रसारासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वैद्यकीय उपचारांशी संबंधित उपकरणे, औषधे यांचा तुटवडा निर्माण होणार नाही, याचीही दक्षता आधीच घ्यावी लागेल. सरकारी यंत्रणांमध्ये उत्तम समन्वय असायला हवा.

थोडक्‍यात, सामाजिक प्रतिकारशक्ती जागी व्हायला हवी. जसजसे तापमान वाढत जाईल, तसतसा या विषाणूचा धोका कमी होत जाईल, असे सांगण्यात येते. त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नसले तरी, या निमित्ताने सार्वजनिक जीवनातील शिस्त हा एखाद्या समाजाच्या सवयीचा भाग बनणे किती महत्त्वाचे असते, हा धडा मिळतो.