esakal | अग्रलेख :  पितृ "देवो' भव 
sakal

बोलून बातमी शोधा

virat

भारतीय कर्णधार आणि अव्वल फलंदाज विराट कोहली यास पहिल्या कसोटीनंतर "पितृत्वाची रजा' मंजूर करण्यात आली आहे. नेमका हाच मोका साधत, विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघ हा कमालीचा कमजोर झालेला असेल, असा टोला रिकी पॉंटिंग याने लगावला आहे.

अग्रलेख :  पितृ "देवो' भव 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

प्रत्यक्ष खेळ सुरू होण्याआधीच प्रतिस्पर्ध्याचे मानसिक खच्चीकरण करून त्याला हतबल करून टाकण्यात ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू मशहूर आहेत. मात्र, त्याचेच प्रत्यंतर नेमके "आंतरराष्ट्रीय पुरुष दिना'च्या दिवशी येणे, हा निव्वळ योगायोग असला तरी त्यामुळे चर्चेत आलेला मुद्दा हा अनेकार्थांनी महत्त्वाचा आहे. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि या दोन देशांमध्ये होऊ घातलेल्या चुरशीच्या लढतींकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्यातच भारतीय कर्णधार आणि अव्वल फलंदाज विराट कोहली यास पहिल्या कसोटीनंतर "पितृत्वाची रजा' मंजूर करण्यात आली आहे. नेमका हाच मोका साधत, विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघ हा कमालीचा कमजोर झालेला असेल, असा टोला रिकी पॉंटिंग याने लगावला आहे. या टोल्यामागचा त्याचा हेतू स्पष्ट आहे. पण खेळाच्या पलीकडे सामाजिक प्रश्‍न म्हणून या विषयाकडे गांभीर्याने पाहायला हवे. बालसंगोपन आणि त्यातील वडिलांची जबाबदारी हे दोन मुद्दे सांगोपांग चर्चा करायला हवी, असेच आहेत. विराटने क्रिकेटपेक्षा आपल्या होऊ घातलेल्या बाळाच्या संगोपनास दिलेले महत्त्व हे भारतासारख्या पितृप्रधान समाजातील समजुतींना छेद देणारे असल्याने त्यावर गहजब होणे अटळच. समाजमाध्यमांवर तसा तो झालादेखील. "क्षुल्लक" कारणासाठी त्याने रजा घेतली, असा आक्षेप घेणाऱ्यांचे मानस पूर्णपणे याच पठडीत तयार झाले आहे. त्यामुळेच विराटचा हा निर्णय केवळ कौतुकापुरता मर्यादित न ठेवता, त्याचे अनुकरण व्हायला हवे. आपल्या देशात "सेलेब्रिटीं'चे अनुकरण सातत्याने होत असते. मात्र, विराटचे अनुकरण हे केवळ त्याची फलंदाजीची शैली वा त्याच्या दाढीचा "कट' यापुरते मर्यादित राहता कामा नये. तर समस्त "बाप' मंडळींनी त्यापासून काही धडा घ्यायला हवा. आपल्या देशात पितृत्वाच्या रजेबाबत काहीही स्पष्टता नाही. काही आस्थापनांमध्ये अशी रजा विनासायास मिळते. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनाही ती मिळू शकते. मात्र, प्रश्न ही रजा "बाप माणसे' नेमकी कशी घालवतात, यावर त्यांच्या बाळाचे भविष्य अवलंबून असते, हे फारच थोड्यांना ठाऊक असते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"बाप माणसां'ना दिल्या जाणाऱ्या या पितृत्वाच्या रजेस अनेक पदर आहेत. मात्र, बहुतेक वेळा ही रजा निव्वळ वाया घालवली तरी जाते वा काही पुरुष माणसे घरकामाला थोडाफार हातभार लावण्यात खर्ची घालवतात