esakal | अग्रलेख  : आयपीएलची ‘लस’!
sakal

बोलून बातमी शोधा

ipl

तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या या देशात, लोकांना घराबाहेर न पडता प्रक्षेपणाच्या माध्यमातून ‘आयपीएल’च्या सामन्यांचा आनंद लुटता आला तर तो या समस्येवर एक प्रभावी उतारा ठरू शकेल. मात्र, त्याचबरोबर ‘कोरोना’चे हे संकट लवकरात लवकर दूर झाले तर त्याचा अधिक आनंद सर्वांना होईल, यात शंका नाही.  

अग्रलेख  : आयपीएलची ‘लस’!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अनेक देशांतील सामाजिक आणि आर्थिक व्यवहारांना मोठाच फटका दिला आहे. ‘कोरोना’च्या संसर्गाची व्याप्ती वाढत चालल्याने केंद्र सरकारने ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केली आहे. देशातील सर्वाधिक ‘कोरोना’बाधितांची संख्या महाराष्ट्रात असल्याने ही परिस्थिती लवकर नियंत्रणाखाली यावी म्हणून अंगणवाड्यांपासून शाळा-महाविद्यालये ते मॉल्स, तसेच चित्रपटगृहे काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारला घेणे भाग पडले आहे. मात्र, शेअर बाजारापासून कच्च्या तेलाच्या व्यवहारांपर्यंत अनेकांना मोठा तडाखा दिल्यानंतर आता या विषाणूची नजर क्रीडा क्षेत्राकडे वळली आहे आणि त्याची परिणती जागतिक पातळीवरील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द होण्यात झाली. या स्पर्धा रद्द करण्याऐवजी त्या रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवाव्यात, असा एक पर्याय पुढे आला होता. मात्र, स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळताना क्रीडापटू आपले नैपुण्य दाखवू शकतील काय, हा एक वेगळाच विषय आहे. क्रिकेटचे सामने मग ते कसोटी असोत की एकदिवसीय की ‘ट्‌वेण्टी २०’चे असोत, अगदी सात वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या स्टेडियममध्ये गरजणारा ‘सचिन... सचिन’ असा नारा आजही क्रीडाप्रेमींच्या स्मरणात आहे. त्यामुळेच विनाप्रेक्षक सामने खेळवण्याऐवजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिकाच रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय)ला घेणे भाग पडले आणि दक्षिण आफ्रिकेने त्याबद्दल ‘बीसीसीआय’चे आभारही मानले. मात्र, हेच नियामक मंडळ जगभरातील नामांकित क्रिकेटपटू व भारतातील क्रिकेट संघटनांच्या तिजोरीत दरवर्षी करोडोंची माया जमा करणारी ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) रद्द न करता, ती पुढे ढकलून, पुढच्या महिनाभरात तरी या विषाणूची तीव्रता कमी व्हावी, अशी मनोमन प्रार्थना करत आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

‘बीसीसीआय’चा हा निर्णय वरकरणी अनेकांना अजब वाटत असला तरी, त्याची घोषणा करताना भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यापासून शाहरूख खानसारख्या या स्पर्धेतील बहुतांश संघांच्या मालकांना समाजाचे आरोग्यहित प्रथम पाहिले जाईल, असे जाहीर करणे भाग पडले आहे. मात्र, यंदाची ही ‘लीग’ या घटकेला रद्द करण्याची त्यांची तयारी नसणे, याचे इंगित अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून जमणारी कोट्यवधींची माया हेच आहे. ‘बीसीसीआय’ला या लीगच्या निव्वळ दूरचित्रवाणी प्रक्षेपणाच्या हक्‍कातून प्रतिवर्षी साधारणपणे १६०० कोटी रुपये मिळतात. तसा पाच वर्षांचा करारच ‘स्टार स्पोर्टस’ वाहिनीने ‘बीसीसीआय’शी केला आहे. जगभरातील ज्या देशांचे खेळाडू ‘आयपीएल’मध्ये खेळत असतात, त्या देशांतही हे सामने बघितले जातातच; पण पाकिस्तानसारख्या देशाचा एकही खेळाडू यात खेळत नसतानाही, तेथेही मध्यरात्रीपर्यंत जागत हे सामने बघणारे लक्षावधी चाहते आहेत. त्यामुळेच या क्रिकेटवेड्या देशांमधील खासगी वाहिन्यांना या थेट प्रक्षेपणाचे हक्‍क विकून ‘बीसीसीआय’शी केलेल्या करारापेक्षा अधिक रक्‍कम ‘स्टार स्पोर्टस’च्या पदरात पडत असेल. ‘आयपीएल’मुळे केवळ खासगी क्रीडा वाहिन्यांचेच भले झाले असे नाही. या स्पर्धेच्या निमित्ताने आणखीही अनेक व्यवसाय तेजीत चालतात. मग, तो स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांना खाद्यपदार्थ- शीतपेये पुरवण्याचा असो की संघांच्या गणवेषाच्या प्रतिकृतींच्या विक्रीचा असो; असे अनेक व्यवसाय यंदाची ‘आयपीएल’ रद्द झाल्यास अडचणीत येऊ शकतात. त्यामुळेच ‘आयपीएल’ लगेच रद्द न करता एकंदर परिस्थितीवर लक्ष ठेवून नंतर अंतिम निर्णय घेण्याची सावधगिरीची भूमिका मंडळाने घेतली आहे. त्याचे कारण म्हणजे ‘आयपीएल’ ही स्पर्धा मुळातच क्रिकेटप्रेमापेक्षा अर्थकारणातून उभी राहिली आहे.

 ऑलिंपिक ही तर अवघ्या जगाला भूषणावह ठरावी अशी क्रीडा स्पर्धा. मात्र, या जागतिक स्पर्धेतून प्रायोजक, तसेच अन्य माध्यमांतून मिळणाऱ्या अब्जावधी डॉलरची रक्कम डोळ्यांपुढे ठेवून, ‘कोरोना’चा भारतापेक्षा बराच मोठा फटका बसलेला जपानही ही स्पर्धा रद्द करण्याऐवजी, परिस्थिती निवळेल आणि स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल, अशी आशा बाळगून आहे. या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे. बॅडमिंटन असो की तायकोंदो अशा अनेक लोकप्रिय खेळांच्या स्पर्धा रद्द होत असल्या तरी, ‘आयपीएल’ वेगळ्या फॉर्ममध्ये का होईना, पण होईलच अशी आशा ‘बीसीसीआय’ला वाटते. त्याचवेळी इतर क्रीडाप्रकारांकडे दुर्लक्ष करत संध्याकाळच्या निवांत वेळेत या स्पर्धेचा आनंद लुटणारे कोट्यवधी क्रिकेट चाहतेही ही लीग कोणत्याही फॉर्ममध्ये का होईना व्हावी, यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. त्याशिवाय, सट्टेबाजांचीही अशीच अपेक्षा असेल. तेव्हा क्रिकेटप्रेमींच्या या देशात, लोकांना घराबाहेर न पडता प्रक्षेपणाच्या माध्यमातून ‘आयपीएल’च्या सामन्यांचा आनंद लुटता आला तर तो या समस्येवर एक प्रभावी उतारा ठरू शकेल. मात्र, त्याचबरोबर ‘कोरोना’चे हे संकट लवकरात लवकर दूर झाले तर त्याचा अधिक आनंद सर्वांना होईल, यात शंका नाही.  

loading image