esakal | अग्रलेख : वंगभूमीतील सूडाचे रंग
sakal

बोलून बातमी शोधा

West-Bengal-Election

निवडणुकीच्या युद्धात सारे काही क्षम्य, असा पक्का ग्रह राजकीय पक्षांनी करून घेतल्याने साध्य-साधन शूचिता वगैरे गोष्टींना सोडचिठ्ठी दिली जाते. बंगालच्या निवडणुकीत तर हे अगदी ठळकपणे दिसते.

अग्रलेख : वंगभूमीतील सूडाचे रंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

निवडणुकीच्या युद्धात सारे काही क्षम्य, असा पक्का ग्रह राजकीय पक्षांनी करून घेतल्याने साध्य-साधन शूचिता वगैरे गोष्टींना सोडचिठ्ठी दिली जाते. बंगालच्या निवडणुकीत तर हे अगदी ठळकपणे दिसते.

निवडणुकीचे रणमैदान तापू लागले, की एरवी ज्या लोकशाही तत्त्वांची जपमाळ राजकीय नेते ओढत असतात, ती तत्त्वे अगदी सहजपणे  सोडून देण्याचा प्रघातच पडू पाहात आहे. निवडणुकीच्या युद्धात सारे काही क्षम्य, असा पक्का ग्रह राजकीय पक्षांनी करून घेतल्याने साध्य-साधन शूचिता वगैरे गोष्टींना बिनदिक्कत सोडचिठ्ठी दिली जाते, याचाही प्रत्यय अलीकडे ठळकपणे येत आहे. निवडणूक मग ती पश्चिम बंगालसारख्या एका महत्त्वाच्या राज्याची असो, की पुदुच्चेरीसारख्या एका छोटेखानी केंद्रशासित प्रदेशाची; ती जिंकण्यासाठी मिळेल ते अस्त्र वापरायचे असा पणच भारतीय जनता पक्षाने केला आहे की काय, असा प्रश्न अलीकडच्या घटनांमुळे उपस्थित होतो. भाजपने फोडाफोडीचा जुनाच खेळ नव्याने करून पुदुच्चेरीतील काँग्रेस सरकारला पायउतार होण्यास भाग पाडले, तर आता प. बंगालमध्ये केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाला (सीबीआय) हाताशी धरून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला दाती तृण धरून शरण आणण्याचे राजकीय खेळ वंगभूमीत सुरू झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे द्वितीय क्रमांकाचे बडे नेते अमित शहा यांनी ममतादीदींवर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यांचा रोख ममतादीदींचे भाचे आणि ‘तृणमूल’चे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या दिशेने होता. ‘अभिषेक हा किमान निवडून आलेला खासदार आहे; पण कोणतीही निवडणूक न जिंकता जय हा शहांचा सुपुत्र जे काही दिवे लावत आहे, त्याचे काय?’ हे ममतादीदींचे प्रत्युत्तर शहांना बरेच झोंबलेले दिसते. अभिषेक यांची मेव्हणी तसेच पत्नी यांना ‘सीबीआय’ने नोटिसा धाडणे आणि अभिषेक यांची पत्नी रुजिरा यांची ‘सीबीआय’च्या अर्ध्या डझनाहून अधिक अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेणे, याचे टायमिंग पुरेसे बोलके आहे. 

या पार्श्वभूवीवर ‘सीबीआय’ने अभिषेक बॅनर्जी यांच्या कुटुंबियांना कथित कोळसा घोटाळ्यावरून नोटिसा धाडल्या, तेव्हाच ‘शिवसेनेपाठोपाठ अकाली दलानेही भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ‘सीबीआय’ तसेच ‘इडी’ हेच भाजपसाठी दोन मित्रपक्ष म्हणून उरले आहेत!’ अशी तिखट प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसने दिली होती. अर्थात, निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना ‘सीबीआय’  वा ‘इडी’ यांच्या दावणीला बांधण्याचा खेळ भाजप काही प्रथमच करत आहे, असे नाही. महाराष्ट्रातही दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ‘इडी’चे आवतण आल्याची आवई उठवण्यात आली होती. त्यानंतर ‘महाविकास  आघाडी’चे सरकार आल्यावर भाजपवर रोजच्या रोज आग ओकणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीवर असेच ‘इडी’ अस्त्र सोडण्याचा प्रयोग केला गेला. आता बॅनर्जी यांच्या कुटुंबियांना नोटिसा गेल्या आहेत. त्या धाडण्यात आल्या त्याच दिवशी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प. बंगालात होते आणि हुगळी या कोलकात्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहरात झालेल्या सभेत त्यांनी ममतादीदींच्या कारभारावर घणाघाती हल्ला चढवला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारच्या योजना अडवून, दीदींनी बंगाली जनतेचे मोठेच नुकसान केले आहे, या त्यांच्या आरोपात नवे काही नव्हते. मात्र, हे पूणर्पणे भ्रष्टाचाराने पोखरलेले ‘कट प्रॅक्टिस’ करणारे सरकार आहे, या त्यांच्या उद्‍गारांमुळे तृणमूल कार्यकर्ते कमालीचे संतप्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या या खणाखणीतून संघर्षाच्या किती ठिणग्या उडतील, याचीच झलक बघायला मिळाली.  तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी पंतप्रधानांच्या आरोपांना तपशीलवार उत्तर दिले असून, आकडेवारीनिशी त्यांचा प्रत्येक दावा खोडून काढला आहे. कोळसा गैरव्यवहारासंबंधात बॅनर्जी कुटुंबियांवर जे काही आरोप झाले आहेत, त्याची चौकशी ही झालीच पाहिजे. मात्र, ऐन निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांची अशी ही जुनी प्रकरणे उकरून काढून, त्यांना चौकशीच्या जंजाळात गुंतवून ठेवण्याची भाजपची रीत त्यामुळेच पुन्हा एकदा समोर आली आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामागे ‘इडी’ लावण्याचा प्रयत्न  भाजपवरच कसा उलटला, हे सर्वांनी पाहिले. तरीही तेच खेळ पुन्हापुन्हा करण्याची भाजपची खुमखुमी कमी होत नाही.

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत किती गरमागरमी होईल, याचीच साक्ष या राजकीय डावपेचांमुळे मिळाली आहे. अस्मिताबाजी, भावनिक आवाहने यांना ऊत आला आहे. प्रक्षोभ निर्माण करणे, ध्रुवीकरण वाढविणे असे प्रकार जोरात सुरू आहेत. एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना भाजपचे प. बंगालचे अध्यक्ष घोषबाबू यांनी श्रीराम आणि दुर्गामाता यांची तुलना करून एक नवाच वाद उकरून काढला. एकूणच भाजप बंगाल पादाक्रांत करण्यासाठी किती कासावीस झाला आहे, त्याचेच दर्शन घडते आहे.

राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसही कमालीचा आक्रमक झाला असून त्या पक्षाने अनेक ठिकाणी हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप होत आहे. डाव्यांची राज्यात सत्ता होती, तेव्हा तृणमूल कॉंग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या कार्यकर्त्यांत हिंसक चकमकी झडत. डावे जाऊन तृणमूल सत्तेवर आल्यानंतरदेखील तेथील राजकीय क्षेत्रांत रुजलेली हिंसाचाराची संस्कृती हटली नाही. डावे विरुद्ध ‘तृणमूल’च्या ऐवजी आता भाजप विरुद्ध तृणमूल एवढाच काय तो फरक. ‘सत्तांतर’ झाले तरी ते ‘परिबोर्तन’ घडत नाही, हेच तर बंगालचे दुखणे आहे!

Edited By - Prashant Patil

loading image