आणि त्यात धन्यताही मानतात. प्रत्यक्षात नवजात बाळाला जवळ घेण्यापासून त्याच्या प्रत्यक्ष संगोपनात या बाप माणसाचा काहीच वाटा नसतो. आधुनिक बालसंगोपन शास्त्रानुसार नवजात बाळाला आईतक्‍याच पित्याच्या स्पर्शाचीही गरज असते. हा स्पर्श बाळाला सतत आश्वस्त करत असतो. एवढेच नव्हे तर त्यामुळे बाळाच्या मेंदूची वाढही सशक्तपणे होत असते. प्रत्यक्षात वडील संगोपनाच्या नावाखाली बाळ झोपले की त्यापासून चार हात दूरच राहून टीव्ही बघण्यात दंग असतात! खरे तर बाप माणसांनी संगोपनात आईइतकीच जबाबदारी उचलालयला हवी असते. मात्र, देशोदेशीची पुरुषप्रधान संस्कृती ही अशा पद्धतीने विकसित होत गेली आहे, की संगोपनात आपली काही जबाबदारी नाही, असा बहुतेक पुरुषमंडळींचा समज झाला आहे. गर्भवती पत्नीला बाळंतपणासाठी माहेरी धाडण्यामागे हेदेखील कारण असावे. या काळात सगळ्या खस्ता, ताण सोसावे लागतात, ते स्त्रीला आणि बाप माणसे ते दोन-अडीच महिने मजा मारण्यास मोकळी, असेच चित्र बहुतेक ठिकाणी दिसते. अमेरिकेसारख्या देशात तर प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळीही पित्याला आतमध्ये उपस्थित ठेवले जाते. आपल्या देशात असा प्रसंग यायचा असेल तेव्हा येवो; मात्र तोपावेतो न थांबता या बाप माणसांनी नवजात बालकाला किमान आईच्या विश्रांतीच्या वेळी तरी आपल्या कुशीतच घेऊन बसायला हवे, इतके या दोहोंच्या स्पर्शाचे महत्त्व असते, यावर आता प्रगत संशोधनातून शिक्कामोर्तब झाले आहे. विराटने घेतलेल्या या पितृत्वाच्या रजेमुळे समाजात हा विचार रुजला तरच ती रजा खऱ्या अर्थाने कारणी लागली, असे म्हणता येईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकविसाव्या शतकाच्या आधीपासूनच आता घरातील दोन्ही माणसे म्हणजेच आई आणि वडील हे कामावर जाणारे असतात. त्यामुळेच घरकाम तसेच बालसंगोपन या दोन्ही जबाबदाऱ्याही त्या दोघांनी वाटून घ्यायला हव्यात. शिवाय, हे केवळ कौटुंबिक समानतेपुरते मर्यादित नाही. तर त्यावर नवजात बालकाची मानसिक तसेच शारीरिक वाढही अवलंबून असते. त्यामुळेच पितृत्वाच्या रजेसाठी काही कायदे केले आणि ती बाप मंडळींनाही मिळत राहणे, जितके महत्त्वाचे आहे, तितकेच या मंडळींनी त्या संगोपनात सहभागी होणेही जरुरीचे आहे. "महिला दिन' जगभरात साजरा होऊ लागला आणि त्यालाच जणू काही उत्तर देण्याच्या ईर्षेतून "पुरुष दिन'ही साजरा होऊ लागला. मात्र, योगायोग असा की "आंतरराष्ट्रीय विवाह दिन'ही नेमका गुरुवारच्या पुरुष दिनाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारीच साजरा झाला. नवजात बालकाच्या संगोपनात आता यापुढे बाप मंडळीही थेट आणि स्वयंस्फूर्तीने सहभागी झाली तरच या असल्या दिनांचे औपचारिकत्व कमी होईल. त्याची परिणती आपल्याच बाळाच्या सशक्त वाढीत झाली तर त्यामुळे हे तिन्ही दिन कारणी लागतील आणि त्यामुळेच कौटुंबिक सौख्यही वाढीस लागेल, असे ठामपणे म्हणता येते. "पितृ देवो भव' असे जे काही "मातृ देवो भव' यानंतर म्हटले जाते, त्यामागेही हीच भावना असणार!