अग्रलेख : स्वप्नपूर्ती की समाप्ती?

महासंकटाच्या सावटातदेखील ऑलिंपिकचा सोहोळा ठरल्याप्रमाणे पार पडला तर तो माणसाच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे आदर्श उदाहरण ठरेल.
Olympic
OlympicSakal

महासंकटाच्या सावटातदेखील ऑलिंपिकचा सोहोळा ठरल्याप्रमाणे पार पडला तर तो माणसाच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे आदर्श उदाहरण ठरेल. प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देण्याच्या माणसाच्या जिद्दीतूनच इतिहास घडला आहे.

जगभरातील क्रीडापटूंच्या मनातील अंतिम स्वप्न असते ते दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे आणि त्यातही एखादे पदक आपल्या हाती आले तर अगदी ‘सोने पे सुहागा’च! मग भले त्या पदकास सुवर्णांकित झळाळी का नसेना! या क्रीडा सोहळ्याची पाळेमुळे प्राचीन ग्रीक इतिहासात रुजलेली आहेत. एकेकाळी योद्ध्यांसाठी खेळवल्या जाणाऱ्या या क्रीडासोहोळ्याचे रूपांतर कालौघात आधुनिक ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये झाले. दोन तीन अपवाद वगळता गेली सव्वाशे वर्षे हा क्रीडानैपुण्याचा महोत्सव अव्याहतपणे सुरू आहे. गेल्यावेळी ब्राझीलची राजधानी रिओ-डी-जानेरो येथे पार पडलेल्या या स्पर्धेत जवळपास दोनशे देशांतील नामांकित क्रीडापटूंनी बहार उडवून दिली होती आणि त्याआधीच पुढच्या चार वर्षांनी हा महोत्सव जपानमधील टोकियो या महानगरात होणार हे ठरले होते. तेव्हापासून नेओमी ओसाका ही जपानची अव्वल टेनिसपटू आपल्याच देशाच्या या राजधानीत ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न बघत आहे. अशा कित्येक ‘नेओमी ओसाका’ जगभरातील अनेक देशांमध्ये या घटकेला सरावात मग्न आहेत. मात्र, आता जगभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या थैमानामुळे या स्वप्नाची पूर्ती होते का समाप्ती, हा लाखमोलाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

जगभरातील अनेक खेळाडू या स्वप्नोत्सवात सामील होण्यास उत्सुक असतातच. टेलिव्हिजनने आपल्या घरातील दिवाणखान्याचे रूपांतर स्टेडियममध्ये करून टाकल्यापासून तर ऑलिंपिक असो की विम्बलडन, युरोपियन फुटबॉल असो की क्रिकेट वर्ल्ड कप, अशा थरार उभ्या करणाऱ्या क्रीडास्पर्धांच्या चाहत्यांची संख्या वाढत चालली आहे. खरे तर टोकियो ऑलिंपिक गतवर्षीच संपन्न होणार होते; पण या विषाणूने ते एक वर्षासाठी पुढे ढकलायला लावले आणि आताही पुन्हा याच विषाणूने चढवलेल्या आणखी एका हल्यामुळे त्यावरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यामुळे आता विविध निर्बंधांची अंमलबजावणी करत हे ऑलिंपिक झालेच तरी जपान सरकारने भारतातून येणाऱ्या कोणासही प्रवेशबंदी जारी केल्यामुळे तूर्तास तरी भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत सामील होता येईल की नाही, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

भारतीय नागरिकांना सध्या जपानबंदी करण्यात आली असली तरी हा फक्त भारताचाच प्रश्न नाही. भारतासह पाकिस्तान, नेपाळ, ब्राझील, मेक्सिको अशा अन्य अनेक देशांवर जपानने बंदी घातली आहे. खरेतर याला बंदी म्हणणे सयुक्तिक ठरणार नाही. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भारतीय पथकातील विविध खेळाडूंच्या चमूंना अन्य देशांत मुक्काम ठोकून सराव चालू ठेवावा लागेल व तेथूनच परस्पर टोकियो गाठावे लागेल. ही बाब अर्थातच खर्चिक आहे. उदाहरणार्थ भारताचा नेमबाजीचा चमू यापूर्वी क्रोएशिया येथे रवाना झाला आहे. तेथूनच या खेळाडूंना जपानला जाता येईल. थोडक्यात परिस्थिती गुंतागुंतीची असली तरी त्यातून मार्ग काढणे ही कसोटी असते. कितीही अडचणी असल्या तरी अजेय योद्ध्यांचा सत्कार करण्याची परंपरा असलेल्या जागतिक सोहोळ्यावर एका विषाणूपायी सरसकट फुली मारणे निश्चितच शोभादायक नाही. महासंकटाच्या सावटातदेखील हा सोहोळा ठरल्याप्रमाणे पार पडला तर तो माणसाच्या जिद्दीचे आणि चिकाटीचे आदर्श उदाहरण ठरेल. हे गुण फक्त मैदानावरच दाखवायचे असे थोडेच आहे? ते आयोजनातही दाखवायला हवेत.

या अशा प्रकारच्या कोणत्याही स्पर्धा ही क्रीडापटूंसाठी जशी आपल्या नैपुण्याचा कस लावून दाखवण्याची संधी असते, त्याचबरोबर आयोजक आणि प्रायोजक यांच्यासाठी ती आर्थिक पर्वणीही असते. त्यामुळेच भारतात कोरोनाची दुसरी लाट वेगाने आक्रमण करत असतानाच ‘आयपीएल’ नावाच्या क्रिकेटपटूंच्या सर्कशीचे खेळ लावण्यात आले होते. मात्र, खेळाडू तसेच संबंधितांसाठी उभ्या करण्यात आलेल्या ‘बायो-बबल’चा बुडबुडा मध्येच फुटला आणि हा ‘खेळ’ मध्यावरच स्थगित करावा लागला. या पार्श्वभूमीवर जपानमध्येही २३ जुलैपासून सुरू होणारा हा महोत्सव पुढे ढकलावा, अशी मागणी वाढीस लागली आहे आणि त्यासाठी पंतप्रधान योशाहिदो सुगा यांच्यावर केवळ राजकीय विरोधकांचाच नव्हे, तर जपानी नागरिकांचाही दबाव वाढत आहे.

अलीकडेच झालेल्या एका सर्वेक्षणात जपानच्या ७० टक्के नागरिकांचा या स्पर्धांना विरोध असल्याचे दिसून आले आहे. खरे तर अन्य देशांच्या तुलनेत कमी असले, तरी गेल्या काही दिवसांत जपानमध्ये बाधितांचे प्रमाण वेगाने वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे निकटवर्ती आणि खाजगी सल्लागार प्रा. योईकी ताकाहाशी यांनी स्पर्धा घेण्याबाबत केलेले एक ट्वीट कमालीचे वादग्रस्त ठरले आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले असून, ‘ऑलिंपिकसाठी लोकांच्या मरणाचे कसे काय समर्थन करता?’ असा प्रश्न जपानी नागरिक विचारत आहेत. तरीही तमाम क्रीडारसिकांनी या परिस्थितीतूनही काहीतरी चांगला मार्ग निघेल, अशी आशा करायला काय हरकत आहे?

खरे तर जुलैमधील या ऑलिंपिकसंबंधात काही अंतिम निर्णय हा आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांच्या टोकियो दौऱ्यानंतर अपेक्षित होता. मात्र, सध्या तरी त्याचा याच महिन्यांतील दौरा हा पुढच्या महिन्यापर्यंत लांबणीवर टाकणे भाग पडले आहे. त्यामुळे जगभरातील क्रीडापटूंच्या या स्वप्ननगरीवरचे प्रश्नचिन्ह कायम असले तरी मनातील आशेचे किरण लोपलेले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com